अमृतसर : १९८० च्या दशकात ‘उडान’ या मालिकेतून देशभर लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री कविता चौधरी यांचे गुरुवारी रात्री अमृतसर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांचे भाचे अजय सायाल यांनी निधनाची माहिती देताना म्हटले की, कविता चौधरी यांना काही दिवसांपासून लो ब्लडप्रेशरच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी दूरदर्शनवरील उडान मालिकेतून आयपीएसचे स्वप्न बाळगणाऱ्या महिलेची भूमिका केली होती. त्या भूमिकेमुळे त्या घरोघरी लोकप्रिय झाल्या होत्या.
कविता चौधरींचा जन्म अमृतसरमध्ये झाला होता आणि आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ येथे घालवण्यासाठी २०१८ मध्ये मन्नावाला येथे घर विकत घेतले होते. अमृतसर येथील पार्वतीदेवी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू होते. जिथे त्यांनी काल रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला. कविता चौधरी यांच्यावर भाऊ कपिल चौधरी यांनी अन्यसंस्कार केला.
त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीता मोठा धक्का बसला आहे. ३५ वर्षापूर्वी ‘उडान’ ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. त्याची कथा आणि सेटही मूळ होता. ही मालिका कविता चौधरी यांनी बहीण आयपीएस कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या प्रभावाखाली बनवली होती. किरण बेदीनंतर त्यांची बहीण कांचन या देशातील पहिल्या आयपीएस बनणाऱ्या दुसऱ्या महिला अधिकारी होत्या. दोघींची खास गोष्ट म्हणजे, दोघीही अमृतसरच्या होत्या. केवळ ३० भाग असलेल्या या टीव्ही मालिकेला प्रचंड दाद मिळाली. यानंतर कविता यांनी आणखी दोन मालिका केल्या. (वृत्तसंस्था)