वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
- बारावी अथवा पदवीनंतर पुढे काय? असा प्रश्न प्रत्येक पाल्याच्या पालकांना पडलेला असतो. सध्याचा जमाना हा विद्यार्थ्यांचा आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा ठरवलेली असतेच. असे विद्यार्थी नेहमीच यश संपादन करण्यास यशस्वी होतात. मित्रांनो, असंख्य क्षेत्रात विविध करिअर नेहमीच आपली वाट पाहत असते. आपणास फक्त त्यांची तोंडओळख करून घेणे गरजेचे आहे. इंटरनेटच्या या युगात आपणास ते खूपच सोपे झाले असून, इंटरनेटचा करिअरच्या दृष्टीने वापर करणे गरजेचे आहे. आज आपण ओटी टेक्निशियन’ कोर्सबाबत जाणून घेणार आहोत. तरचला, या क्षेत्रासाठी लागणारी पात्रता, करिअर संधी इत्यादी गोष्टींचा धावता आढावा घेऊया.
‘ओटी टेक्निशियन’ म्हणजे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. वैद्यकीय क्षेत्रात ओटी हा एक असा विभाग आहे, जिथे रोजगाराच्या वेळोवेळी संधी निर्माण होतात. जर आपण ओटीशी संबंधित पदवी वा डिप्लोमा ग्रहण करता, तर वैद्यकीय क्षेत्रात ओटी टेक्निशियनच्या रुपात रोजगाराच्या विविध संधी आपल्यासाठी उपलब्ध होतात. ओटी कोर्स मुख्य रुपात दोन प्रकारचे असतात. एक तर डिप्लोमा इन ओटी टेक्निशियन व दुसरा बीएससी इन ओटी टेक्निशियन. आपण यापैकी कोणताही कोर्स करू शकता.
ओटीमधील डिप्लोमा कोर्स दोन वर्षांचा असतो व बीएससी इन ओटी हा कोर्स तीन ते चार वर्षांचा असतो. या कोर्सच्या फीबाबत विचार करायचा झाल्यास, वार्षिक ३५ ते ८० हजारांपर्यंत खर्च जातो. जर आपण सरकारी महाविद्यालयात शिक्षण घ्याल, तर तेथील फी काही प्रमाणात कमी असू शकते. सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपणास प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे हा वरचेवर विषय सोपा वाटत असला, तरी तो सोपा नाही.
ओटी टेक्निशियनमधील संधी
सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी आहेत. यात ओटी टेक्निशियन देखील एक प्रमुख विषय आहे. सध्याच्या काळात जेवढ्या शस्त्रक्रिया करणारे रुग्णालये, नर्सिंग होम आणि ट्रॉमा सेंटर आहेत, त्यात ओटी टेक्निशियनची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, कारण शस्त्रक्रियेदरम्यान ओटी टेक्निशियन हा डॉक्टरसाठी खूप मदतीचा ठरणारा व्यक्ती असतो. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचे योगदान महत्त्वाचे असते. त्याचमुळे ओटी टेक्निशियनच्या रुपात शानदार करिअर घडवले जाऊ शकते. खासगी रुग्णालयाशिवाय सरकारी रुग्णालयात देखील येथे करिअरच्या चांगल्या संधी आहेत. ऑपरेशन थिएटर असिस्टंट (ओटी असिस्टंट) हे पद केंद्र व राज्य सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या रुग्णालये (जसे की, एम्स, एसआयसी इत्यादी), वैद्यकीय शिक्षण संस्था, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत रुग्णालय, काही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या अंतर्गत रुग्णालय (जसे की, एनपीसी आयएल) मध्ये सक्रीय असते. एकूण काय तर या क्षेत्रात नोकरीची काही कमतरता नाही.
पात्रता
ओटी टेक्नॉलॉजी कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याने फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी या विषयांतून बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ज्यानंतर ओटी टेक्नॉलॉजीशी संबंधित पदवी वा डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेता येऊ शकेल. नोकरीची संधी जेव्हा आपण ओटी टेक्नॉलॉजी वा ओटी टेक्निशियनशी संबंधित कोर्स करता, त्यानंतर आपण ऑपरेशन थिएटर असिस्टंट वा ओटी असिस्टंट वा ओटी टेक्निशियनच्या रुपात आपली कारकिर्द सुरू करू शकता.
कार्याचे स्वरूप
ऑपरेशन थिएटर टेक्निशियनवर शस्त्रक्रियेआधी व शस्त्रक्रियेच्या काळात ऑपरेशन थिएटर व शस्त्रक्रियेदरम्यान उपकरणांची योग्य हाताळणी व देखभाल करण्याची जबाबदारी असते. ओटी टेक्निशियन शस्त्रक्रिया प्रक्रियेदरम्यान डॉक्टर व एनेस्थेटिक टीमची मदत देखील करतो, तसेच शस्त्रक्रियेत वापरात येणाऱ्या उपकरणांची सफाई व निगा राखणे, शस्त्रक्रियेआधी रुग्णाची वैद्यकीय नोंद व त्याच्याशी संबंधित विविध त्रुटींचा विचार करणे, शस्त्रक्रियेवेळी योग्य उपकरण हे डॉक्टरांना देणे, शस्त्रक्रियेनंतर रुग्ण व ऑपरेटिंग टेबलची साफ-सफाई करणे, अनुपयोगी वस्तूंना फेकून देणे व शस्त्रक्रियेसाठी उपयोगी असणारे उपकरण व विविध साहित्यांची साफ-सफाई व निगा राखण्याचे काम ओटी टेक्निशियनचे असते.
कौशल्य
ओटी टेक्निशियनच्या कौशल्याबाबत बोलायचे झाले, तर त्याला ओटीशी संबंधित प्रोटोकॉलची माहिती असायला हवी. तो नेहमीच सक्रिय असावा. औषधांचे त्याला योग्य ज्ञान असावे. व्यवहार कौशल्यात चतुरता असावी. संसर्ग नियंत्रणाचा त्याला अभ्यास असावा. ओटी उपकरणांबाबत योग्य माहिती असावी. ओटी उपकरणांची योग्य काळजी घेण्यासह सतर्क व धाडसी देखील असावा.
मित्रांनो, आपण असंख्य वेळा ओटी टेक्निशियनबाबत कुठे ना कुठे वाचलेले असते वा पाहिलेले असते. वैद्यकीय शाखेतील विविध पदांना ज्याप्रमाणे एक महत्त्व आहे, तसेच महत्त्व ओटी टेक्निशियनबाबतही आहे. हे क्षेत्र खूप मोठे असून, ते केव्हाच बंद पडणारे नाही. ओटी टेक्निशियनशिवाय डॉक्टरांना शस्त्रक्रिया करताना असंख्य अडचणी येतात; पण ओटी टेक्निशियन होणे ही काही सामान्य बाब नाही. फक्त वैद्यकीय बाबींचाच नाही, तर उपकरणांची योग्य माहिती व हाताळणी देखील त्याला करावी लागते. सर्वच गोष्टींचे योग्य ज्ञान त्याला आत्मसात करावे लागते. ज्यासाठी हा विषय अथक मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवे आव्हानच आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकदा या गोष्टीचा विचार करायला हवा. तूर्तास एवढेच.
– राकेश ग.खेडेकर