डॉ.शांताराम गोवर्धन बुटे
‘‘संत नरहरी महाराजांची अभंगवाणी’’ पुस्तकात संत नरहरी महाराजांच्या उपलब्ध असलेल्या 34 अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असणारे संत नरहरी महाराज होत. संत नरहरी महाराजांच्या जन्माचा उल्लेख जरी आढळत नसला तरी समाधी काळ हा शके 1235 म्हणजेच इ.स. 1313 असा सांगितला जातो. वडील श्री. दीनानाथ हे औरंगाबादजवळील देवगिरी या ठिकाणी राहत असत तेथे त्यांचा सराफाचा/सोन्याचांदीचा व्यवसाय होता. कालांतराने श्री. नरहरी महाराज पंढरीला येऊन राहिले व तेथे आपल्या वडिलांचा सोन्याचांदीचा सराफाचा व्यवसाय सुरू केला.
संत नरहरी महाराजांचा अध्यात्मिक अनुभव व पारमार्थिक अधिकार हा उच्च कोटीचा असल्याने या संपूर्ण अभंगात दिव्यत्व प्राप्त झाले आहे.
प्रा.डॉ.र.रा. गोसावी यांनी संपादित केलेल्या श्री. सकल संतगाथेतून प्रस्तुत संत नरहरी महाराजांच्या 34 अभंगांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
-डॉ.शांताराम गोवर्धन बुटे
1.अनुहात ध्वनी करित निशिदिनीं ।
अनुहात ध्वनी करित निशिदिनीं । मन हे लुब्धुनी गेलें तया ।। 1।।
अखंड हें मनीं स्मरा चिंतामणी । हृदयीं हो ध्यानीं सर्वकाळ ।। 2।।
अखंड हें खेळें जपे सर्व काळीं । हृदयकमळीं आनंदला ।। 3।।
प्रेम अखंडित निशिदिनीं घ्यात । नरहरीसी पंथ दाखविला ।। 4।।
संत नरहरी महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वराच्या / पांडुरंगाच्या नाम चिंतनाने, स्मरणाने व जपाने हृदयात सर्वकाळ ध्यानाने अनुहत ध्वनीने मन आसक्त होऊन जाते. मनाला अत्यंत आनंद व सुख प्राप्त होते. हा मार्ग मला माझ्या सद्गुरुने दाखविल्याचे प्रतिपादन करतात.
संत नरहरी महाराज विठोबाचे भाविकभक्त असुन काया, वाचा व मनाने विठोबाच्या चरणी समर्पित झाले होते. त्यांच्या ध्यानी, मनी व स्वप्नी पांडुरंगच राहत असे. पांडुरंगाचे आपल्या मनामध्ये सदैव स्मरण व चिंतन चालत असे तसेच हृदयात त्याच पांडुरंगाचे ध्यान सदा सर्वकाळ करीत आले आहेत. ईश्वराच्या/पांडुरंगाच्या चिंतनात दिवसरात्र असल्याने अनुहात ध्वनी हा त्यांचे मुखातून बाहेर पडत असे. या ध्वनीमुळे त्यांचे मन आसक्त झालेले दिसून येते. या सर्व शरीरामधील हालचालीद्वारे त्यांचे अंतरंगही आनंदाने फुलले होते. या प्रक्रियेद्वारे त्यांना मिळणारा आनंद हा त्यांच्या आत्म्याला सुध्दा झालेला आहे. तसेच हाच सत्चित् आनंद होय. असा आनंद व सुख दुसरीकडे मिळू शकत नसल्याचे महाराज सांगतात.
संत नरहरी महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरुंनी मला विठ्ठल सांप्रदायिक जपाचा, ध्यानाचा मार्ग दाखविला आहे. या ईश्वरी नामाचा जप मी अखंडपणे दिवसरात्र घेत आलो आहे ज्याद्वारे माझ्या मनाला आत्मिक आनंद व प्रेम प्राप्त झालेले आहे.
2. ऐरावती बहु थोर ।
ऐरावती बहु थोर । त्याला अंकुशाचा मार ।। 1।।
व्याघ्र बहु भयंकर । त्याला सांपळा हो थोर ।। 2 ।।
सर्पविष हो विखार । मंत्रवल्ली केली थोर ।। 3।।
देह जठराग्नी भारी । अन्नपाणी शांत करी ।। 4।।
गुरु गैबीनाथ । नरहरी दास हा अंकित ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातुन माणसाने नम्रता स्विकारावी व आपल्या मनातील अहंकार हा शून्य करावा असे
व्यवहारामधील विविध उदाहरणाद्वारे प्रतिपादन केले आहे.
एवढा मोठा असणारा ऐरावत इंद्राचा बलशाली हत्ती होय. हा हत्ती कितीही बलशाली असला तरी तो सुध्दा माहुताच्या अंकुशाच्या ताब्यात असतो. अंकुशाचा मार त्याला सहन करावा लागतो. वाघ अतिशय क्रूर प्राणी असून त्याचा तो स्वभाव आहे. त्याच्या स्वभावामुळे त्याला पिंजÚयात बंदिस्त करुन ठेवतात. सापाचे विष हे माणसाला क्षणात यमसदनी पाठवते. विषारी सापाने दंश केल्यानंतर माणूस दवाखान्यापर्यंत सुध्दा जाऊ शकत नाही. रस्त्यातच मृत्युमुखी पडू शकतो. पंरतु अशा विषारी सापाच्या विषावर सुध्दा आयुर्वेद उपाय असून व मंत्र शास्त्राद्वारे माणूस जीवंत राहू शकतो. एवढे सामर्थ्य या शास्त्रात आहे. मानवी प्राण्यांच्या शरीरात जठरांग्नीची तृप्तता ही अन्न व पाणी याद्वारे होत असते. हा जठराग्नी पाणी व अन्नामुळे शांत होत असतो. त्याची तृप्तता होते.
संत नरहरी महाराज म्हणतात, मला वंदनीय असणारे माझे गुरु गैबीनाथ यांना मी मनोभावे शरण जात आहे. कारण त्यांनी मला आत्मज्ञानाद्वारे अनुभूती प्राप्त करुन दिली आहे. मी त्यांच्या सेवेत व आज्ञेत असून त्यांचे आदेशानुसार या जीवनाची वाटचाल सुरु आहे.
3. ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला ।
ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला ।
सुदिन उगवला दान आपुले घाला ।। 1।।
आणिक हिता गा आला अवचित फेरा ।
हे घडी सांपडेना कांहीं दान पुण्य करा ।। 2।।
ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर ।
भक्तासी भर नाहीं संत संगती धर ।। 3।।
संसार सार नोहे माया मृगजळ भास ।
क्षणांत भ्रांती याचा काय विश्वास ।। 4।।
घे करी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास सावधान नरहरी ।
आलो चरणीं निजध्यास ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून वासुदेवाच्या रुपात माणसाला जागे करण्याचे म्हणजेच प्रबोधन व परमार्थ करण्याचे सांगितले असल्याचे प्रतिपादन करतात.
