‘महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेतील एक देदीप्यमान तारा’ असे आताशा डॉ. पंजाबराव देशमुखांचे वर्णन केले जाते. याच परंपरेतील जे देदीप्यमान तारे होऊन गेले त्यांत अग्रपूजेचा मान म. जोतिराव फुले यांचेकडे जातो. महात्मा फुलेंना आधुनिक भारतातील मूलगामी समाजपरिवर्तनाचे ‘आद्य प्रवर्तक’ म्हणून सामाजिक इतिहासाने आताशा मान्य केले आहे.
आपल्या या महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या नेत्यांमध्ये कोल्हापूरचे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान तेवढेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकोणविसाव्या शतकात म. जोतिराव फुल्यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून जे झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढविले ते शाहू छत्रपतींनी.
याच परंपरेतला एक महामानव म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास डोळे भरून पाहातो ते व्यक्तिमत्व आहे डॉ. आंबेडकरांचे. डॉ. सआंबेडकरांच्या जडणघडणीमध्ये या देशातील दोन मराठा नरेशांचा सिंहाचा वाटा आहे, हे देखील आताशा सर्वांनाच ज्ञात आहे.
त्यामानाने डॉ. पंजाबरावांचे व्यक्तिमत्व स्वयंभू आहे. तसे पाहिले तर डॉ. पंजाबराव देशमुख, महात्मा फुले, राजर्षि शाहू आणि डॉ. आंबेडकरांच्या खांद्यावर उभे राहिलेले विदर्भातील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व होय! या व्यक्तिमत्वाची खरी ओळख विदर्भाला व्हायला देखील बराच मोठा कालावधी जावा लागला. डॉ. पंजाबराव देशमुख या विदर्भाच्या भूमीवर उदयाला आलेला एक समृध्द असा विचार होय. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवातच मुळी श्री श्रद्धानंद वसतिगृहाचे स्थापनेपासून केली, त्यामध्ये त्यांचा हेतू स्पष्टपणे प्रतीत होतो. काय होता तो हेतू ? ‘सर्व जाती-पातीच्या मुलांनी एकत्र राहाणे, खाणे-पिणे म्हणजे महान समाजक्रांतीच होय !’ म. फुलेंना हेच अभिप्रेत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर त्यांचे जिवाभावाचे मित्रच होते. १९२७ साली ते डॉ. पंजाबरावांच्याच निमंत्रणावरून अमरावतीला आले होते. अमरावतीत बुधवारा विभागातील इंद्रभुवन थिएटरमध्ये त्यांचेच अध्यक्षतेखाली एका परिषदेत “अंबादेवीचे मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा” असा निर्णय झाला होता. डॉ. आंबेडकरांच्या ‘शेड्यूल कास्ट फेडरेशन’च्या विदर्भ विभागाचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख होते, हे देखील सिद्ध झालेले आहे.
डॉ. पंजाबरावांचा त्यावेळी गाजलेला तो आंतरजातीय विवाह “जाती ठेवायच्या की तोडायच्या”- या त्यांचे त्यावेळच्या निर्धाराचा निदर्शक होता. डॉ. पंजाबरावांच्या समाजकार्याची व राजकारणाची ती गरूडभरारी पाहून, मोठमोठे विस्मयचकीत झाले होते ! १९२६ साली परदेशातून परत आल्यावर १९२८ मध्येच ते त्यावेळच्या जिल्हा कौन्सिलचे लोकनिर्वाचित अध्यक्ष झाले होते, आणि १९३० मध्येच त्यांनी बॅ. रामराव देशमुखांसारख्या मातब्बर पुढाऱ्याचा त्यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत ८०० मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश मिळविला होता. आणि एवढेच नव्हे, तर त्यावेळच्या मध्यप्रदेशाचे मंत्रीमंडळातही ते विराजमान झाले होते. भारतातला सर्वात तरुण मंत्री असा त्यांचा लौकिक त्यावेळी सर्वत्र पसरला होता आणि त्यामुळेच की काय, त्यांच्या विषयी एक प्रकारची ‘धडकी’ त्यांचे राजकीय प्रतिस्पर्ध्यात निर्माण झाली होती.
त्यांना एकदा जीवे मारण्याचा प्रयोग याच अमरावती शहरात झालेला त्यावेळच्या लोकांनी पाहिला होता. त्यानंतर डॉ. पंजाबरावांना बदनाम करून जीवनातून उठविण्याचाही एक प्रयत्न विरोधकांनी करून पाहिला, पण तो सफल मात्र झाला नाही.
