शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना २१ तारखेला हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं, तिथेच त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा इथल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं आहे. दुपारी २ वाजता अंत्ययात्रा सुरू होईल.
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ला रायगड जिल्ह्यातल्या नांदवी या गावी झाला. महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, तीन वेळा विधानपरिषद सदस्य, मुंबईचे महापौर, दोन वेळा विधानसभा सदस्य, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्री, लोकसभा सभापती, राज्यसभा खासदार अशा विविध राजकीय भूमिकेत ते दिसले. १९६७ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी शिवसेना पक्षासाठी वेचलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या जोशी यांचा शिवसेना संघटित करण्यात मोठा वाटा होता. १९९५ मध्ये शिवसेना- भाजप युती राज्यात सत्तेवर आल्यानंतर ते राज्याचे पहिले बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेवर विश्लेषणात्मक अभ्यास करुन पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली. मराठी तरुणांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण मिळून ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी त्यांनी ‘कोहिनूर’ ही तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था सुरु केली. नंतर ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. सर या नावाने परिचित असलेले जोशी यांच्याबद्दल प्रत्येकालाच आदर आणि जिव्हाळा वाटत असे.