वासुदेवाच्या रुपाने समाजातील माणसांना जागृत करण्याचे कार्य केलेले आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर सर्वप्रथम माणसाने सजग व्हावे. आपले हित कशात आहे. ते ओळखावे व प्रत्येक दिवस चांगला समजून दान करावे. ही वेळ पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. विठोबाचे दास होण्यास काया, वाचा व मनाने त्यास शरण जाणे आवश्यक असते. आणि संतांची संगती धरावी त्यामुळे आपल्यामधील भयवृत्ती नाहीसी होते. मानवी जीवनामधील ज्या संसारात आपण जगत आहोत. तो संसार हा मायाजाळ असून मृगजळासारखा भ्रमिष्ट करणारा आहे. आपल्याला जर सत्य समजले तर ते मृगजळच असत्याचे जाण होते म्हणूनच याचा विचार अवश्य करावा. व त्या पांडुरंगावर विश्वास ठेवावा व भावभक्तिने त्याविठोबास समर्पित व्हावे.
संत नरहरी महाराज म्हणतात, संतांच्या संगतीत राहून विठोबाचे दास्यत्व स्विकारुन पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावे.
4. काय तुझी थोरी वर्णूं मी पामर ।
काय तुझी थोरी वर्णूं मी पामर । होसी दयाकर कृपानिधी ।। 1।।
तुजसरशी दया नाहीं आणिकासी । असे हृषीकेशी नवल एक ।। 2।।
जन हो जोडी करा नाम कंठीं धरा । जेणे चुके फेरा गर्भवासी ।। 3।।
नरदेहीं साधन समता भावभक्ति । निजध्यास चित्तीं संतसेवा ।। 4।।
गुरुपदीं निश्चळ परब्रह्म पाहे । नरहरी राहे एकचिंत्तें ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा आपण दयाळू असून कृपाळू आहात. मी लहान आपली थोरवी गाऊ शकणार नाही. माणसांना जोडून ईश्वराचे नाम मुखाने घ्यावे. ज्यामुळे जन्म मरणाचा फेरा सुटणार आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर भावभक्ति, सेवा करावी आपणांस गुरुदेव परब्रह्माची ओळख करुन देत असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वर/पांडुरंग हा कृपाळू व दयाळू आहे. आपल्या भाविकभक्तांवर त्याची सदैव कृपादृष्टी राहीली आहे. तो पांडुरंग कठीण परिस्थितीत सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीला आहे. असा दयावंत कोठेही सापडला नाही. अशा पांडुरंगाचे मी सामान्य माणूस काय वर्णन करणार आहे. त्याची थोरवी सुध्दा गाऊ शकणार नसल्याचे वाटते. अशा पांडुरंगाचे नाम आपल्या मुखाने घेत राहावे. कारण ईश्वराचे नाम हे बीजतत्व आहे. त्या नामामध्ये एवढे सामर्थ्य आहे की, ज्याद्वारे आपला जन्म आणि मरणाचा फेरा चुकविता येईल, नाहीतर जन्म व मरणाचा फेरा हे चक्र सतत चालू राहणार आहे. आपण भाग्यवान आहोत की, आपणांस नरदेह मिळाला आहे. या नरदेहाचे सार्थक होण्यासाठी ईश्वराची भावभक्ति व संतांची मनोभावे सेवा आणि नाम तत्वाचा स्विकार करावा लागतो ज्याद्वारे आपला उध्दार होईल.
संत नरहरी महाराज म्हणतात, ईश्वराच्या/पांडुरंगाच्या भावभक्तिने व सद्गुरुच्या कृपेने परब्रह्मपद प्राप्त होते. ही माझी अनुभूती असून मी निवांत झालो आहे.
5. कांहीं उपाय चालेना ।
कांहीं उपाय चालेना । कांहीं स्वहित घडेना ।। 1।।
कांहीं केलें नाहीं पुण्य । काय जन्मासी येऊन ।। 2।।
केली नाहीं कांहीं भक्ति । देहीं नाहीं हो विरक्ती ।। 3।।
कांहीं केलें नाहीं तीर्थ । जन्म गेला अवघा व्यर्थ ।। 4।।
व्यर्थ प्रपंच हा केला । अवघा शेवटीं वायां गेला ।। 5।।
गुरु कृपा होय जरी । नरहरी क्षणांत उघ्दरी ।। 6।।
संत नरहरी महाराजांच्या सहा चरणाच्या अभंगातुन जन्मासी येऊन काहीही पुण्य करण्यात आले नाही, स्वहित साधता आले नाही. कधीही भक्ती केली नाही म्हणून विरक्ती देहाला साधली नाही. तिर्थयात्रा केली नाही. असा हा मानवी जन्म वाया गेला सद्गुरुची कृपा झाली असती तर निश्चित क्षणात उध्दार होत असल्याचे प्रतिपादन करतात.
मानवी जन्माला आल्यानंतर या जन्माचे सार्थक करावे लागते, परंतु येथे आल्यानंतर काहीही सुचले नाही पुण्यकर्म करता आले नाही. जीवनात सत्कर्म जर केली असती तर अगणित पुण्य प्राप्त झाले असते. परंतु भगवंत/पांडुरंगास कधिही मनोभावे शरण गेलेलो नाही. म्हणून माझ्या मनात भावभक्ती निर्माण झाली नाही. भक्तिभाव नसल्याने या देहाला कधीही विरक्ती प्राप्त झाली नाही. पंढरी हे वैकुंठभूमी चंद्रभागेच्या तीरावर दोन हात कटेवर ठेवुन समचरण पांडुरंग तेथे उभा आहे परंतु माझ्या मनात ही पंढरीची तीर्थयात्रा करावी असे कधीही वाटले नाही. म्हणून माझा जन्म वाया गेला आहे असे मला वाटते हा संसार सुध्दा व्यर्थ झाला आहे. जीवनातील सार्थकता कधीही साधता आली नाही.
संत नरहरी महाराज म्हणतात, भाविक भक्तांवर जर सद्गुरु कृपा लाभली मनोभावे शरण गेल्यास एका क्षणामध्ये आपल्या भक्ताचा उध्दार होत असतो व आपले जीवन सार्थकी ठरते.
6. काहीं करीना उपाय ।
काहीं करीना उपाय । दिवसें दिवस व्यर्थ जाय ।। 1।।
संसारी नाहीं समाधान । न चुकती जन्ममरण ।। 2।।
शेण लोणी सोनें कांसें । एक मोले विके कैसें ।। 3।।
दुर्जनसंग त्यागावा । संतसंग तो धरावा ।। 4।।
नरहरी जोडोनियां कर । उभा सेवे निरंतर ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून या संसारात समाधान नसून दिवस वाया जात आहेत. शेण आणि लोणी तसेच सोने व कासे हे एकाच मोलात विकता येत नाही. दुर्जनाची संगत न करता संत संगत धरावी. नरहरी महाराज ईश्वराला हात जोडून उभा असल्याचे प्रतिपादन करतात.
मानवी जीवनात आल्यानंतर संसार करावा लागतो ह्या संसारात माणसाला काहीही सुख प्राप्त होत नसून समाधान मुळीच नसते. त्यामुळे येथे मृत्युलोकी येणे व येथून जाणे म्हणजे जन्म मरणाच्या फेÚयात आपण अडकलो असतो. यामधून सहज सुटण्याकरीता तसेच हा संसार सुखी व समाधानी होण्यासाठी जीवनात संतसंगती धरावी लागते. व दुर्जनाची संगत टाळावी लागते. व्यवहारामधील शेण आणि लोणी तसेच सोने आणि कासे एकाच भावात विकता येत नाही. त्यांचे मोल हे वेगवेगळे प्रकारचे असते. सोन्याची किंमत त्याचे मूल्य हे श्रेष्ठ, उच्चतम असते. त्या तुलनेत कासाची किंमत कमी असते. कारण त्याचे मूल्य हे सोन्याच्या तुलनेत कमी असते. तसेच शेण व लोण्याचे असते.
