छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, त्याच लाल किल्ल्यातील दिवाण ए आम या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशी शिवछत्रपतींचा जयजयकार दुमदुमला. ‘दांडपट्टा’ या शिवकालीन शस्त्रास महाराष्ट्राचे ‘राज्यशस्त्र’ म्हणून दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यात केली.
स्वराज्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांचे सर्किट करण्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल. शिवरायांनी ज्या ज्या भूमीत पाय ठेवला त्या त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्मृती जपण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आग्रा येथील लाल किल्ल्यात दरवर्षी शिवजयंती साजरी व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय व अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री एस. बघेल, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव विकास खारगे, विनोद पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे उपस्थित होते. आग्रा किल्ल्यात प्रथमच झालेल्या या शिवजयंती सोहळ्यात ‘मराठा साम्राज्याचे चलन’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शिवछत्रपतींच्या घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.