मुंबई : दूध भेसळीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या.
दुधात भेसळ करणाऱ्यांसोबतच अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध खरेदी करणाच्या सहकारी, खासगी दूध संघांनाही सहआरोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूधात होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी तसेच ग्राहकांना स्वच्छ व गुणवत्तापुर्ण दूधाचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने शासनाने आता सहा सदस्यांची जिल्हा स्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात संबंधित अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत अपर पोलिस अधीक्षक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, संबधित जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न), वैधमापन शास्त्र उपनियंत्रक यांचा समावेश असणार आहे. तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. या समितीच्या माध्यमातून संबधित जिल्ह्यातील दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक तपासणी मोहीम राबविण्यात येईल.
असे ओळखा ‘भेसळ’युक्त दूध
वाढत्या महागाईमुळे आज कोणताही पदार्थ पूर्णपणे शुद्ध मिळणे कठीण झाले आहे. फळे, धान्य आणि अगदी दुधामध्येही मोठ्याप्रमाणावर भेसळ केली जाते. शरीराला दुधापासून पोषण मिळते. परंतु आज अनेक जण पोटाच्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. याला कारण आहे दुधात होणारी अपायकारक भेसळ. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यात हानिकारक केमिकलचा वापर केला जातो. त्यामळे दुधाची गुणवत्ता तर खालावतेच. सोबत आजार पसरतात.
भारतीय अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती समोर अली आहे. देशभरात विकल्या जाणाऱ्या दुधामध्ये १०% दूध हे शरीरासाठी अपायकारक आहे. तर त्या १०% पैकी ४०% दूध हे पिशवीच्या माध्यमातून पोहोचवले जाते. अशा भेसळयुक्त दुधामुळे आतड्यांचे विकार, किडनीचे विकार अशा समस्या निर्माण होत आहे.
भेसळयुक्त दूध कसे ओळखावे :
१. दुधात भेसळ असल्यास दूध शिळे असले तरी रंग बदलत नाही.
२. दुधात जर युरियाची भेसळ केली असेल तर ते गडद पिवळ्या रंगाचे दिसते.
३. सर्वात महत्वाचे म्हणजे भेसळ नसलेल शुद्ध दूध हे चिकट नसते . तळहातावर दूध घेऊन दुधाचा चिकटपणा तपासता येऊ शकेल.