संतांच्या संगतीने त्यांच्या कृपादृष्टीने व आशिर्वादाने हा संसार सहज पार केल्या जातो. एवढेच नव्हे, तर जन्म मरणाच्या फेÚयामधून आपली सहज सुटका होत व आपले जीवन सार्थकी लागते.
संत नरहरी महाराज म्हणतात, संतांच्या चरणी मनोभावे लीन झालो असून त्यांच्या सेवेत निरंतर हात जोडून उभा आहे. अशा प्रकारचा आपला विनम्रभाव प्रकट करतात.
7. कृपा करी पंढरीनाथा ।
कृपा करी पंढरीनाथा । दीनानाथ तूं समर्था ।। 1।।
अपराध करीं क्षमा । तुझा न कळे महिमा ।। 2।।
करीं भक्ताचा सांभाळु । अनाथाचा तूं कृपाळु ।। 3।।
आम्ही बहु अन्यायी । क्षमा करी विठाबाई ।। 4।।
आलों पतीत शरण । पावन करीं नारायण ।। 5।।
पापी अमंगळ थोर । कृपा करीं दासावर ।। 6।।
मी तरी अवगुणी बहुत । दया करीं पंढरीनाथ ।। 7।।
दयासागरा अनंता । कृपा करीं पंढरीनाथा ।। 8।।
तुझें नामामृत सार । नरहरी जपे निरंतर ।। 9।।
संत नरहरी महाराजांच्या नऊ चरणाच्या अभंगातून विठोबा हा
कृपाळू व दयाळू असून सामर्थ्यशाली आहे. आपले भक्त, अनाथ व पतितांचा आपणांस शरण आल्याने त्याच्यावर कृपा करावी त्यांना क्षमा करुन उध्दार करावा. तुझे नाम सदैव जपत असल्याचे प्रतिपादन करतात.
पंढरीचा विठोबा हा मोठा दयावंत व कृपावंत आहे. आपल्या भाविकभक्तांवर त्याची कृपादृष्टी व आशिर्वाद असतो कारण तो सामर्थ्यशाली आहे. आपला महिमा हा कोणालाही कळत नाही. आपल्या भाविक भक्तांचा सांभाळ करावा असे मला वाटते. कारण आपण दीनाचे नाथ व अनाथाचे नाथ आहांत आपल्या भाविक भक्तांकडून काही अपराध अथवा चूक झाली असल्यास आपण क्षमाशील असल्याने आम्हास क्षमा करुन माफ करावे. कारण आपण भक्तांचा सांभाळ करीत आला आहांत. आपली कृपाळू भाव आम्हां भक्तांवर दाखवावा. आपणास अनेक पतीत मनोभावे शरण आलेले आहेत तसेच असंख्य पाप करणारे पापी सुध्दा पश्चाताप करुन आपल्या चरणी लीन झालेले आहेत. अनेक अवगुणी या दुरितांचा आपण उध्दार करुन त्यांना सद्गती प्राप्त करुन दिली आहे. कारण आपण दयेचे, कृपेचे सागर आहांत. मी तर आपले दास्यत्व स्विकारले असून काया, वाचा व मनाने शरण आलेलो आहे त्यामुळे कृपा करावी.
संत नरहरी महाराज म्हणतात, ईश्वरा आपले नाम हे सारतत्व असून ते अमृत आहे. म्हणूनच निरंतर जप करीत आहे. ()
8. कृपाळु समर्था सद्गुरु अनंता ।
कृपाळु समर्था सद्गुरु अनंता । गुरु कृपावंता दया करीं ।। 1।।
अनाथ अपराधी तारी हा भवाब्धी । मृगजळ नदी तारी देखा ।। 2।।
दीनाचा दयाळु भक्तांचा कनवाळु । करिता सांभाळु हरिभक्ताचा ।। 3।।
हरिनाम उच्चारी देव कृपा करी । भक्तांचा कैवारी पांडुरंग ।। 4।।
कृपाळु भगवंते पुरविला हेत । मुखीं नामामृत नरहरी ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून सद्गुरुच्या
कृपेने आपला संसार सागर हा पार केल्या जातो तसेच ईश्वराच्या नाम उच्चाराने तो ईश्वर भक्तांचा पाठीराखा राहून सर्व इच्छा पूर्ण करतो म्हणून मुखाने नाम घेत असल्याचे प्रतिपादन करतात.
सद्गुरु हे दयाळू असून आपल्या शिष्यावर कृपा करणारे असतात. सद्गुरुच्या कृपा प्रसादाने हा संसार पार केल्या जातो. अनाथ व अपराधी जरी असलेत तरी सुध्दा सद्गुरुला मनोभावे शरण गेल्यानंतर त्यांना दया येऊन कृपादृष्टी प्राप्त होते. संसार हा मृगजळासारखा असला तरी सहज पार केल्या जातो. ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नाम तत्वाच्या सामर्थ्याने पांडुरंग भक्तांच्या अंकित राहतो. भक्तांच्या पाठिशी सदैव उभा राहून भक्तांचा कैवारी ठरतो. म्हणून सद्गुरुची कृपा व ईश्वराच्या नाम तत्वाच्या उच्चाराने भगवतांची कृपा ही मानवी जीवनात लाभत असते. ईश्वर आणि सद्गुरु हे दोघेही कृपाळू व दयाळू असून आपल्या शिष्यावर भाविकभक्तांवर सदैव दयाभाव दाखवितात.
संत नरहरी महाराज म्हणतात, आपल्या मुखातून भगवंताचे पांडुरंगाचे नाम जे अमृतासमान आहे ते सदैव घेत राहावे, कारण भगवंत हा आपल्या भाविकभक्तांची इच्छा पूर्ण करतो. (Abhangavani of Sant Narahari Maharaj)
9. चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें ।
चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें । गरुडपारीं केलें रामतीर्थ ।। 1।।
भागीरथीतीरीं राम धनुर्धारी । अहिल्या उध्दरी क्षणमात्रे ।। 2।।
पताकांचा भार नामाचा गजर । प्रेमाचा पाझर साधुसंता ।। 3।।
संतांचा हा दास नरहरी सेवेस । राहो रात्रंदिवस नाम घेत ।। 4।।
संत नरहरी महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वराने जेथे चरणस्पर्श केले तेथे पद्मतीर्थ व गरुडपारी ठिकाणी रामतीर्थ निर्माण झालेली आहेत. रामाने अहिल्याचा उध्दार केला आहे. साधुसंत व भाविक भक्त आपल्या ईश्वरी नामाचा गजर करतात. तेथे सतांचा दास असणारे नरहरी महाराज संतांच्या सेवेत असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराच्या पावन स्पर्शाने अनेकांचा उध्दार व चरण स्पर्शाने अनेक तीर्थक्षेत्र निर्माण झालेली आहेत. चरण स्पर्शाने पद्मतीर्थ व ईश्वराचे वाहन गरुड असून त्यांनी केलेला गरुडाचा प्रवास जेथे पार पडला तेथे सुध्दा त्या ठिकाणी रामतीर्थ निर्माण झालेले आहे. गौतम मुनीच्या शापाने शिळा झालेली त्यांची धर्मपत्नी अहिल्या हिचा उध्दार सुध्दा रामाच्या चरण स्पर्शाने झाला आहे. अशा प्रकारची किमया ईश्वराची आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी भाविकभक्तगण आपल्या दिव्य पताकांचा भार घेऊन विठोबाच्या नामाचा गजर करीत पंढरीत येतात. प्रेमभाव, भक्तीने सर्व साधुसंत तेथे एकत्र आलेले असतात. अशा पंढरी वैकुंठात पांडुरंगाच्या नामाच्या गजराने ती दुमदुमुन जाते. या सर्व संतांचे दास्यत्व मी स्विकारले आहे व मनोभावे शरण गेलोलो आहोत.
