भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर घटसर्पबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना काळात लसीकरण न झाल्याने मुलांत घटसर्पाचा आजार बळावत आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात दहा ऑक्टोबर रोजी घटसर्पाचे ३९ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. पैकी आठ जणांचा मृत्यू झाला. घटसर्प हा श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला म्हणजे घशाला होणारा तीव्र संसर्गजन्य रोग आहे. कॉरिनेबॅक्टेरियम डिफ्थेरी या जीवाणूमुळे हा रोग होतो. या रोगात श्वसनसंस्थेच्या वरच्या भागात विशेषत: टॉन्सिल अणि घसा याचे श्लेष्मपटल बाधित होते. त्यामुळे श्वास घेता येत नाही. काहीवेळा त्वचेच्या मार्गाने आणि जखमेतून घटसर्पाचा संसर्ग पसरतो . घटसर्पावरील उपचारासाठी अँटीबायोटिक पेनिसिलीनसह डिप्थिरिया सीरम (एडीएस) औषध दिले जाते. औषध नसल्यास मुलांचे आरोग्य संकटात सापडू शकते.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर घटसर्पबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना काळात लसीकरण न झाल्याने मुलांत घटसर्पाचा आजार बळावत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. कराचीत मुलांसाठी घटसर्पापासून बचाव करण्यासाठी लस उपलब्ध नाही. परिणामी तेथे शंभरपेक्षा अधिक मुलांना जीव गमवावा लागला. मागच्यावर्षी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात संसर्गजन्य घटसर्पाचे १४० रुग्ण नोंदले गेले. पैकी ५२ मुलांचा मृत्यू झाला. त्याचवेळी यावर्षी शंभरपेक्षा अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. यामागचे कारण म्हणजे संपूर्ण सिंध प्रांतात अँटीटॉक्सिनचे एकही औषध नसणे. Ghatasarpa’s growing challenge
भारतात देखील घटसर्पाचे रुग्ण वाढत आहेत. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात दहा ऑक्टोबर रोजी घटसर्पाचे ३९ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. पैकी आठ जणांचा मृत्यू झाला. संभलच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या २०० पैकी दोन मुलांत घटसर्पाचे लक्षणे आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात भरती केले. तत्पूर्वी ऑक्टोबरच्या प्रारंभी उरई येथे घटसर्पाचे २९ रुग्ण आढळून आले आणि त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. सहा ऑक्टोबर रोजी जालंधरच्या फिरोजपूर येथे तीन वर्षांच्या मुलीत घटसर्पाचे लक्षण आढळून आले. तिला रुग्णालयात दाखल केले असता दोन दिवसांनंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर फिरोजपूरमध्ये घटसर्पाच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी सर्व्हे केला जात आहे आणि त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे पथक देखील सामील आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबव्यतिरिक्त राजस्थानच्या डीग जिल्ह्यातही चौदा सप्टेंबरपासून ते आतापर्यंत घटसर्पामुळे सात मुलांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील आरोग्य विभागाला सजग राहण्याचे निर्देश दिले असून संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे.
घटसर्प हा गंभीर आजार
घटसर्प हा श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला म्हणजे घशाला होणारा तीव्र संसर्गजन्य रोग आहे. कॉरिनेबॅक्टेरियम डिफ्थेरी या जीवाणूमुळे हा रोग होतो. या रोगात श्वसनसंस्थेच्या वरच्या भागात विशेषतः टॉन्सिल अणि घसा याचे श्लेष्मपटल बाधित होते. त्यामुळे श्वास घेता येत नाही. काहीवेळा त्वचेच्या मार्गाने आणि जखमेतून घटसर्पाचा संसर्ग पसरतो. नाक वाहणे, घसा दुखणे, ताप येणे आणि अस्वस्थ वाटणे ही घटसर्पाची लक्षणे आहेत. या आजाराचे वेळीच निदान न झाल्यास तीस टक्के प्रकरणात रुग्णांची स्थिती गंभीर होऊ शकते.
बुस्टर डोस देखील गरजेचा
नॅशनल इम्युनायजेशन शेड्यूलच्या मते, घटसर्प प्रतिबंधक लस डीपीटीचा (डिप्थिरिया, पटुसिस आणि टेटनस ) पहिला डोस जन्माच्या सहा आठवड्यांत, दुसरा डोस दहा आठवड्यां आणि तिसरा डोस चौदा आठवड्यांनंतर बाळाला दिला जातो. त्यानंतर २४ ते ३६ महिने म्हणजे दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत पहिला बुस्टर डोस आणि सहाव्या वर्षी दुसरा आणि दहाव्या वर्षी तिसरा बुस्टर डोस द्यावा लागतो. यात निष्काळजीपणा दाखविल्यास बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या संसर्गाला लसीकरणाच्या मदतीनेच रोखता येणे शक्य आहे. लस नाही तर हा आजार एवढा गंभीर होतो की, पीडित मुलास प्रसंगी व्हेंटिलेटरवर ठेवण्याची नामुष्की येते. अर्थात तीन ते पाच वर्षापर्यंत मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात येते. मात्र सहा अणि दहाव्या वर्षी देण्यात येणारा बुस्टर डोस पालक विसरतात किंवा दुर्लक्ष करतात. घटसर्पामुळे मृत्युदर चिंताजनक आहे. कारण त्याची लक्षणे सामान्य असतात आणि तपासणी केल्याशिवाय हा आजार कळत नाही. घटसर्पबाधित रुग्ण गंभीर झाल्यास फुफ्फुस, हृदय, मेंदू, घसा अणि यकृतात गुंतागुंत निर्माण होते. श्वास घेता येत नाही. मुलाला वाचविण्यासाठी ट्रेकियोस्टॉमी (घशाची सर्जरी) देखील करावी लागते. हा आजार चोवीस तासांत रुग्णांना गंभीर स्थितीत नेणारा आहे.