या पार्श्वभूमीवर १९३२ साली त्यांनी स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था, आणि त्या निमित्ताने डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व हैद्राबाद संस्थानचे ‘अधिपती’ आला हजरत निजाम शहा यांचा १९३९ ते १९४५ च्या दरम्यान आलेला तो संबंध व त्यातून त्याकाळात विदर्भात काही कट्टर हिंदुत्ववाद्यांनी माजवलेला तो अभूतपूर्व असा ‘गदारोळ’ समजून घेणे मोठे उद्बोधक होईल. त्याचाच हा धावता आढावा :-
सन १९३२ चा तो काळ. १९३२ च्या डिसेंबरात श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यावर छोट्या मोठ्या देणग्यांच्या भरवशावर आणि कधी कधी गावोगाव जाऊन संस्था चालविण्यासाठी झोळ्या फैलावून हा जगन्नाथाचा रथ कसातरी पुढे ढकलणे चालू होते. आर्थिक डबघाईला आलेल्या या संस्थेला कुणाच्या तरी मोठ्या आधाराची गरज होती.
त्या काळी निजाम सरकारला इंग्रजांकडून वऱ्हाडसाठी सालाना ३५ लाख रुपयांची खंडणी दिली जात होती. १९३९ ला हैद्राबादला निजामाचा ‘हीरक महोत्सव’ साजरा व्हावयाचा होता. ही संधी साधून निजाम सरकारकडून वऱ्हाडातील उर्दू शिक्षणासाठी काही आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यावा या संदर्भात विदर्भातील मुस्लिम नेते विचार करीत होते. या पार्श्वभूमीवर खामगावच्या अंजुमन उर्दू हायस्कूलच्या कार्यकारी मंडळाची सभा झाली आणि तीत पांढरकवड्याचे वकील खानसाहेब अब्दुल रौफशहा यांचे एक शिष्टमंडळ हैद्राबादला पाठवावे असे ठरले. खानसाहेब हे एक प्रभावी व्यक्तिमत्व होते! ते उर्दू भाषेचे उत्तम साहित्यिक व वक्ते होते. खिलाफतची चळवळ, स्वदेशीची चळवळ, प्रांतिक मुस्लिम लीगचे अध्यक्ष या नात्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक आगळीच झळाळी लाभली होती; आणि याहीशिवाय त्यांचे निजामदरबारी एक विशिष्ट प्रकारचे वजन होते.
या पार्श्वभूमीवर काही मुस्लिम नेत्यांना घेऊन त्यांनी हैद्राबादच्या आला हजरत निजामशहाची भेट घेऊन त्यांना आपला मनोदय कळविला. पण त्यांना जे उत्तर मिळाले ते अनपेक्षित होते. त्यांना सांगण्यात आले की, “आपले शिष्टमंडळ नुसते मुस्लिमांचे आहे. यात ‘हिंदू’ प्रतिनिधी आपण आणू शकत असाल तर आपल्या मागणीचा अवश्य विचार होईल.’
हे उत्तर म्हणजे खानसाहेबांच्या दृष्टीने एक मोठाच पेच होता, कारण १९३७-३८ पासूनच हिंदू-मुसलमानांत तेढ उत्पन्न होऊन त्यावेळी वातावरण बरेच तापलेले होते. इंग्रजांनी ‘डिव्हाइड ॲण्ड रूल’च्या नावे लावलेल्या विषवृक्षाला आलेलं हे एक विषारी फळ होतं.
खानसाहेबांना हा जसा पेच होता तसाच हा पेच सुटला तर निजाम दरबारासाठी हा एक ‘शुभशकुन’ ठरणार होता. हिंदु-मुसलमान तेढीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे ‘संयुक्त शिष्टमंडळ’ ही तेढ कमी करण्याचे दृष्टीने चांगली घटना होती. सोबतच वऱ्हाड इंग्रजांकडून परत कसा मिळविता येईल याचाही जागरूकतेने विचार करणाऱ्या निजामशहाच्या दृष्टीने हा एक शुभयोग होता, एक दूरदर्शी पवित्रा होता !
