कोरोना महामारीमध्ये मृत झालेल्या अनेक नागरिकांचा घरात प्रॉपर्टीवरून खूप वाद सुरू आहेत आणि अनेक प्रकरणे कोर्टातसुद्धा गेलेली आहेत, असा एक सर्वे नुकताच वाचण्यात आला. सीमा (नाव बदलेले) एक माझी अशील एकदा माझ्याकडे आली आणि म्हणाली की, मी माझ्या आईची गेल्या १० वर्षांपासून खूप सेवा केली, परंतु आईने तिच्या मृत्यूपत्रात मला काहीही दिले नाही. आई पूर्वी भावाकडे राहायची त्या वेळी मृत्यूपत्र केले होते आणि त्यामुळे सर्व मालमत्ता तिने भावाला दिली आणि आता भावात आणि माझ्यात खूप वाद सुरू आहे. मृत्यूपत्र केले आहे हे आईने मला कधी सांगितलेच नाही. माणसाने जिवंतपणीच त्याची प्रॉपर्टी त्याच्या मृत्यनंतर कुणाला जाईल हे जर ठरविले नाही तर नंतर वाद हे होणारच. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात तर असे वाद घराघरात पाहायला मिळतील. ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे आकस्मित तोही पुढे जात आहे’, असे समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात मृत्यूविषयी सांगितले आहे. आश्चर्याची गोष्ट काय आहे तर आपल्या डोळ्यादेखत अनेक माणसांचा मृत्यू होतो, पण जिवंत असलेली माणसे मात्र आपण अमरच आहोत असे समजून जगतात. त्यांच्या ध्यानीमनीसुद्धा मृत्यूचा लवलेश नसतो.
आपण सर्वजण अशाप्रकारे अटळ व बऱ्याचदा अनपेक्षित असणाऱ्या मृत्यूविषयी बोलणे विचार करणे टाळतो, आयुष्यभर कष्टाने मिळवलेल्या संपत्तीचे किंवा वारसाहक्काने मिळवलेल्या संपत्तीचे आपल्यानंतर काय होणार हे ठरविणे सतत पुढे ढकलले जाते, त्याचे कारण म्हणजे आपल्याला वाटत असते की मी लगेच कुठे मरणार आहे. कधीतरी दूर भविष्यात या गोष्टी ठरवू. वारसांना आपल्या पश्चात मालमत्ता विभागणीचा त्रास होऊ नये इतर कोणी खोडसाळपणे आपल्या मालमत्तांवर हक्क सांगू नये म्हणून इच्छापत्र किंवा मृत्यूपत्रविषयी योग्य वेळेतच निर्णय घ्यायला हवा.
ज्यांना अपत्य नसेल त्यांनी तर ते नक्कीच करावे. मृत्यूनंतर आपल्या मालमत्तेचे विभाजन, वारसा हक्क, अल्पवयीन मुलांचे पालकत्व व संगोपन आणि त्यांच्या भविष्याची तरतूद इत्यादी गोष्टींसंदर्भात जिवंत असताना घेतलेला निर्णय अथवा केलेली तरतूद म्हणजे मृत्यूपत्र होय. मृत्यूपत्र कधी करावे प्रकृती उत्तम असताना शक्य तेवढ्या लवकर मृत्यूपत्र करावे व गरज पडल्यास तुम्ही ते भविष्यात बदलू शकता तशी कायदेशीर तरतूदसुद्धा आहे. मृत्यूपत्रात काय माहिती असावी सुरुवातीला मृत्यूपत्रात तुमच्याविषयी, तुमच्या कुटुंबाविषयी, आपण संपत्ती कशी मिळवली याबाबत माहिती द्यावी. स्वकष्टार्जित मालमत्तेचे तुम्ही मालक असल्याने त्याचे हिस्से तुमच्या मर्जीने करू शकता, परंतु वारसाहक्काने चालत आलेल्या संपत्तीचे हिस्से वाटप मात्र तुम्ही तुमच्या मर्जीने करू शकत नाही ही बाब बऱ्याच लोकांना माहिती नाही. मृत्यूपत्रात नमूद केलेल्या मिळकतीबाबतचे संपूर्ण वर्णन, सूचीबद्ध तपशील तसेच कायदेशीर माहिती याबाबत स्पष्ट उल्लेख असावा. स्थावर व जंगम मालमत्तेतील विशिष्ट मालमत्तेपैकी कुठला हिस्सा कोणास मिळावा याबाबत स्पष्ट उल्लेख असावा, बँकेत बचत खाते, मुदत ठेवी, शेअर्स म्युच्युअल फंड, इत्यादीचा तपशील खाते क्रमांकांसह वेगळी यादी करून द्यावा. आपली स्वकष्टार्जित मालमत्ता मृत्यूपत्राद्वारे एखाद्या व्यक्तीला अथवा संस्थेला दान करता येते.
