
मध्यप्रदेशमधील उज्जैन इथल्या निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया 2024’चा किताब पटकावला आहे. तीस स्पर्धकांना मात देत तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. यानंतर ती ‘मिस वर्ल्ड’ या स्पर्धेसाठी तयारी करणार आहे. (Nikita Porwal of Ujjain won the title of ‘Miss India’)
मध्यप्रदेशच्या निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024’चा किताब पटकावला आहे. बुधवारी रात्री मुंबईत या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडला. मध्यप्रदेशमधल्या उज्जैन इथल्या निकिताने टीव्ही अँकर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती अभिनय आणि रंगभूमीकडे वळली. आतापर्यंत निकिताने 60 हून अधिक नाटकांमध्ये काम केलंय. इतकंच नव्हे तर तिने ‘कृष्ण लीला’ हे 250 पानी नाटकसुद्धा लिहिलं आहे. तिने एका चित्रपटातही काम केलं असून तो चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. निकिताचा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. बुधवारी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये गतवर्षीची विजेती नंदिनी गुप्ताकडून निकिताला ‘फेमिना मिस इंडिया’चा मुकूट घालण्यात आला. तर अभिनेत्री नेहा धुपियाने तिला ‘मिस इंडिया’चा सॅश घातला. या सौंदर्यस्पर्धेत केंद्रशासित प्रदेशाची रेखा पांडे दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि गुजरातच्या आयुषी ढोलकियाने तिसरं स्थान पटकावलं.
या सौंदर्यस्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अभिनेत्री संगीता बिजलानीचा धमाकेदार परफॉर्मन्सही यात पहायला मिळाला. तर राघव जुयाल आणि अनुषा दांडेकर यांसारख्या सेलिब्रिटींनी रेड कार्पेट गाजवलं. यंदा परीक्षकांमध्ये अनुषा दांडेकरचाही समावेश होता. देशभरातून त्यांनी 30 जणांची निवड केली होती. या तीस जणांमध्ये ‘मिस इंडिया’चा मुकूट जिंकण्यासाठी चुरस रंगली होती. ग्रँड फिनालेपूर्वी त्यांना बरीच ट्रेनिंग देण्यात आली होती.