बहनों और भाईयों अशी साद रेडियोच्या श्रोत्यांना घालणारे प्रसिद्ध रेडियो निवेदक अमीन सयानी यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. आकाशवाणी आणि रेडियो सिलोनच्या माध्यमातून त्यांचा आवाज भारतीय उपखंडाच्या घराघरात पोहोचला होता. मृदू, प्रभावी आवाज आणि लयबद्ध निवेदनाने त्यांनी रेडियो निवेदनाच्या क्षेत्रात मानदंड निर्माण केला. बिनाका गीतमाला हा त्यांचा चित्रपटसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या विज्ञापन प्रसारण सेवेच्या विविध भारती वाहिनीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ गाजला. आकाशवाणी मुंबईमधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली होती.
१९५१ मधे रेडीयो निवेदक म्हणून काम सुरु केल्यापासून सयानी यांनी ५४ हजाराहून अधिक कार्यक्रमांना आणि १९ हजाराहून जास्त जाहिरातींना आवाज दिला. आवाजातला जिव्हाळा आणि सादरीकरणातलं नाविन्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. एस कुमार का फिल्मी मुकदमा, सॅरिडॉन के साथी, असे अनेक पुरस्कृत कार्यक्रम त्यांनी सादर केले. एड्सबाधितांची कहाणी सांगणारी ‘स्व-नाश’ ही नभोनाट्य मालिकाही त्यांनी सादर केली होती.याशिवाय अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. केंद्रसरकारनं २००९ मधे त्यांना पद्मश्रीनं सन्मानित केलं होतं. याखेरीज अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी ही अमीन सयानी यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.