कोरोनामुळे लसीकरण अर्धवट
कोरोना काळात मुलांच्या लसीकरणापासून नागरिक दूर राहिले आणि त्याचे दुष्परिणाम बाळांना सहन करावे लागत आहेत. २०२० अणि २०२१ मध्ये जन्मलेल्या काही मुलांचे लसीकरण अर्धवट राहिले. म्हणून ही लस न दिल्याने मुलांत हा संसर्गजन्य रोग बळावल्याचे निदर्शनास आले. लखनौत मोठ्या संख्येने मुले रुग्णालयात दाखल होत आहेत आणि त्यां घटसर्प झाल्याचे कळाल्यानंतर त्यांना भरती केले जात आहे. या काळात मुलांना वाचविणे खूपच कठीण राहते. कारण हा आजार काही तासांतच गंभीर रूप धारण करतो आणि त्याचा थांगपत्ताही पालकांना, नातेवाईकांना लागत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये जगभरात ८४ टक्के मुलांना घटसर्प प्रतिबंधकाचे तीन आवश्यक डोस मिळाले. पण उर्वरित १६ टक्के मुलांचे लसीकरण झाले नाही किंवा अर्ध्यावरच राहिले.

जगभरातील लसीकरणाबाबत आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो की, २०१५ ते २०१७ या काळात डीपीटीच्या लसीकरणाची व्याप्ती ही ८९ टक्क्यांवरून ८३ टक्क्यांवर आली. लसीकरणात घट झाल्याने घटसर्प रुग्णांची संख्या वाढत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे व्यापक लसीकरण आणि लसीकरणात सातत्य राखणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होते. या आधारावर गंभीर आजारापासून मुलांचा बचाव होतो. जर्मनीत देखील चौदा ऑक्टोबर रोजी घटसर्पाचा एक रुग्ण आढळून आला. पीडित मुलाचे वय दहा आहे. २७ सप्टेंबर रोजी ‘टॉन्सिलायटिस’मुळे त्याला बर्लिनजवळील ब्रँडनबर्गच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना घटसर्पचा संशय आला. तपासणी अहवालात घटसर्प झाल्याचे उघड झाले. बर्लिनच्या एका रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ज्या भागात मुलाचे घर आहे, त्या परिसरात आरोग्य विभागाचे पथक तपासणी करत आहे. जर्मनीत १८९२ मध्ये घटसर्पाचा उद्रेक झाला होता. या उद्रेकात ५० हजारांपेक्षा अधिक जणांचे बळी गेले. १९१३ मध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतर संसर्गाचे प्रमाण कमी झाले. गेल्या वीस वर्षांपासून या आजाराचे जर्मनीतून उच्चाटन झालेले होते. पण यावर्षी आतापर्यंत ३७ जणांना घटसर्प झाल्याचे निष्पन्न झाले.
उपचारानंतरही लस
डॉक्टरांच्या मते, मुलांत घटसर्पाची लक्षणे दिसताच त्याला वेगळ्या खोलीत ठेवणे हिताचे आहे. घरातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि दुसऱ्या मुलांना पीडित मुलांपासून दूर ठेवावे. रुग्णास पातळ पदार्थ द्यावेत. वेळेवर उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. आजारातून बरे झाल्यानंतरही लसीकरण पुन्हा करता येऊ शकते. कारण एकदाच लस दिल्याने आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण हेत नाही. डोस अर्धवट राहिल्याने घटसर्पाचा आजार पुन्हा होऊ शकतो.
घटसर्प वेगाने का पसरतो
अहमदाबादच्या आशियायी चिल्ड्रन रुग्णालयाचे संस्थापक डॉ. इम्रान पटेल म्हणतात, मुले ही एकत्र खेळतात आणि राहतात. एक बाधित मुलगा शिकल्याने किंवा त्याला खोकला आल्याने एरोसॉल (नाकातील किंवा तोंडातील द्रव) हे चांगल्या मुलांच्या शरीरात जाऊन त्याला आजारी पाडू शकतात.
डॉ. संजय गायकवाड