खानसाहेब रौफशहा यांनी आपले एक जिव्हाळ्याचे मित्र यवतमाळचे श्री. ना. बा. पाटील यांचा सल्ला घेतला. हिंदू-मुसलमान तेढीने भारलेल्या त्या प्रक्षुब्ध वातावरणात हिंदूंचे सहकार्य लाभणे हे असंभव होऊन बसलेले; आणि अशा वेळी हिंदूंना, “मुसलमान राजाकडे दान मागायला चला” – असे म्हणण्याचे दुःसाहस तरी कोण करणार? पण श्री. ना. बा. पाटलांना यावेळी आठवल्या त्या विदर्भातील दोन व्यक्ती ! एक पंढरीनाथ पाटील आणि दुसरी डॉ. पंजाबराव देशमुख ! जाती, पंथ, पक्ष, परंपरा, धर्म यांच्यापुढे जाऊन मानवतेच्या व जनहिताच्या दृष्टीने ते सांप्रत स्थितीकडे पाहू शकत होते. रौफशहा व मुजफ्फर हुसेन डॉ. पंजाबराव देशमुख मध्यप्रदेश मंत्रिमंडळात असताना कायदेमंडळाचे सदस्यही होतेच, त्यामुळे त्यांनाही आशेचा किरण दिसला आणि डॉ. पंजाबरावांची भेट ठरवून खानसाहेब रौफशहा श्री. ना. बा. पाटील व इतर आपल्या सहकाऱ्यांसमवेत डॉ. पंजाबराव देशमुखांना भेटले. भाऊसाहेबांनी कुठलीही अढी वा किंतू न ठेवता त्यांचे मनमोकळेपणाने स्वागत केले. भाऊसाहेब म्हणजे एक चालतीबोलती पारदर्शी मानवता जिथे जातपात, पंथभेद, पक्षधर्म या साऱ्याच अभेद्य वाटणाऱ्या भिंती गळून पडतात आणि एकप्रकारची मानवीय पारदर्शिता आपल्यासमोर उभी ठाकते, याचा पडताळा त्या शिष्टमंडळाला तेव्हाच येऊन चुकला होता. शिष्टमंडळाची सारी कैफियत ऐकून घेताना त्यांना एका डोळ्याने दिसला मागास आणि शिक्षणवंचित ‘मुसलमान’ समाज आणि दुसऱ्या डोळ्याला दिसला विदर्भातील खेड्यापाड्यांत शिक्षणावाचून खितपत पडलेला अशिक्षित असहाय ‘ग्रामीण समाज’. आणि दोन्ही डोळ्यांतील चित्रांची सरमिसळ झाल्याने त्यांच्या लक्षात आले- हा तर कदाचित आपल्याच उद्दिष्टपूर्तीचा क्षण! आणि त्यामुळेच त्यांनी क्षणार्धात त्या शिष्टमंडळाला होकार भरला. अशक्यप्राय वाटणारी ‘हिंदु-मुस्लिम’ युती इतक्या सहजासहजी नजरेच्या टप्प्यात आलेली पाहून मुस्लिम शिष्टमंडळाला अतिशय आनंद झाला.
डॉ. भाऊसाहेबांनी स्वतः निजामदरबारी पत्रव्यवहार केला, मुस्लिम शिष्टमंडळाच्या कैफियतीतील सत्यासत्यता पडताळून घेतली आणि हैद्राबादला जायचा एक कार्यक्रम आखला. या योजनेनुसार श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख, यवतमाळचे श्री. ना.बा. पाटील, मध्यप्रांत वऱ्हाड सरकारचे मंत्री ना. विठ्ठल बंधूजी चौबळ, चिखलीचे श्री. पंढरीनाथ पाटील, पांढरकवड्याचे ॲड. अब्दुल रौफशहा, अकोल्याचे मोहिबूल हक, खामगावचे अब्दुल रहमान खान, पांढरकवड्याचे नरसिंगराव येलमे पाटील, सरफराज खान, जहागिरदार काद्री, मुझफ्फर हुसेन खतीब, सेठ महंमद हरून, मजीदखान- इत्यादींचे एक संमिश्र शिष्टमंडळ तयार झाले. संपूर्ण विदर्भातून एकेक प्रतिनिधी घेतल्याने हे शिष्टमंडळ जणू संपूर्ण विदर्भाचेच प्रतिनिधित्व करीत होते. हे संयुक्त शिष्टमंडळ हैद्राबादेस पोहोचताच अनेक सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्यांचे रेल्वे स्टेशनवर हारतुरे व पुष्पगुच्छांनी स्वागत केले. चार शाही मोटारगाड्या दिमतीला देऊन त्यांना सुसज्जित निवासस्थानी पोहोचविण्यात आले. बादशाही बडदास्त व राजेशाही सोपस्कारात पाच दिवस त्यांचा आतिथ्य- सत्कार झाला.
वऱ्हाडच्या वतीने एक सुंदर मानपत्र आला हजरत निजामशहांना भेट देण्यात आले. त्यात वऱ्हाडातल्या मागासलेल्या गरीब लोकांची शिक्षणाची सोय करण्याची विनंती करण्यात आली. हे मानपत्र वाचून दाखविण्यापूर्वी ज्युबिली हॉलमधील त्या शाही दरबारात डॉ. पंजाबराव देशमुख, श्री. पंढरीनाथ पाटील व अब्दुल रौफशहा यांची निजामशहाच्या गौरवपर भाषणे झालीत. आला हजरत निजामशहांनीही या संयुक्त शिष्टमंडळाच्या संयुक्त मानपत्राचा सानंद स्वीकार करून शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचा गौरव केला व धन्यवाद दिले.