संत नरहरी महाराज म्हणतात, पंढरीच्या पांडुरंगाच्या भाविक भक्तांचा आणि साधुसंतांचे मी दास्यत्व स्विकारले असून त्यांच्या सेवेत मी आहे व रात्रंदिवस त्या विठोबाचे नाम स्मरण करीत आहे याद्वारे माझ्या आयुष्याचे सार्थक होवून उध्दार होईल.
10. चिताऱ्या चितरें काढी भिंतीवरी ।
चिताऱ्या चितरें काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे हें ।। 1।।
पोरें हो खेळती शेवटीं मोडिती । टाकूनियां जाती आपुल्या घरा ।। 2।।
तैसे जन सारे करिती संसार । मोहगुणें फार खरें म्हणती ।। 3।।
कैसी जड माती चालविली युक्ति । नानापरी होती देह देवा ।। 4।।
कांहीं साध्य करा साधुसंग धरा । नाम हें उच्चारा नरहरी म्हणे ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच जणांच्या अभंगातून एखादा चित्रकार भिंतीवर ज्याप्रकारे चित्र काढतो तसेच ईश्वर हा तशाप्रकारे जगाचे चित्र काढतो. लहान मुले खेळ भांडे खेळतात व शेवटी मोडून घरी जातात. तसेच भगवंताचे आहे. अशाच प्रकारचा संसार येथे असतो. ईश्वराचे नाम व संतांची संगत धरावी असे प्रतिपादन करतात.
एखादा चित्रकार ज्याप्रकारे भिंतीवर विविध प्रकारे चित्र काढत असतो त्याच प्रकारे भगवंत या जगाचा संपूर्ण कार्यभार चित्राप्रमाणे साकारीत असतो. संपूर्ण जगाचा व्यवहार व कार्य हे सर्व भगवंतांच्या अधिन असते. त्यांच्या इच्छेनुरुप सर्व काही घटना/प्रसंग या संसारात घडत असतात. लहान मुले अनेक खेळ खेळतात त्यामध्ये तल्लीन होतात व शेवटी घरी जातात. त्यावेळी ती सर्व खेळ मोडून टाकतात अशा प्रकारे ईश्वर/भगवंत या संसारात मनुष्याचा खेळ मांडतात. जोपर्यंत भगवंताची इच्छा असते तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरळीत राहते. जेव्हा त्यांची इच्छा हे खेळ मोडण्याचे झाली तर ते एका क्षणात हा खेळ मोडून टाकतात. या संसारात माणूस मोहून जातो. आशा, तृष्णा याद्वारे असंख्य नानाप्रकारचे इच्छापूर्तीसाठी कार्य करीत राहतो, परंतु त्याचा कर्ता, करविता भगवंत/पांडुरंग असतो. संत ज्ञानोबांनी आपल्या योगसामर्थ्याने जड भिंत चालविली आहे.
संत नरहरी महाराज म्हणतात, या जीवनामध्ये सार्थकी होण्यासाठी साधू संतांची संगत धरावी लागते आणि ईश्वराचे नाम उच्चार करावा लागतो तेव्हा या जीवनाचे सार्थक ठरुन आपला उध्दार होतो.
11. चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत ।
चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत । मनींचा मनोरथ अंतरींचा ।। 1।।
स्नान संध्या केली संध्यावळी झाली । गाई वळत्या केली गोपाळपुरीं ।। 2।।
पांडुरंग न कळे आम्हा । नरहरी सप्रेमा सद्गतीत ।। 3।।
संत नरहरी महाराजांच्या तीन चरणाच्या अभंगातून पंढरीच्या पांडुरंगाच्या वैकुंठ भूमीत चंद्रभागा तीर्थ असून मनाची इच्छा पूर्ण करते. स्नान, संध्या तेथे केली जाते. तेथे गाई गोपाळपुरीत दिसतात. पांडुरंगाच्या सप्रेमाने आम्ही सद्गदित झाल्याचे प्रतिपादन करतात.
पांडुरंगाच्या पंढरीत चंद्रभागा वाहत असून ते वैकुंठीचे तीर्थ आहे. भीमा नदी ही पंढरीत चंद्राच्या आकाराची होऊन पांडुरंगाच्या दर्शनाला आलेली दिसून येते. तेथे क्षेत्र हे पंढरी वैकुंठ असून व तीर्थ चंद्रभागा पवित्र नदी आहे. अशी ही चंद्रभागा भाविक भक्तांची/वैष्णवांची मनातील इच्छा पूर्ण करते. भाविक भक्त मोठ्या प्रेमाने, आनंदाने या नदीत स्नान करतात. संध्यावळी करतात. संध्याकाळी सर्व गाई ह्या गोपाळपूरी एकत्रित वळविल्या जातात. पंढरपूरला लागून जवळ असणारी गोपाळपुरी आहे. चंद्रभागा, गोपाळपुरी हे पावन तीर्थक्षेत्र आहेत पांडुरंगाच्या स्पर्शाने ते पावन झालेले आहे. पुनीत झाले आहे.
संत नरहरी महाराज म्हणतात, आम्ही भाविकभक्त पंढरीच्या पांडुरंगाचे चरणी मनोभावे शरण गेलेलो आहोत. व काया, वाचा व मनाने समर्पित झालेलो आहोत. पांडुरंगा, आपल्या प्रेमभाव भक्तीने आम्ही सद्गदित झालो आहोत. आपली किमया ही कोणसही कळत नाही.
12. जग हें अवघें सारें ब्रह्मरुप ।
जग हें अवघें सारें ब्रह्मरुप । सर्वांभूतीं एक पांडुरंग ।। 1।।
अणुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेलें । सर्वांघटीं राहिलें अखंडित ।। 2।।
विश्व हें व्यापिलें भरुनी उरलें । कवतुक दाविलें मायाजाळ ।। 3।।
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ । परब्रह्मीं खेळे अखंडित ।। 4।।
अखंडित वस्तु हृदयी बिंबली । गुरुकृपें पाहीं नरहरी ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून संपूर्ण जग हे ब्रह्मरूप असून चराचरात ईश्वराचे/पांडुरंगाचे अस्तित्व असते. येथे मायाजाळामुळे माणूस भ्रमिष्ट होतो. तो भ्रम नाहीसा झाल्यास परब्रह्माचे अखंडीत दर्शन होते. सद्गुरूच्या कृपेने ते हृदयात प्रतिबिंबित होत असल्याचे प्रतिपादन करतात.
