अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर क्र ६ कुरणखेड हे संमिश्र वस्तीचे गाव आहे. याच गावाच्या बसस्थानकापासून दक्षिणेस काटेपूर्णा नदीच्या काठावर दोन कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर हिरवळ वृक्षांच्या छायेत या चंडिका मातेचे मंदिर असून तेथे मातेचे वास्तव्य आहे. याच ठिकाणास ढगा देवी म्हणून पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात आणि विदर्भातही ओळखले जाते.
हे तीर्थस्थान भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. चंडिका मातेच्या बाबतीत अनेक कथा आणि एक सुवर्ण इतिहास आहे. प्राचीन काळात हे गाव कुंतिनापूर म्हणून ओळखले जात होते. याचेच नाव पुढे कुरणखेड उदयास आले आणि ते प्रचलित नावलौकिक झाले. भक्ताला नवसाला पावणारी आणि संकटात तारणारी माता या जागृत मातेचा कुंतिनापूर राजा नरेश हा देवीचा भक्त होता. तो या टेकडीवर घनदाट जंगलात नेहमी यायचा एकदा त्याला या टेकडीवर घनदाट अरण्यात निर्मनुष्य मातेचे वास्तव्य असलेल्या जंगलात मातेच्या आसपास स्वच्छ दिसायची. हे सत्य आणि वास्तव्य चमत्कार जाणून घेण्यासाठी राजा नरेश एके दिवशी भल्या पहाटे तेथे आला असता एक सिंह आपल्या शेपटीने ती जागा स्वच्छ करत आहे. हे पाहून राजा नरेश आश्चर्यचकित झाला. तेव्हापासून या चंडिका मातेच्या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली गेली असावी, असा भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराचा सुवर्ण इतिहास दोनशे वर्षांचा असावा, असा मानस आहे.
दररोज कार्यक्रमाची रेलचेल राहते. या मंदिराच्या उत्तरेस १२१ पायऱ्या असून प्रवेशद्वाराजवळ भैरवजी महाराज कुंड, सभामंडप, गोरक्षण संस्था, आसरा माता मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, दुमजली भक्त निवास, भोजन सभागृह इत्यादी आज दृष्टीस येते. वर्षभर धार्मिक, प्रासंगिक कार्यक्रमाची रेलचेल असते. हे निसर्गरम्य वातावरण टेकडीवर वृक्षांच्या गळ्यात मातेचे पायथ्याशी उत्तरेकडे वाहणारी काटेपूर्णा नदी या सर्व निसर्गरम्य वातावरणात भक्त तल्लीन होतात. नवरात्र उत्सवामध्ये इथे मोठी यात्रा भरते, जिल्ह्याभरातून भाविक पायी चालत देवीच्या दर्शनासाठी रोज पहाटे येत असतात यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात यात्रा भरली आहे मंदिर परिसरामध्ये भावीक भक्तांच्या सर्व सुविधांची व्यवस्था केली आहे असे संस्थांचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी दैनिक मातृभूमी संवाद साधला कुरणखेडला शिव व शक्ती दोघांचे दर्शन घडून येते चंडिका मातेच्या दर्शनानंतर कुरणखेड येथील प्राचीन शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा प्रघात होता.. विदर्भात आले असता छत्रपती शिवाजी महाराज व थोरले बाजीराव पेशवे दर्शनासाठी आल्याचे बोलले जाते.
योगेश विजयकर