गेल्या शंभर वर्षांच्या निजामशाहीच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय प्रसंग होता. वऱ्हाडचे शिष्टमंडळ हैद्राबादेहून निघताना शिष्टमंडळाला निरोप देण्याच्या कार्यक्रमात ‘प्रिन्स ऑफ बेरार’ यांनी वऱ्हाडभेटीचे डॉ. पंजाबरावांनी दिलेले निमंत्रण स्वीकारले. आला हजरत निजामशहांनीही या निमंत्रणाला दुजोरा दिला आणि आपली स्वीकृती प्रदान केली. याच समारंभात श्री शिवाजी शिक्षण संस्थेला वीस हजार व अंजुमन हायस्कूलला वीस हजारांच्या देणगीचा पहिला हप्ता बहाल करण्यात आला. दुसरा हप्ता युवराजांच्या वऱ्हाडच्या आगमनानंतर देण्यात येईल असेही अभिवचन मिळाले.
या वीस हजारांच्या देणगीने शिवपरिवारात आशेची नवीन प्रभात उगवली. पण त्याचवेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कानाकोपऱ्यात या देणगीबद्दल सुंदोपसुंदी सुरू झाली. खुद्द श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळातील काही सदस्य डॉ. पंजाबरावांच्या निजामभेटीची जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळात विघटन होण्याची चिन्हे दिसू लागली. हे सर्व पाहून डॉ. भाऊसाहेब स्तब्ध झाले. वीस हजारांची देणगी मिळवताना त्यांच्या पदरचे तीन हजार रुपये खर्च झाले होते, त्याची त्यांना पर्वा नव्हती. पण आपलेच लोक विरोधकांच्या प्रचाराला बळी पडून आपल्याविरुद्ध जातात हे पाहून त्यांचे मन विषण्ण झाले होते. ही परिस्थिती ओळखून एके दिवशी सायंकाळी काशीराव बापू देशमुख आणि शामराव गुंड भाऊसाहेबांच्या बंगल्यावर गेले. या दोन प्रतिष्ठित व्यक्तींच्या समोरच भाऊसाहेबांनी बेजबाबदारपणे वागणाऱ्या व बोलणाऱ्या ‘त्या’ दोन व्यक्तींची हजेरी घेतली. त्यांच्या बेजबाबदार कृत्याबद्दल बापूसाहेब देशमुखांनी खेद व्यक्त केला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पहिली घटना संयुक्त जबाबदारीच्या तत्त्वावर आधारित नव्हती, म्हणून या नव्या परिस्थितीच्या प्रकाशात दुसरी घटना तयार करून डॉ. भाऊसाहेबांना ‘तहहयात अध्यक्ष’ करावे यावर सर्वाचे एकमत झाले.
दुसरी घटना तयार झाली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या आमसभेत काशीराव बापूंनी तशी सूचना आणताच तिला शामराव गुंड यांनी अनुमोदन दिले. ही नवीन घटना बिनविरोध पास झाली. या आमसभेच्या वेळी स्वतः भाऊसाहेब मात्र मुद्दाम अनुपस्थित राहिले.
नवीन घटनेप्रमाणे डॉ. भाऊसाहेब श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव अध्यक्ष बनले व कोषाध्यक्षाची माळ श्री. एस. व्ही. देशमुखांच्या गळ्यात पडली. निजामच्या दरबारातून आणलेली वीस हजाराची देणगी संस्थेच्या खजिन्यात जमा झाली. या वीस हजारांच्या निधीतून मोर्शी रोडवरील पटांगणात १६ खोल्या व दोन राऊंड हॉल असलेली एक आलिशान इमारत मूर्त रूप घेऊ शकली.