या जगातील संपूर्ण सृष्टीमध्ये चराचरात ईश्वराचे/पांडुरंगाचे अस्तित्व असल्याचे दिसून येते तो ईश्वर सर्वव्यापी आहे. हे सर्व काही ब्रह्मरूप आहे अणूरेणूत सुद्धा ईश्वरीय तत्त्व दिसून येते. सर्वांमध्ये हे तत्त्व सामावलेले आहे. ते अखंडितपणे दिसून येते. संपूर्ण विश्व हे या ईश्वरी तत्त्वाने भरून व्यापले असून शिल्लक उरले आहे. या संसारात संपूर्ण मायाजाळ असून या मायाजाळयाच्या प्रभावाने माणूस हा भ्रमिष्ट होऊन गेला आहे. त्याला येथे काहीही सूचत नाही संपूर्ण माया त्याला खरी वाटते. जीवनातील असणाÚया मायाजाळाचा नाश करण्यासाठी पांडुरंगाची मनोभावे काया, वाचा व मनाने शरण जावे लागते. त्या मायाजाळाचा नाश झाल्यानंतरच खरे ईश्वरीय ब्रह्मतत्त्व अखंडितपणे आपणांस दिसून येते व सहज प्राप्त होते.
संत नरहरी महाराज म्हणतात, सद्गुरूच्या कृपेने ईश्वरी परब्रह्माची ओळख होऊन ते आपल्या हृदयात अखंडपणे प्रतिबिंबित झाले आहे.
13. देवा तुझा मी सोनार ।
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।। 1।।
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोनें ।। 2।।
त्रिगुणाची करुनी मूस । आंत ओतिला ब्रह्मरस ।। 3।।
जीव शिव करुनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी ।। 4।।
विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ।। 5।।
मनबुध्दीची कातरी । रामनाम सोनें चोरी ।। 6।।
ज्ञान ताजवा घेउन हातीं । दोन्ही अक्षरें जोखिती ।। 7।।
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी ।। 8।।
नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ।। 9।।
संत नरहरी महाराजांच्या नऊ चरणाच्या अभंगातून आपल्या व्यवसायामधील प्रतिमांचा वापर परमार्थासाठी करीत असून त्याद्वारे आपला प्रपंच करण्याचे सांगतात. आपला व्यवसाय आपण प्रामाणिकपणे व इमानेइतबारे ईश्वराच्या नाम व भजन रात्रंदिवस करावा असे प्रतिपादन करतात.
आपल्या व्यवसायात असणाÚया प्रतिमांचा उपयोग करून त्यांनी परमार्थ सांगितला आहे. पांडुरंगा मी आपला भाविकभक्त असून काया, वाचा व मनाने आपल्या चरणाशी समर्पित झालो आहे. मी आपल्या विठ्ठल नामाचा व्यवहार करीत आहे. मानवी देह ही सोनाराची शेगडी आहे या देहामधली अंतरात्मा हे सोने आहे या देहात प्रज्वलीत राहणारा अग्नि म्हणजे ज्ञानाग्नि होय. रज, तम व सत्व या तीन गुणांचा रस टाकण्याकरीता मुस (साचा) तयार केला असून त्रिगुणाच्या मुशीमध्ये ब्रह्मरस ओतला आहे. जीव आणि शिवाची फुंगणी केली आहे. रात्रंदिवस या संसारात काबाडकष्ट करीत आहे. या संसारात असतांना विवेकरुपी हातोडा आपल्या जवळ असावा लागतो. व त्याद्वारे काम आणि क्रोधाचा नाश करुन त्याचे चूर्ण करावे लागते. मन आणि बुध्दीची सांगड घालून त्या भगवंताचे नामस्मरण करावे. राम नामाचा अंगीकार करावा लागतो. नामाच्या सहाय्याने हा संसार पार केल्या जातो.
संत नरहरी महाराज म्हणतात, पांडुरंगा मी आपला दास असून हा संसार विवेक बुध्दीने, मन व बुध्दीची सांगड घालून रात्रंदिवस ईश्वराच्या नामाने पार करणार आहे.
14. देह जन्मला व्यर्थ ।
देह जन्मला व्यर्थ । झाले पापाचे पर्वत ।। 1।।
कांहीं नाहीं तीर्थ केलें । जन्मूनियां व्यर्थ झालें ।। 2।।
दान धर्म नाहीं केला । देह मसणवटीं गेला ।। 3।।
नरहरी सेवक सद्गुरुचा । दास हो साधुसंतांचा ।। 4।।
संत नरहरी महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून मानवी देह प्राप्त झाल्यानंतर तो व्यर्थ विनाकारण घालू नये. पापकर्म केल्याने पापाचे डोंगर होतात व न केल्याने व्यर्थ जन्म जातो. दानधर्म न केल्यास शेवटी स्मशानात जावे लागते. मी सद्गुरुचा व साधुसंतांचा दास असल्याचे प्रतिपादन करतात.
मानवी जन्म माणसाला सहज प्राप्त होत नसतो. जेव्हा अनेक योनीमधून हा जीव जातो व शेवटी पाप व पुण्य समान झाल्यानंतर मानवी जन्म प्राप्त होतो. मानवी जन्म प्राप्त झाल्यानंतर तो सार्थकी लावणे हे आपले कर्तव्य ठरते म्हणून या जन्माचे मोल जाणून आपले जीवन व्यर्थ घालवू नये. मानवी देह सत्कार्याकरिता सत्कर्म करीत घालवावा. वाईट कर्माने पाप घडते. असंख्य दुष्कर्माने पापांचे डोंगर निर्माण होतात. या सर्व पाप कर्मांचा नाश करण्यास सत्कर्म करावे लागते.
जीवनामध्ये आल्यानंतर ईश्वराविषयी भावभक्तीकरुन तीर्थयात्रा करावी. अन्यथा आपला जन्म वाया जाईल तसेच दानधर्म आपल्या परीने जेवढे शक्य आहे तेवढे करण्याचा प्रयत्न करावा. तोच दानधर्म आपल्याला या जीवनातून तारणारा ठरणार आहे. आपला मानवी देह हा नाश पावणार असून तो नाशिवंत आहे एक ना एक दिवस तो स्मशानातच जाणार आहे.
संत नरहरी महाराज म्हणतात, मी माझ्या सद्गुरुचा सेवक असून साधू-संतांचे दास्यत्व स्वीकारले आहे. त्याचे चरणी काया, वाचा व मनाने समर्पित भाव ठेवला आहे. ज्याद्वारे माझा मानवी जन्म व हा देह सार्थकी ठरणार आहे.
15. देह जन्मला व्यर्थ ।
देह जन्मला व्यर्थ । झाले पापांचे पर्वत ।। 1।।
दान धर्म नाहीं केला । शेवटी जन्म व्यर्थ गेला ।। 2।।
देह अवघा क्षणभंगुर । दिसे स्वप्रवत् सार ।। 3।।
नरहरी म्हणे शेवटीं । संगें न येई लंगोटी ।। 4।।
संत नरहरी महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून मानवी जन्म हा व्यर्थ घालवू नये. पाप न करता दानधर्म करावा. मानवी देह क्षणभंगूर असून शेवटी सोबत लंगोटी सुद्धा येत नसल्याचे प्रतिपादन करतात.
मानवी जन्म हा अनेक योनीमधून आल्यानंतर प्राप्त होत असल्याचे संतांनी सांगितले आहे. तो सहज प्राप्त होत नाही. म्हणून मानवी जन्म मिळाल्यानंतर तो सार्थकी लावावा. अनेक वाईट कर्मामुळे पापाचे डोंगर निर्माण होत असतात. मानवी जन्मात आल्यानंतर दानधर्म करावा लागतो. त्यामुळे आपला जन्म सार्थकी ठरतो. अन्यथा तो जन्म व्यर्थ ठरतो. या मृत्युलोकात येणारा प्रत्येक जण हा मरणाकरिताच आलेला असतो. जो जन्म घेतो तो एक दिवस इथून जाणार असतो. कधी जाणार हे सांगता येत नाही. माणसाचे जीवन हे नाश पावणारे आहे. आपला देह सुध्दा नाश पावतो. हेच जीवन क्षणभंगुर म्हणजेच क्षणिक काळाचे आहे. हा संसार येथील जीवन सर्वकाही स्वप्नाप्रमाणे असते. एवढे मात्र सत्य आहे की, एक दिवस येथून जाणे निश्चित असते.
संत नरहरी महाराज म्हणतात, मानवी जन्म प्राप्त झाल्यामुळे क्षणिक असणारे आपले जीवन सुद्धा सत्कर्माद्वारे सार्थकी लागू शकते. देह नाशिवंत आहे. माणूस शेवटी काहीही घेवून जात नाही. स्वतःची लंगोट सुद्धा सोबत घेऊन जात नसतो. हेच मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे.
16. धन्य पुंडलिक भक्त निवडला ।
धन्य पुंडलिक भक्त निवडला । अक्षयीं राहिला चंद्रभागी ।। 1।।
भक्त नामदेव अक्षयीं जडला । पायरी तो झाला महाद्वारीं ।। 2।।
ज्ञानोबा सोपान निघती हे भक्त । अक्षयीं राहत परब्रह्मीं ।। 3।।
बोधराज भला वचनीं गोविला । कीर्तनीं राहिला पांडुरंग ।। 4।।
साधुसंत फार येती थोर थोर । उभा निरंतर चोखामेळा ।। 5।।
संत साधुजन वंदिती चरण । नरहरी निशिदिन सेवेलागी ।। 6।।
संत नरहरी महाराजांच्या सहा चरणाच्या अभंगातून पांडुरंगाचे भाविकभक्त भक्त पुंडलिक चंद्रभागेच्या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या पायरीशी तसेच ज्ञानेश्वर व सोपान ही सर्वजण त्यांच्यासोबत अखंड आहेत. तेथे चोखोबा सुद्धा आहेत. हरीकीर्तनात पांडुरंगाची उपस्थिती असल्याचे प्रतिपादन करतात.
पंढरीच्या पांडुरंगाचे आवडते भक्तगण त्याच्यासोबत सदैव राहत असतात. चंद्रभागेच्या तीरावर ज्या भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची केलेली सेवा बघून प्रसन्न होऊन पांडुरंग तेथे आला आहे, त्या ठिकाणी भक्त पुंडलिकाचे अस्तित्व आहे. भक्त संत नामदेव महाराजांनी सुद्धा महाद्वाराच्या पायरीशी अखंडपणे अक्षय पद प्राप्त केले आहे. पांडुरंगाचे इतर भाविकभक्त संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत सोपान महाराज हे सुद्धा परब्र्रह्म असणाÚया विठोबा सोबतच असल्याचे दिसून येतात. तसेच भक्त बोधराज सुद्धा आपल्या वचनात राहिले आहेत. आपल्या भाविक भक्तांच्या हरिकीर्तनात पांडुरंग स्वतः उपस्थित राहत असतात. या पंढरीत पांडुरंगास भेटण्यासाठी साधुसंत मंडळी येत असतात. तसेच भाविकभक्त सुद्धा विठोबाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात. या ठिकाणी अनेक भक्त मंडळी असून संत चोखामेळा महाराजांची निरंतर उपस्थिती लाभली आहेत.
संत नरहरी महाराज म्हणतात, पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकभक्त आणि साधुसंत मंडळी पंढरीत येत असतात. अशा संतांच्या चरणी मी मनोभावे शरण जात असून त्यांची दिवस-रात्र सेवा माझ्या हातून घडत आहे.
18. नाम फुकाचें फुकाचें ।
नाम फुकाचें फुकाचें । देवा पंढरीरायाचें ।। 1।।
नाम अमृत हें सार । हृदयीं जपा निरंतर ।। 2।।
नाम संतांचे माहेर । प्रेम सुखाचें आगर ।। 3।।
नाम सर्वांमध्ये सार । नरहरी जपे निरंतर ।। 4।।
संत नरहरी महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून पंढरीनाथाचे नाम हे निःशुल्क असून अमृत असल्याने त्याचा आपल्या हृदयात निरंतर जप करावा. नाम हे साराचे सार असून प्रेम सुखाचा साठा आहे. ते संतांचे माहेर असून मी सदैव जपत असल्याचे प्रतिपादन करतात.
पंढरीच्या विठोबाचे नाम हे फुकट/विनाशुल्क आहे त्या नामाकरीता कोणतेही मूल्य लागत नाही. नाम घेण्यास कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही, असे ते नाम ईश्वर असणाÚया पंढरीनाथाचे आहे. अमृत जे माणसाला अमर करणारे असते, असे हे भगवंताचे नाम त्या अमृताचे सार आहे. पांडुरंगाचे भाविकभक्त हे विठोबाचे नामास आपले माहेर समजतात कारण पंढरी हे या संतांचे/भाविक भक्तांचे माहेरघर आहे. कारण ईश्वराच्या या नामात भगवंताचे प्रेम सुख साठवलेले असून ते नाम प्रेम सुखाचे भांडारघर आहे. सर्व साराचे सार असणारे हे पांडुरंगाचे नाम आहे. म्हणून सर्वांनी या भगवंताच्या नामाचा स्वीकार मनोभावे करावा.
संत नरहरी महाराज म्हणतात, पांडुरंगाचे नाम हे सार आहे ते बीजतŸव आहे. त्या नामाचा मी स्वीकार करीत असून दिवसरात्र त्याचा जप करीत आहे.
19. नाम हे नगरी वैकुंठ पंढरी ।
नाम हे नगरी वैकुंठ पंढरी । नांदता श्रीहरी पांडुरंग ।। 1।।
नरदेहीं जन्मलें पंढरीस गेले । दृष्टभरि पाहिले पांडुरंग ।। 2।।
भीवरेचें स्नान देवाचें दर्शन । पाप हे जळोन जाय तेथें ।। 3।।
चरणावरी माथा नरहरी ठेविला । हृदयी बिंबला पांडुरंग ।। 4।।
संत नरहरी महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून पंढरी वैकुंठ असणाÚया पंढरीनाथाला जन्माला आल्यानंतर तेथे जाऊन डोळ्यांनी पहावे. भीमा नदीत स्नान करून विठोबाचे दर्शन घेतल्यास संपूर्ण पापाचा नाश होत असतो. असा पांडुरंग माझ्या हृदयात बिंबला असल्याचे प्रतिपादन करतात.
माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर वैकुंठभूमी असणाÚया पंढरी या तीर्थक्षेत्रास अवश्य आपण जावे. या पंढरीमध्ये पंढरीनाथाचे स्थान असून तेथे तो नांदत आहे. अशा पंढरीला गेल्यानंतर सर्वप्रथम भीमा नदीत स्नान करावे. स्नानानंतर पंढरीनाथाचे मनोभावे दर्शन घ्यावे व आपल्या डोळ्याने डोळे भरून त्या विठोबास पहावे. त्यामुळे आपले जे काही वाईट कर्मामुळे झालेले पाप असेल त्या सर्व पापांचा नायनाट या पंढरीनाथाच्या मनोभावे दर्शनाने होत असतो. पंढरीच्या पांडुरंगाची अशी पंढरीनगरी मानवाचा उद्धार करणारी आहे. या ठिकाणी अवश्य सर्वांनी भेट द्यावी व आपला उद्धार करावा.
संत नरहरी महाराज म्हणतात, अशा पंढरी निवासी असणाÚया पांडुरंगास मी काया, वाचा व मनाने समर्पित होऊन त्याच्या चरणावर नतमस्तक होत आहे. कारण तोच परमात्मा विठोबा माझ्या हृदयात प्रतिबिंबित झाला आहे.
20. नाशिवंत देह मनाचा निश्चय ।
नाशिवंत देह मनाचा निश्चय । सद्गुरुचे पाय हृदयीं असो ।। 1।।
कलीमध्यें फार सद्गुरु हा थोर । नामाचा उच्चार मुखीं असो ।। 2।।
भजनाचा गजर नामाचा उच्चार । हृदयीं निरंतर नरहरीचें ।। 3।।
संत नरहरी महाराजांच्या तीन चरणाचा अभंगातून माणसाचा देह नाश पावणारा असल्याने सद्गुरुला शरण जावे. कलियुगात सद्गुरु हेच श्रेष्ठ असून ईश्वराचे नाम मुखाने घ्यावे. त्या नामाचा उच्चार मनोभावे करावा. असा पांडुरंग माझ्या हृदयात सदैव असल्याचे प्रतिपादन करतात.
या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक मानव देह हा येथून एक दिवस नाश पावत असतो, मात्र केव्हा व कधी येथून निघून जाणार हे सांगता येत नाही. यावरून माणसाचा मिळालेला देह हा एक दिवस नाश पावणारा आहे हे निश्चितपणे आपण सांगू शकतो म्हणून या कलियुगामध्ये असणारे सद्गुरुंना मनोभावे शरण जाऊन त्यांच्या चरणी लीन होणे हिताचे ठरते. कारण या कलियुगी सद्गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचे मार्फतच आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. भगवंताचे पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ असून त्या नामाचा आपल्या मुखाने जप करीत राहावा. आपणांस सद्गुरु सुद्धा ईश्वराचे नाम घेण्यास सांगत असतात. या संसार सागरातून सद्गुरूची कृपा व ईश्वराचे नाम आपणास तारणारे आहे व आपले जीवनाचे सार्थक ठरणार आहे.
संत नरहरी महाराज म्हणतात, सद्गुरुनी दिलेल्या ईश्वराच्या पांडुरंगाच्या नामाचा उच्चार मी सदैव करीत असून त्याच नामाचा भक्तिभावाने गजर करीत आहे. कारण ते नाम माझ्या हृदयात सदैव वास करीत आहे.
21. पहा दिसतो पदार्थ ।
पहा दिसतो पदार्थ । अवघा नाशिवंत व्यर्थ ।। 1।।
माया बहुरुपी नटली । नवखंडी प्रगटली ।। 2।।
प्रपंच हें माया जाळ । घातलें भ्रांतीचें पडळ ।। 3।।
उमज पडेना हो कांहीं । मस्तक सद्गुरुचे पायीं ।। 4।।
सद्गुरुनाम हें अमृत । नरहरी जपे हृदयांत ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून जे काही दिसते ते सर्व काही नाशिवंत आहे. येथे संपूर्ण जग हे मायेने भरले असून त्याची परिनिती या प्रपंचात दिसून येते. या मायाजाळामुळे सर्वजनाला भ्रम पडला आहे. त्यामधून काहीही सूचत नाही. यामधून सद्गुरूच वाचवू शकतात, म्हणून त्यास शरण जात असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराने निर्माण केलेली संपूर्ण सृष्टी ही मायेने/मायाजाळाने परिपूर्ण भरलेली आहे. जे काही डोळ्याने दिसत आहे. ते संपूर्ण दृष्य, पदार्थ हे नाश पावणारे आहे. कारण ते नाशिवंत आहेत. या संसारात माया ही नटून अनेक विविध प्रकारे प्रगटली आहे. या मायाजाळात आपण सर्वजण गुंतून जातो. आपल्या डोळ्यावर त्या मायेचा पडदा पडलेला असल्याने आपणास खरे काय ते कळत नाही, काहीही उमगत नाही. भ्रमिष्टाप्रमाणे आपण सर्वजण वागत असतो. याकरिता सद्गुरुला मनोभावे शरण जावे लागते. सद्गुरू आपणांस खरा मार्ग सांगून दिशा दाखवण्याचे कार्य करतात.
संत नरहरी महाराज म्हणतात, सद्गुरूंची कृपा ही माझ्यावर असल्याने त्या सद्गुरुला मी मनोभावे शरण जात असून त्या सद्गुरूचे नाम हे अमृत असून माझ्या हृदयात प्रतिबिंबित झाले आहे.
22. पापांचे पर्वत मोठे मोठे झाले ।
पापांचे पर्वत मोठे मोठे झाले । शरीर नासलें अधोगती ।। 1।।
जन्मांतरी केलें अवघें व्यर्थ गेलें । देह हो नासले क्षणामाजी ।। 2।।
जिणें अशाश्वत देह नाशिवंत । अवघें सारें व्यर्थ असे देखा ।। 3।।
कांहीं नाहीं दान काहीं नाहीं पुण्य । जन्मासी येऊन व्यर्थ जाय ।। 4।।
परोपकार कांहीं नाहीं केला देवा । सद्गुरु केशवा हृदयीं घ्यावा ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या सहा चरणाच्या अभंगातून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर परोपकार व दानादि पुण्यकर्म न करता वाईट कर्माद्वारे पापाचे पर्वत होत गेले, त्यामुळे देह/शरीर नासले आहे. देह सुद्धा नश्वर आहे. ईश्वराचे नाम व सद्गुरूसी मनोभावे शरण जावे लागते. हृदयात त्याचे नाम निरंतर ठेवत असल्याचे प्रतिपादन करतात.
