“जागतिक हिवताप दिन” हा दि. २५ एप्रिलला दरवर्षी साजरा करण्यात येतो. हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरीकांपर्यंत माहिती पोचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दि. २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्याचे योजिले आहे. या वर्षाचे घोषवाक्य “चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा” असे आहे. भारत सरकारच्या धेय धोरणानुसार राष्ट्रीय हिवताप कार्यक्रमाचे माध्यमातून हिवतापाचे दुरिकरण सन २०२७ अखेरपर्यत करायचे असल्याने त्याबाबतचे ध्येय व नियोजन करण्यात येत आहे.
सर्वसाधारण माहिती –
हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतूपासून होतो. जगामध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे ३०० ते ५०० दशलक्ष लोकांना हिवताप होतो. हिवतापाच्या जंतूचे फॅल्सीफरम व व्हायव्हॉँक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. हिवतापाचा प्रसार अँनाफिलीस डासाच्या मादीमार्फत होतो. हिवतापाचा अधिशयन काळ हा १० ते १२ दिवसाचा आहे.
रोगजंतूची माहिती
रोग प्रसार कसा होतो हिवतापाचा प्रसार अँनाफिलीस जातीच्या मादी डासांमार्फत होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठून राहिलेल्या उदा. स्वच्छ पाण्याची डबकी, भात शेती, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या इ. मध्ये होते. डास हिवताप रुग्णास चावतो त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन ते जंतु डासाच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. मनुष्याच्या शरीरात हे जंतू लिव्हर मध्ये जातात तेथे त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडीवाजुन ताप येतो.
आजाराची लक्षणे –
थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येवू शकतो, ताप नंतर घाम येवून अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात तीव्र डोकेदुख मान ताठ होणे, झटके येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसू शकतात. प्रतिबंधात्मक उपाययोजना पाणी साठविण्याची भांडी घट्ट झाकून ठेवा. आठवड्यातून एकदा सर्व पाणी साठे आतून घासून-पुसून कोरडे करा व दुसऱ्यादिवशी पाणी भरा. नारळाच्या करवंट्या, टायर, बाटल्या व प्लास्टिक डबे नष्ट करा व यामध्ये पाणी साठा होऊ देऊ नका. झोपताना मच्छरदाणीचा वापर करा किंवा डासांना पळून लावणाऱ्या अगरबत्या, मँटचा वापर करा. घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा. सांडपाण्याची विल्हेवाट शोषखड्यातून लावा. परसबाग फुलवा. घराच्या परिसरातील डबकी बुजवा किंवा वाहती करा. घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा. मोठ्या पाणीसाठ्यामध्ये गप्पी मासे सोडा. सेप्टी टँक च्या व्हेटपाईपला वरच्या बाजूला नायलॉन जाळी बसून घ्या व डास उत्पत्ती थांबवा. नेहमी पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत. आपल्या घराभोवताली पाणी साचू देऊ नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करून रिकामे करावेत या साठयातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरड्या करून पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.