मृत्यूपत्रातील अल्पवयीन अथवा मानसिकदृष्ट्या मुलांच्या पालनपोषणाची भविष्याची तरतूद करून ठेवता येते तसेच विवाहपूर्वी अथवा विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या अल्पवयीन अथवा सज्ञान अपत्याच्या नावेही मृत्यूपत्राद्वारे मालमत्ता करता येते. काही प्रसंगी कुटुंबप्रमुख पुरुषाच्या निर्णयानंतर मुलांकडून आईकडे दुर्लक्ष केल्याची उदाहरणे असतात असे होऊ नये म्हणून पतीने त्याची मालमत्ता आधी पत्नीला व तिच्या पश्चात तिच्या मुलांना मिळावी अशी तरतूद करावी. मृत्यूपत्रात शेवटी मृत्यूपत्र स्वतंत्रपणे शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ असताना आणि विचारपूर्वक केलेले असल्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने त्यावरती स्वाक्षरी केली पाहिजे व तसेच साक्षीदारांची स्वाक्षरीसुद्धा मृत्यूपत्रावर असणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे प्रमाणपत्रसुद्धा घेणे आवश्यक आहे जरी कायदेशीर तरतूद नसली तरी मृत्यूपत्रासोबत ओळखीच्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडावे. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती प्रमाणपत्र करताना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होती, असे डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडले असावे. यावर डॉक्टरांची सही- शिक्का, तारीख, वेळ आणि डॉक्टरांचा नोंदणी क्रमांक नमूद केलेला असावा.
नोंदणी कायद्यानुसार मृत्यूपत्राची नोंदणी करणे बंधनकारक नाही, पण तरी नोंदणीकृत मृत्यूपत्राला कायद्याचे संरक्षण असल्यामुळे त्याला आव्हान देणे सहजी शक्य होत नाही. त्यामुळे मृत्यूपत्राची नोंदणी करणे आवश्यक ठरते. वकिलांच्यामार्फत निबंधकाच्या कार्यालयात जाऊन मृत्यूपत्र रजिस्टर करता येते. त्याकरता स्टॅम्प ड्युटी लागत नाही. मृत्यूपत्र तयार झाल्यानंतर शक्यतो ते कायदेशीर सल्लागाराच्या ताब्यात द्यावे त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा ते मृत्यूपत्र सादर केले जाऊ शकते. मृत्यूपत्रात नमूद केलेली सर्व कारवाई व्यवस्थित पार पाडण्यासाठी तुम्ही एज्झू केटरसुद्धा नेमू शकता, तो मृत्यूनंतर मृत्यूपत्राची त्यातील मजकुरानुसार कार्यवाही करतो.
मृत्यूपत्र बदलता येते का?
एकदा केलेले मृत्यूपत्र कितीही वेळा बदलता येते किंवा त्यामध्ये दुरुस्ती करणे सहज शक्य आहे. अनेक कारणांमुळे मृत्युपत्र बदलता येते. मृत्यूपत्रात बदल करताना मृत्यूपत्राला नवीन पुरवणी कधीही जोडता येते. पुरवणी जोडताना त्यावर पहिल्या मृत्यूपत्राप्रमाणेच साक्षीदारांसमोर सही करावी लागते तसेच त्यावर साक्षीदारांची सही, तारीख, वार, वेळ व स्थळाचा उल्लेख असणे आवश्यक आहे. नवीन मृत्यूपत्र तयार करताना अथवा पुरवणी जोडताना व्यक्ती शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्य स्थिर सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा पुरवणी किंवा नवीन मृत्यूपत्र ग्राह्य धरले जात नाही. मृत्युपत्र रद्द करून नवीन मृत्यूपत्र करताना आधीचे दिनांक रोजी केलेले मृत्यूपत्र रद्द समजावे असा उल्लेख नवीन वृत्तपत्र असणे आवश्यक आहे. तसेच एका व्यक्तीने एकापेक्षा जास्त मृत्यूपत्र केलेली असतील तर कायद्यानुसार सर्वात शेवटी केलेले मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते.
एकदा रजिस्टर केलेले मृत्यूपत्र बदलले तर असे बदल केलेले मृत्यूपत्र रजिस्टर केले पाहिजे अन्यथा बदल ग्राह्य धरले जात नाहीत. मृत व्यक्तीचे मृत्यूपत्र नसेल आणि कोणताही वारसदार नसेल तर संबंधित मालमत्ता नॉमिनीच्या नावावर हस्तंतर केली जाते. मृत व्यक्तीचे मृत्यूपत्र नसेल आणि त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारशासंबंधित मालमत्तेवर दावा सांगत असेल तर नॉमिनी केवळ त्याचे नॉमिनेशन असलेली मालमत्ता धारण करू शकतो, परंतु त्याचा मालकी हक्क मात्र कायदेशीर वारसांकडे जातो.
नामांकन केलेली व्यक्ती म्हणजे नॉमिनी ही तुमच्यानंतर संबंधित मालमत्तेची मालक न होता विश्वस्त असते. न्यायालयाच्या विविध निर्णयानुसार नामांकन प्रक्रिया म्हणजे वारसहक्क नसून नामांकन कोणाचेही •असले तरी मृत्यूपत्रात ज्याच्या नावे हक्क दिले असतील त्या व्यक्तीचाच मालमत्तेवर अधिकार असतो. त्यामुळे मृत्यूपत्र करणे, त्यात बदल करणे, त्याची नोंदणी करणे, त्याबाबत कुटुंबातील सदस्यांना माहिती देणे हे फार महत्वाचे आहे. असे केले नाही तर पुढे वारसांमध्ये वाद सुरू होतात आणि ते वर्षानुवर्षे कोर्टाच्या फेऱ्या मारत बसतात.