वाढत्या स्थूलतेच्या समस्येकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशाचे लक्ष वेधून घेतले. या मुद्दयावर त्यांनी जागरुकता मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी दहा प्रभावशाली व्यक्तींना नामांकित केले. त्यात आनंद महिंद्रा, सुधा मूर्ती, श्रेया घोषाल, नंदन नीलकेणी यांच्यासहअन्य सहा जणांचा समावेश आहे. स्थूलता टाळण्यासाठी सामान्य माणसांनी दर महिन्याला घरात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलात दहा टक्के कपात करावी, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. भारतात स्थूलतेची व्याधी प्रचंड वेगाने वाढत असल्याचा निष्कर्ष विविध सर्वेक्षणे नोंदवतात. मग ते सर्वेक्षण लॅन्सेट या मासिकाचे असो अथवा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अभियानचे बैठी जीवनशैली, बदलती आहार पध्दती, कमी होत चाललेले घरचे जेवण, मेदयुक्त तळलेले रस्त्यावरच्या पदार्थांवरचे वाढत चाललेले गाढवप्रेम अशी स्थूलता वाढवणारी अनेक मुख्य कारणे सांगितली जाऊ शकतील. स्थूलता का वाढते ? तिचे दुष्परिणाम काय आहेत? त्यामुळे कोणत्या व्याधी जडतात ? हे सामान्य माणसेही जाणून आहेत. स्थूलता माणसाला काय भेट देते ? हृदयरोग, टाईप २ मधुमेह, पक्षाघात, श्वसनाचे विकार या त्या अनर्थकारक भेटी. अजून एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे स्थूल व्यक्तीची स्वप्रतिमा खराब होते. परिणामी आत्मविश्वास कमी होतो. अशी माणसे समाजात मिसळणे टाळतात. परिणामी वजन वाढतच जाते. यावर मुख्यतः दोन उपाय तज्ज्ञ सुचवतात. पहिला आहाराचे नियम पालन आणि दुसरा शारीरिक व्यायाम. त्यांच्या आधारे स्थूलता कमी करणे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करणे आणि खाण्यावर ताबा ठेवण्याला पर्याय नाही. मनमानी दिनचर्या असलेल्या व्यक्तीची स्थूलता कमी होणे अशक्य मानले जाते. पण ठरवले तर ते शक्य आहे, हेच पंतप्रधानांनी सुचवले आहे. त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्ती प्रचंड व्यस्त आहेत, तरीही त्यांनी त्यांचे वजन आटोक्यातच ठेवलेले आढळते. आरोग्यपूर्ण दिनचर्या अमलात आणायची की विविध व्याधींचे अनारोग्य आयुष्यभर सांभाळायचे हे सामान्य माणसांनाच ठरवावे लागेल. कारण तापाचे औषध ताप आलेल्या व्यक्तीलाच घ्यावे लागते. Prime Minister Narendra Modi addresses the problem of obesity