कोणाला केव्हा व कोठे शिंका येईल ही काही सांगता येत नाही. त्यामुळे दरवाजात शिंकू नये हीसुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. शिंक येणे ही एक शारीरिक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. “
‘जेव्हा काही रोगजंतू वा धुळीचे सूक्ष्म कण नाकामध्ये जातात तेव्हा त्यांना नाकातील केस अडवतात. ते कण तेथेच त्वचेवर अडकून पडतात. त्यामुळे स्पर्शज्ञानामुळे नाकाच्या आतील पातळ व मृदू त्वचेचे स्नायू उद्दीपित होतात. त्यामुळे त्या कणांना बाहेर फेकण्यासाठी आतील हवा खूप जोराने व अतिशय वेगाने बाहेर फेकली जाते. हवा बाहेर फेकताना जो आवाज होतो त्यालाच शिंक येणे म्हणतात. कधी कधी काही कारणाने नाकातील त्वचा हुळहुळली वा चुरचुरली म्हणजेही शिंक येते.

सर्दी झाली असता नाकाच्या आतील त्वचेला सूज येते व तिचा दाह होतो. त्यामुळेसुद्धा शिंका येतात. काही जणांना धुळीची अॅलर्जी असते. त्यांना घर झाडतानासुद्धा शिंका येतात. घरात फोडणी दिल्याने, तिखटामुळे नाकात आग होते व त्यामुळेही शिंका येतात. आपल्या नाकाच्या त्वचेशी व डोळ्यांशी निगडित असलेल्या नसा या एकमेकांशी संबंधित असतात. कधी कधी डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडल्यास नाकाच्या पातळ त्वचेशी निगडित असलेल्या नसाही उत्तेजित होतात. त्यामुळेही शिंका येतात. शिंक येताना खूप जोराने व अतिशय वेगाने हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे संपूर्ण शरीराला हादरा बसतो व शरीर थरथरते. या हादऱ्यामुळे डोळ्यांतील अश्रुपिंडावर दाब पडतो व डोळ्यांतून पाणीही येते. त्यामुळे डोळ्यांशी निगडित असलेल्या नसाही उत्तेजित होतात व तो ताण कमी करण्यासाठी क्षणभर डोळेही आपोआप मिटले जातात. मात्र शिंक येत असल्यास त्वरित नाकातोंडाला रुमाल लावावा म्हणजे एखाद्यावेळी शिंकेसोबत नाकातून शेंबूड बाहेर आल्यास होणारी आपली फजिती टळते नि शिंकेद्वारे होणाऱ्या रोगजंतूंच्या प्रसाराला आळा बसतो.
खोकला हीसुद्धा एक नैसर्गिक व सामान्य अशी शरीरक्रिया आहे. मनुष्याच्या श्वसनव्यवस्थेत नाक, घसा, श्वासनलिका, श्वासवाहिन्या व फुप्फुसे हे अवयव असतात. त्यांच्या पोकळीच्या पृष्ठभागावर विशिष्ट पेशीचे एक बारीकसे पातळ आच्छादन असते. या आवरणावरून हवेचा प्रवास अतिशय सहजतेने व अत्यंत सुलभपणे होतो; परंतु जर धूर, धूळ, अन्नद्रव्याचे सूक्ष्म कण यांमुळे या आवरणावर अडथळे आले, तर मज्जासंस्था व मेंदूत्वरित त्यांची दखल घेतात व श्वसनमार्ग हे अडथळे श्वसनातील हवेचा प्रवाह काहीशा दाबाखाली उलटा फिरवून जोराने बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. शरीराने हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी केलेल्या नैसर्गिक प्रयत्नास खोकला असे म्हणतात.
श्वसन नलिकेतील हवा एकदम जोराने उलटी वाहिल्याने श्वसन नलिकेवरील पडदा झटक्यात उघडतो. तो झटक्यात उघडल्याने आतील हवा जोराने फुसांडत बाहेर पडते. त्या हवेचा जो आवाज होतो त्यालाच खोकला म्हणतात. कधीकधी काही विशिष्ट रोगजंतूंमुळे या आवरणावर खरवड येते, काही विषाणूंचे फुफ्फुसावर आक्रमण होते. त्या जंतूंना, विषाणूंना शरीराबाहेर फेकण्यासाठीसुद्धा खोकला येतो. म्हणून खोकतानासुद्धा तोंडावर रुमाल ठेवावा म्हणजे खोकल्यावाटे रोगजंतूंचा प्रसार होत नाही. “