: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स पाठवले आहेत. अझरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे. माहितीनुसार, असोसिएशनमध्ये 20 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. अझरुद्दीनला आज ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे. ईडीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने तेलंगणातील 9 ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

हे संपूर्ण प्रकरण हैदराबादमधील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामातील आर्थिक अनियमिततेचे आहे. अधिकाऱ्यांनी खासगी कंपन्यांना चढ्या दराने कंत्राटे देऊन असोसिएशनचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने तीन एफआयआर नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.