निजामाच्या युवराजांना ‘प्रिन्स ऑफ बेरार’ ही पदवी इंग्रज सरकारकडून लाभली होती. त्यांच्या देणगीच्या स्मरणार्थ सदर इमारतीचे नामकरण ‘प्रिन्स ऑफ बेरार होस्टेल’ असे करण्यात आले. त्याचा अनावरण समारंभ खास युवराजांच्या हस्ते भाऊसाहेबांनी आयोजित केला. निजामंचे युवराज अमरावतीला भेट देणार ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली. वीस हजार देणगीच्या रूपात रोख मिळाले तेव्हाच त्यातून भलतेसलते अर्थ काढून अफवांचे पेव फोडण्यात आले होते. ‘मुसलमान- मराठे एक झाले, ते वऱ्हाडात मोगलाई आणणार’ अशा हेतुपुरस्सर प्रचाराने भोळ्या जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले होते. आता तर कल्पनाविलासाला जणू ऊत आला होता. विविध क्षेत्रांतील विरोधकांनी जणू एक संयुक्त आघाडीच त्यासाठी उघडली होती. अन्य शहरांमधून देखील या आगमनावर आगपाखड सुरू केली होती. नागपूरपासून पुण्यापर्यंतच्या सर्व वृत्तपत्रांनी, ‘डॉ. पंजाबरावाने निजामाला वऱ्हाड गहाण टाकला!’, ‘स्वार्थासाठी निजामाला शरण जाऊन वऱ्हाड विकला!’ अशा मथळ्यांखाली विषारी प्रचार केला आणि या प्रचारानं गोंधळलेले असंख्य भाबडे लोक भाऊसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहू लागले.
निजाम राजपुत्राच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या समारंभाला विरोध करण्यासाठी ‘हिंदुत्ववादी’ कार्यकर्त्यांची तयारी जोरात सुरू झाली. ब्रह्मविद्या मंदिरातील एका सभेत श्री. वि. ध. देशपांडेंनी डॉ. पंजाबराव देशमुखांवर कडाडून हल्ला केला आणि सत्कारविरोधी आंदोलन उभे करण्याची धमकी देऊन स्वयंसेवकांची एक संघटना उभारली. सर्व पक्षांतील जहाल, मवाळ, राष्ट्रीय-परराष्ट्रीय, देशी-विदेशी प्रवृत्ती विरोध करण्यात पुढे आल्या. डॉ. भाऊसाहेबांचे काही जवळचे लोकही या प्रचाराला बळी पडले आणि विरोधी सूर लावू लागले. अमरावतीतील प्रसिद्ध सहकार महर्षी लक्ष्मणराव भोकरेंनी ब्रह्मविद्यामंदिरात डॉ. पंजाबराव विरोधी सभा घेतली. आणि निजाम युवराजाच्या सत्कार समारंभावर त्यांनी प्रखर टीका करण्यास सुरुवात केली. मात्र त्या सभेत डॉ. पंजाबराव येऊन पोहोचताच त्यांनी तेथून पळ काढला.
दुसरी सभा सुप्रसिद्ध कम्युनिस्ट पुढारी भाई माधवराव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली ब्रह्मविद्या मंदिरातच घेण्यात आली. या सभेत भाई शंकरराव दिघडेंनी आपल्या भाषणात डॉ. पंजाबराव देशमुख सरंजामी वृत्तीचे आहेत अशी टीका केली आणि या विधानाला डॉ. पंजाबराव देशमुख विरोधकांनी पाठिंबा दिला. या विधानावर वीर उत्तमराव मोहित्यांनी आक्षेप घेतल्यावर भाई माधवराव देशपांडे यांनी वरील विधान हे शंकरराव दिघडेंचे वैयक्तिक विधान आहे आणि ही कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत विधाने नव्हेत अशी मल्लीनाथी केली; आणि लगेच दुसऱ्या दिवशी भाई दिघडेंनी स्वतःची चूक कबूल करून आपली विधानं मागे घेतली.
