भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला आहे. १९४७ मधे झालेल्या भारत पाकिस्तान फाळणीदरम्यान सिंधमधून भारतात आलेल्या अडवाणी यांनी भारतीय राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलं.खासदार म्हणून ते जवळपास तीन दशकं संसदीय राजकारणात सक्रीय होते.माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी यांनी देशाचं उपप्रधानमंत्रीपद भूषवलं होतं.अडवाणी यांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अडवाणी हे आपल्या काळातल्या आदरणीय राजकारणी व्यक्तिमत्वांपैकी एक असून, देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे,असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजनैतिक जीवनात नीतिमूल्यांची जपणूक कशी करावी याचा मानदंड अडवाणी यांनी स्थापन केला, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे.