कर्करोगाच्या पेशी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला आपल्या ‘लिपिड’ म्हणजेच बाह्य आवरणातील फॅटी कम्पांडच्या सहाय्याने चकवा देऊन लपून राहू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. या पेशी कधी कधी असा छुपा मार्गही पत्करतात. सहसा अशा पेशींच्या मेम्ब्रेनवर म्हणजेच आवरणावर काही विशिष्ट रसायने निर्माण झाल्याने त्याची माहिती रोगप्रतिकारक यंत्रणेला समजत असते. त्यामुळे या पेशी शरीराची हानी करण्यापूर्वीच त्या नष्टही केल्या जात असतात; मात्र कधी कधी आपले स्वरूप असे उघड न करता या पेशी लपूनही राहू शकतात असे नव्या संशोधनात आढळून आले आहे. ‘नेचर’ या विज्ञान नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या रॉकफेलर युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी आणि सध्या ‘लाईम थेरॅपिटिक्स’मधील संशोधक मॅरिलुझ सौला यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ट्युमर विकसित होण्यामागील ‘इंधना’चा स्रोत म्हणून संशोधक ‘लिपिड’कडेच पाहत असतात; मात्र आता या नव्या संशोधनानुसार लिपिडचा एक विशिष्ट प्रकार आढळला आहे जो प्रतिकारक यंत्रणेपासून लपून राहूनच कर्करोगाच्या पेशींचा फैलाव करतो. कॅन्सर बायोलॉजीमध्ये आणि पर्यायाने कर्करोगावरील प्रभावी उपचार शोधण्यातही ‘लिपिड’ हे मेदयुक्त संयुगच महत्त्वाचे ठरते, असे यापूर्वीही संशोधकांना वाटत होते. मॅरिलुझ सौला यांनी सांगितले की सामान्य कर्करोग पेशी स्वतःच ‘मला खा’ अशा पद्धतीचे संकेत रोगप्रतिकारक यंत्रणेला देतात, पण आता या पेशींनी स्वतःमध्ये सुरक्षात्मक बदलही केलेले दिसतात. कर्करोगाच्या वाढीतील लिपिडची भूमिका यामुळे वेगळे चित्र निर्माण करते. अर्थात कर्करोगाच्या पेशी लिपिड मेटाबॉलिझममध्ये बदल घडवतात हे यापूर्वीही माहिती होते. अशा बदलामुळेच सामान्य, निरोगी पेशींच्या तुलनेत या पेशींची बेसुमार वाढ होते व ट्युमर विकसित होतो. या पेशींच्या लिपिडमधील मेद रेणूंचा साठा वाढला जात असतो व त्यामुळे ट्युमरची वाढ होते. कोणत्या प्रकारच्या लिपिडशिवाय कर्करोग राहू शकत नाही याचाही संशोधकांनी शोध घेतला होता व ‘स्फिगोलिपिड’ हे त्याचे उत्तर मिळाले होते. जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान लुडविग विल्हेम यांनी सन १८०० च्या दशकात त्याचा शोध घेतला होता. लिपिड केवळ इंधनाचे काम करीत नाहीत तर ते कर्करोगाच्या पेशींसाठी संरक्षणात्मक यंत्रणेचेही काम करतात. आता भविष्यातील संशोधनामध्ये हे सर्वच प्रकारच्या कर्करोगामध्ये घडते का हे पहावे लागणार आहे. (How do cancer cells trick the immune system?)

कर्करोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्याची उपचार पद्धत विकसित
शरीराची रोग प्रतिकारशक्ती ही अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी सहाय्य करीत असते. कर्करोगावर मात करण्यासाठी अशा प्रतिकारशक्तीवर आधारित एक उपचारपद्धती विकसित करण्यात आलेली असून चिलीतील सैंटियागो येथे या पद्धतीचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यात मानवी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात, असे संशोधक क्लॉदियो अॅक्युना यांनी सैंटियागो विद्यापीठात सांगितले. अॅक्युना यांनी सांगितले की, या उपचारपद्धतीत कर्करोगाविरोधी लस तयार करणे शक्य आहे. कर्करोगाची लक्षणे दिसत असलेल्या लोकांना ती देता येईल व त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढून कर्करोगाच्या पेशी मारल्या जातील. कर्करोग होणारच नाही असे नाही, पण त्यासाठी ही पर्यायी उपचारपद्धती ठरणार आहे. इतर अवस्थांमध्ये रुग्णांवर चाचणी करण्याकरिता परवानगी लागणार आहे, पण या प्रकल्पामुळे कर्करुग्णांचे आयुर्मान निश्चित सुधारेल व सुसह्य होईल. पारंपरिक उपचारपद्धतींना पूरक अशी ही उपचार पद्धती असेल. त्यामुळे कर्करोगावरचा जागतिक पातळीवरील उपचार खर्च इतर उपचारपद्धतींच्या तुलनेत ७० टक्के कमी होईल. या प्रतिकारशक्तीवर आधारित पद्धतीने स्तन, त्वचा, फुफ्फुसे, आतडे, पूरस्थ ग्रंथी यांचा पुढच्या अवस्थेत गेलेला कर्करोगही बरा करणे शक्य आहे. या पद्धतीचे कुठलेही इतर वाईट परिणाम नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोगाचे १ कोटी रुग्ण नव्याने सापडतात. How do cancer cells trick the immune system?