हिंदुत्वनिष्ठांच्या भाऊसाहेब विरोधी आघाडीत वीर वामनराव जोशीही सामील झाले. निजाम राजपुत्र भेट विरोधी या आंदोलनात वीर वामनराव जोशींनी एका विराट सभेचे आयोजन केले. या सभेत ‘डॉ. पंजाबराव देशमुख निमाजाचे पक्षपाती आहेत’, ‘त्यांनी वऱ्हाड निजामाला विकला’ -अशी विधानं केली. त्यांच्या स्वतंत्र हिंदुस्थान या साप्ताहिकातही हीच विधाने छापून आली होती. या सभेत डॉ. पंजाबराव स्वतः जातीने हजर राहिले आणि या विधानांना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. त्यावेळच्या भाषणात भाऊसाहेब म्हणाले, “निजामाच्या ओट्यात वऱ्हाड टाकायला मी काही आज वऱ्हाडचा मालक नाही. मी क्हाडला विकणारा कोण ? मी कोणाच्या दृष्टीने चांगला असेन, कोणाच्या दृष्टीने वाईटही असेन. कोणाच्या दृष्टीने राष्ट्रीय तर कोणाच्या दृष्टीने परराष्ट्रीयही असेन. पण मी सतत जे जे करतो ते ते वऱ्हाडच्या जनतेच्या उद्धारासाठी करीत असतो. येथल्या जातीय प्रतिगामी धेंडांना वेळोवेळी वऱ्हाडच्या प्रेमाचा पान्हा फुटतो. पण याद राखा, वऱ्हाडवर आणि वऱ्हाडच्या जनतेवर डॉ. पंजाबराव देशमुखांपेक्षा जास्त प्रेम करणारा सपूत अजून जन्माला आला नाही. “
त्याच महिन्यात रायपूर येथे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचे अध्यक्षतेखाली अ. भा. हिंदुसभेचे अधिवेशन झाले. त्यात अमरावती येथील ‘प्रिन्स ऑफ बेरार’च्या आगमनाचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी हजारो रुपयांचा निधी व शेकडोंच्या स्वयंसेवक दलाची योजना आखणारा ठराव विशेष गाजला. हिंदुमहासभेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख हे भाऊसाहेबांचे निकटतम सहकारी आणि प्रांताध्यक्ष श्री. बाबासाहेब खापर्डे यांचे भाऊसाहेबांवर निर्व्याज प्रेम असल्याने त्यांना घटनेचे गांभीर्य चट्कन कळले व त्यांनी तो ठराव म्हणजे वऱ्हाडात असंतोष माजविण्यासारखे होईल, असे स्पष्टपणे सांगून त्या ठरावाला कडाडून विरोध केला. त्याप्रसंगी बाबासाहेब खापर्डे आपल्या छोटेखानी भाषणात म्हणाले, “विदर्भातील बहुजन समाजात ‘हिंदुसभा’ नुकतीच कुठे मूळ धरू लागली आहे. अशा स्थितीत या कार्यक्रमाचा निषेध हा आपलाच निषेध ठरेल. डॉ. पंजाबरावांच्या संस्थेला निजामाने देणगी दिली, तेव्हा त्यांच्या शिक्षणसंस्थेने जर त्यांचा सत्कार केला तर त्यात चूक कुठे आहे? शैक्षणिक बाबींशी राजकारण जोडणे अगदीच विसंगत! तुम्हाला निजामाचा इतका तिटकाराच असेल तर अमरावतीच्या जिल्हा कचेरीवर इंग्रजांच्या युनियन जॅकबरोबर निजामांचाही झेंडा डौलाने फडकत आहे, तो पाडण्याची हिंमत तुम्ही का करीत नाही ?”
बापूसाहेब देशमुखांच्या सूचनेप्रमाणे अखेर डॉ. मुखर्जीच्या निर्णयानुसार ती योजना व तो ठराव फेटाळला गेला आणि ‘कोणाला निषेध करावयाचा असेल तर तो आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर करावा’ – असा निर्णय घेण्यात आला.
तरीपण तापलेल्या वातावरणात विरोधाचे जहाल कट शिजू लागले. कित्येकांनी तर कुणीच काही न केल्यास शेवटी सभास्थानाला ‘आग’ लावून देण्याच्या भीष्मप्रतिज्ञा केल्या. येनकेन प्रकारेण शिवसंस्थेचा कार्यक्रम उधळून लावणे हा ‘एक कलमी’ कार्यक्रम विरोधकांचा ठरलेला. पण संकटात खांद्याशी खांदा लावणारे भाऊसाहेबांचे सारेच मित्र, सहकारी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि विरोधाच्या या धारेवर ‘काहीही झाले तरी कार्यक्रम होणारच, तो बंद पाडण्याची कुणाची छाती नाही!’ या ईष्येने कामाला लागले. कदम-होनाडे, भटकर-गावंडे आदींनी ‘भारत सेवक दला’च्या स्वयंसेवकांची रांग उभी केली. जिल्हा कौन्सिलचे चेअरमन बापूसाहेब देशमुख यांचा सारा फौजफाटा कामाला लागला. मामासाहेब लोंढे व नानासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सारे आजीमाजी विद्यार्थी-कर्मचारी भव्य मंडप निर्मितीत तल्लीन होऊन परिसर शृंगारण्यात झटू लागले. दिव्यांची रोषणाई, तोरणं-पताका, आदींनी परिसराला नटविण्यात आले. स्वागतोत्सुक कमानी अंतराअंतरावर आपल्या माना उंचावू लागल्या.
उद्याच्या कामाची तयारी झाली म्हणतानाच आज निजामच्या सेक्रेटरीची तार आली, ‘युवराजांचा दौरा स्थगित करण्यात आला आहे.’ ही धक्कादायक बातमी म्हणजे शिवपरिवाराच्या प्रतिष्ठेला एक आव्हान होते. पण विचलित न होता भाऊसाहेबांनी निर्भयपणे सांगितले, “बिलकूल घाबरण्याचे कारण नाही. हा आपल्या परीक्षेचा प्रसंग आहे. मी येईपर्यंत वेळ काढा!” एस. व्ही. देशमुख, पंढरीनाथ पाटील व बापूराव देशमुख यांच्यावर अमरावतीची सारी जबाबदारी सोपवून त्यांनी आपली मोटार काढली आणि तडक हैद्राबाद गाठले.
