जवाहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जामठी बु. येथील इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी कु. श्रेया मुकुंद उंबरकर हिची भारत सरकारच्या रक्षा मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “प्रोजेक्ट विरगाथा ५.०” या राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत देशातील अव्वल १०० विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री मा. राजनाथ सिंह यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातून केवळ दोन शाळांच्या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात जामठी बु. येथील श्रेयाचा समावेश आहे.
तसेच विधी प्रदीप वानखडे हिची मुलींमधून चित्रकला या प्रकारात श्रीमती राधादेवी गोयंका विद्यामंदिर हायस्कूल, अकोला येथून निवड झाली असून तिनेही अकोला शहराच्या नावलौकिकात मोलाची भर घातली आहे.

या उल्लेखनीय यशाचे श्रेय कु. श्रेया उंबरकर हिने संस्थेचे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब देशमुख, सचिव श्री. विनोदभाऊ राठी, जवाहर पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. कुंदनभाऊ देशमुख, मुख्याध्यापक श्री. प्रमोद महल्ले सर, पर्यवेक्षिका कु. विमल काटकर मॅडम, मार्गदर्शक शिक्षिका कु. अंजली धानोरकर मॅडम तसेच आई-वडील यांना दिले आहे. तसेच मूर्तिजापूर येथील गट शिक्षणाधिकारी श्रीमती रामटेके मॅडम व माजी केंद्रप्रमुख श्री. दिलीपजी सरदार सर यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शनही या यशामागे महत्त्वाचे ठरले असल्याचे तिने सांगितले.
या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे अकोला शहराचा देशपातळीवर गौरव झाला असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