‘युवराज विदर्भ भेटीवर येतील तर जनक्षोभ उसळेल. त्यात त्यांच्या जिवालाही धोका होईल” – अशा आशयाच्या शेकडो तारा आल्याने दौरा स्थगित केल्याचे भाऊसाहेबांना निजामदरबारी कळले. भाऊसाहेबांनी युवराजांची भेट घेतली व त्यांना सांगितले, “कुठल्याही प्रक्षोभक परिस्थितीला तोंड देण्याची आमची तयारी आहे. आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी. ठरल्याप्रमाणे आपण आल्यास आपल्या केसालाही धक्का लागणार नाही याची मी हमी घेतो.
आणि भाऊसाहेबांच्या या भक्कम आश्वासनाने भारून जाऊन युवराज यायला तयार झाले, निजामच्या शहांनीही याला सहमती दिली. इकडे गावोगावच्या आलेल्या पाहुण्यांना थोपवून ठेवण्याचे काम बापूसाहेबांनी व पंढरीनाथ पाटलांनी केले. त्यांनी समयसूचकतेचे भान ठेवून तेथेच वेळेवर ‘मराठा शिक्षण परिषद’ आयोजित केली. पंढरीनाथ पाटलांच्या आवशेपूर्ण व स्फोटक भाषणाने एक नवे चैतन्य सळसळू लागले, आणि अशात भाऊसाहेबांची ‘युवराज येणार’ म्हणून तार आली आणि नव्या चैतन्याने व उमेदीने कार्यकर्ते स्वागताच्या तयारीला लागले.
वऱ्हाडच्या कमिश्नरने सरकारी रीत्या युवराजांच्या स्वागताची तयारी केली होती. २३ मार्च १९४५ ला स्टेशनपासून सर्किट हाऊसपर्यंत मालटेकडी रोडवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. इर्विनपासून स्टेशनपर्यंत काळी निशाणे उंचावणाऱ्या विरोधकांची तोबा गर्दी उसळली होती. पण कदम होनाडे यांनी सायकल स्वारांची तुकडी पुढे करून आपल्या ‘भारत सेवक दला’च्या पोलादी स्वयंसेवकांची फळी निर्भयपणे त्या गर्दीत घुसविली. स्टेशनजवळ त्या स्वयंसेवकांनी सर्वांना मागे रेटले. निजाम युवराजांची शाही ट्रेन धडधडत स्टेशनात आली आणि डॉ. भाऊसाहेबांनी पुष्पहारांनी त्यांचं स्वागत केलं. विरोधकांच्या निषेधाच्या आरोळ्या स्वयंसेवकांच्या प्रचंड जयजयकारात विरून गेल्या. त्यांची काळी निशाणं पुढे येऊच शकली नाहीत.
विरोधकांचा मुख्य उद्देश शिवसंस्थेचा मुख्य कार्यक्रम उधळून लावण्याचा होता. रात्रंदिवस राबून तयार केलेल्या या अभूतपूर्व सभास्थानाला वेळच आली तर पेटवून द्यायलाही विरोधक आणि त्यांचे सहकारी मागेपुढे पाहाणार नव्हते. ऐनवेळी मंडपात घुसता यावे म्हणून संस्थेच्या निमंत्रण पत्रिका पोस्टातून पळविण्याच्या घटनाही घडल्या होत्या. पण बापूसाहेबांची करडी नजर, स्वयंसेवकांची पूर्ण परिसर व्यापून टाकणारी उपस्थिती आणि स्वयंसेवक प्रमुखांची तत्परता-यांमुळे विरोधकांनी गडबड माजविण्यासाठी केलेले सर्वचे सर्व प्रयत्न थिटे पडले.
युवराजांचे स्वागत अगदी ठरल्याप्रमाणे यथायोग्य रीतीने करण्यात आले. प्रशांत वातावरणात प्रत्येक कार्यक्रम दरबारी शैलीने पार पडला. स्वागतगीत, मानपत्रसमर्पण सारे कार्यक्रम वैभवशाली झाले. आपल्या या अभूतपूर्व स्वागताने भारून गेलेल्या युवराजांनी ‘प्रिन्स ऑफ बेरार होस्टेल’चे उद्घाटन करतानाच मोठ्या समाधानाने आणखी तीस हजारांची देणगी शिवसंस्थेला घोषित करून टाकली.
प्रचंड दडपणाखाली पार पडलेल्या या अभूतपूर्व स्वागत समारंभात युवराजांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत खरोखरच कुणी केली नाही. भाऊसाहेबांच्या या पहाडी कर्तबगारीमुळे युवराजांना कृतंकृत्य झाल्यासारखे वाटले. दुसऱ्या दिवशी सर्किट हाऊसवर मात्र वेगळेच दृश्य होते. कालचे विरोधक हजार-दोन हजारांच्या देणग्यांसाठी युवराजांच्या समोर कुर्निसात करीत होते.
अमरावतींच्या कार्यक्रमाने भारावलेल्या युवराजांना खामगावच्या अंजुमन हायस्कूलच्या स्वागतात फार मोठी तफावत जाणवली. इथे विरोधक गडबड माजविण्यात सफल झाले होते. या पार्श्वभूमीवर युवराजांच्या व खुद्द निजामांच्या दृष्टीलाही पंजाबरावांच्या कर्तृत्वाची भव्यता अधिक उठावदार दिसली. त्यांनी हार्दिक आभाराचा खलिता पंजाबरावांना पाठविला आणि याच ‘सुताने’ बहुजनांच्या हितासाठी ‘स्वर्ग’ गाठण्याचा विचार पंजाबरावांच्या डोक्यात घर करून गेला. त्यासाठी ग्रामीण जनतेच्या शिक्षणाची लक्षावधी रुपयांची योजना त्यांनी तयार केली. भाऊसाहेबांनी ही योजना दाखवून निजामशहाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री. गोपालस्वामी यांना अनुकूल करून घेतले. त्यावेळी प्रमुख प्रधान म्हणून कार्यरत होते ‘सर मिर्झा इस्माईल’, त्यांच्या अनुकूलतेशिवाय ही योजना पुढे रेटता येणे शक्य नव्हते. भाऊसाहेबांनी सर मिझना आपली योजना समजावून सांगितली, त्यांनीही मोठ्या आत्मीयतेने ती समजून घेतली आणि प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन डॉ. भाऊसाहेबांना आश्वस्त केले.
सर मिर्झा इस्माईल हे एक उदार विचारांचे स्वतंत्र पुरुष ! त्यांचे कोणत्याही गोष्टीचे मूल्यमापन व विशदीकरण मार्मिक असायचे. १९४५ साली सरकारी कामानिमित्ताने त्यांचा विदर्भात दौरा होता, ही संधी साधून डॉ. भाऊसाहेबांनी ‘अमरावतीच्या शिवसंस्थेला भेट द्यावी’ – असे त्यांना निमंत्रण दिले. त्या निमंत्रणाचा सानंद स्वीकार करून त्यांनी अमरावतीला पदार्पण केले. त्यांच्या स्वागतसोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडला. एका गरीब संस्थेने चालविलेले राष्ट्रनिर्मितीचे अमोल कार्य पाहून सर मिर्झा यांनी शिवसंस्थेवर स्तुतिसुमने उधळली आणि निजाम स्टेटच्या या प्रमुख प्रधानाने भाऊसाहेबांच्या शिक्षण कार्याचे एक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी घवघवीत दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली. त्याकाळी भाऊसाहेबांचे पी. ए. म्हणून काम करणारे प्रा. गु. मा. सोमवंशी यांनी तो दोन लाखांचा चेक हैद्राबादहून स्वत: जाऊन आणला. या दोन लाख रुपयांत आपल्या संकल्पित कार्याचे शिखर उजळेल म्हणून भाऊसाहेब हर्षित झाले. त्यांचे सहकारी कृतज्ञ आनंदाने गहिवरून गेले! संपूर्ण शिवसंस्थेत आनंदाला जणू उधाण आले होते..
…काशीच्या हिंदू विश्वविद्यापीठाने जिथे निजामाच्या देणग्या घेतल्या, तिथे शिवसंस्थेविषयी विरोधकांनी केलेली केवढी ही हाकाटी होती! विरोधाला विरोध म्हणून किंवा एखाद्याचं वैभव बघणे होत नाही म्हणून केलेला हा क्षुद्रमतींचा प्रयत्न असावा. पण ज्याच्या हृदयात सतत जनसामान्यांच्या कल्याणाची ज्योत तेवत होती त्या भाऊसाहेबांची दूरदृष्टी या विरोधाला जुमानणे शक्य नव्हते.
… निजामाच्या मदतीशिवाय आजचे हे शिवसंस्थेचे वैभव शक्य तरी झाले असते का ?
दौलतराव तुकाराम गोळे
लोकमहर्षी भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख गौरवग्रंथ