मानवी जन्म हा नाशिवंत आहे, तो नाश पावणारा असून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर सत्कार्य करण्याऐवजी दृष्ट कार्य करीत गेल्याने असंख्य अशा वाईट कर्मामुळे पापांचे डोंगर तयार झालेत. पापांचा वाटेकरी ठरलो आहे. त्यामुळे मानवी देह हा नासून गेला आहे. अधोगती प्राप्त झाली आहे. त्यामुळे जीवन व्यर्थ निरर्थक ठरले आहे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर सत्कर्म करावे ज्याद्वारे पुण्याचा साठा निर्माण होतो. दानधर्म करावा लागतो. परोपकारी वृत्तीद्वारे इतरांचे सहकार्य करुन उपकार करावेत, परंतु ते न केल्याने जन्म व्यर्थ गेल्यासारखा असतो. आपण आपल्या सद्गुरुला मनोभावे शरण जाऊन त्यांना आपल्या हृदयात स्थान द्यावे.
संत नरहरी महाराज म्हणतात, ईश्वराचे पांडुरंगाचे नाम सर्वश्रेष्ठ असून साराचे सार आहे ते ईश्वरीय नाम माझ्या हृदयात सदैव वास करीत आहे.
23. पंढरपुरचा जाणा विठ्ठली धणी ।
पंढरपुरचा जाणा विठ्ठली धणी । राणी रुक्मिणी सत्यभामा ।। 1।।
भूमीमध्यें गुप्त कानोपात्रा झाली । उजवे बाजू ठेली लक्ष्मी ते ।। 2।।
पुढें हो प्रतिमा नामदेव पायरी । उभा महाद्वारीं चोखामेळा ।। 3।।
पुढे मल्लिकार्जुन महिमा असे फार । लिंग असे थोर महादेवाचे ।। 4।।
पुढें भागरथी मध्यें पुंडलिक । आणिकही तेथें वेणुनाद ।। 5।।
आषाढी कार्तिकी साधुसंत येती । गोपाळकाला करिती आनंदाने ।। 6।।
देवाचें समोर नरहरी सोनार । हृदयीं निरंतर नांव घेतो ।। 7।।
संत नरहरी महाराजांच्या सात चरणांच्या अभंगातून पंढरीच्या पांडुरंगाच्या आसपास/जवळ असणाÚया राणी रुक्मिणी, सत्यभामा, संत नामदेव, संत चोखोबा, मल्लिकार्जुन, भक्त पुंडलिक इत्यादींचा उल्लेख करून पंढरीत साधुसंत येतात व आनंदाने गोपाळकाला करतात. तेथे मी सुद्धा उपस्थित असून हृदयात अखंडपणे नाम घेत असल्याचे प्रतिपादन करतात.
पंढरी या भूवैकुंठी पांडुरंग आमचा धनी/मालक आहे. त्यांच्यासोबत राणी रुक्मिणी, सत्यभामा, लक्ष्मी सुद्धा उपस्थित आहेत. या ठिकाणी संत कान्होपात्रा ज्या विठोबाच्या भावीकभक्त होत्या त्या सुद्धा तेथे गुप्त झालेल्या आहेत. सुरुवातीला महाद्वारामध्ये संत चोखामेळा महाराजांची समाधी असून त्याला लागून संत नामदेव महाराजांची पायरी आहे. जेथे संत नामदेवांनी आपल्या परिवारासह चीर समाधी घेतली आहे. समोर मल्लिकार्जुन आणि महादेव दिसून येतात. चंद्रभागेच्या तीरावर ज्यांनी पंढरीच्या पांडुरंगाला येथे आणलेत ज्यांच्या आई-वडिलांचे निरपेक्ष व निःस्वार्थी सेवा या कार्याने प्रसन्न होऊन येथे आलेत. अशा भक्त पुंडलिक सुध्दा येथेच आहे. आषाढी-कार्तिकीला महायात्रा विठोबाची भरत असल्याने या यात्रेला पंढरीत भाविकभक्त व साधुसंत मोठ्या आनंदाने येत असतात व आनंदाने सर्वजण गोपाळकाला करतात. तसेच वेणुनाद सुद्धा येथचे दिसून येतो. येथील सुखाचा, आनंदाचा प्रत्येक भाविकभक्तास जाणवतो.
संत नरहरी महाराज म्हणतात, अशा पांडुरंगाच्या पंढरीत मी नरहरी सोनार विठोबाच्या समोर उभा आहे व हृदयात अखंडपणे सदैव ईश्वराचे नाम घेत आहे
24. पंढरी नगरी दैवत श्रीहरी ।
पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ।। 1।।
आषाढी कार्तिकी महापर्वे थोर । भजनाचा गजर करिती तेथें ।। 2।।
साधुसंत थोर पताकांचा भार । मुखीं तो उच्चार नामामृत ।। 3।।
आनंदाचा काला गोपाळकाला केला । हृदयी बिंबला नरहरी ।। 4।।
संत नरहरी महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून पंढरी नगरी हे पांडुरंगाची आहे येथे वारकरी नित्यनेमाने आषाढी-कार्तिकीला येऊन विठोबाचे नामाचा गजर करतात. साधुसंत पताका घेऊन मुखाने अमृतासमान विठोबाचा नामघोष करुन आनंदाने गोपाळकाला करतात. तो विठोबा माझ्या हृदयात प्रतिबिंबित झाला असल्याचे प्रतिपादन करतात.
पंढरपूर हे पांडुरंगाची वैकुंठ भूमी आहे. पंढरी नगरी हे श्रीहरीच्या नावानेच ओळखल्या जाते. याठिकाणी विविध भागातून अनेक वारकरी नित्यनेमाने येत असतात. वर्षभरात चार पांडुरंगाच्या वाÚया चैत्री, माघी, आषाढी व कार्तिकी महत्त्वाच्या असतात. परंतु यापैकी वारकरी आषाढी व कार्तिकी यात्रेला महापर्व समजून संपूर्ण भाविकभक्त हे विठोबाच्या दर्शनाला पंढरीस येत असतात. त्या ठिकाणी विठोबाच्या नामाचा गजर मोठ्या प्रेमाने , आनंदाने व मनोभावे करताना दिसतात. भाविक भक्त तसेच साधुसंत पताकांचा भार आपल्या खांद्यावर घेऊन मुखाने विठोबाच्या अमृत समान असणाÚया नामाचा उच्चार मोठ्या आर्तस्वरूपात करतात. संपूर्ण पंढरी नगरी वारकÚयांनी दुमदुमून जाते.
संत नरहरी महाराज म्हणतात, भाविकभक्त, साधुसंत, तसेच वारकरी हे पंढरीत आल्यानंतर प्रेमाने व आनंदाने गोपाळकाला करतात. तोच पांडुरंग माझ्या हृदयात प्रतिबिंबित झाला आहे.
25. पंढरी नगरी नांदतो श्रीहरी ।
पंढरी नगरी नांदतो श्रीहरी । गाई विळत्या करी गोपाळपुरीं ।। 1।।
गोपाळ मिळाले गोपाळपुर झाले । अक्षयीं राहिले देव तेथें ।। 2।।
संध्या जेथें केली संध्यावळी झाली । प्रतिमा ठेवली स्थळोस्थळीं ।। 3।।
चरण ठेविले पद्यतीर्थ झालें । अक्षयीं राहिलें तेव्हा तेथें ।। 4।।
वेणु वाजवीत चंद्रभागी आले । वेणुनाद झाले अखंडित ।। 5।।
पंढरी हे स्थळ वैकुंठ सकळ । साधु हो निर्मळ आहे तेथें ।। 6।।
अखंडित वापते उच्चार नामाचा । सेवक संतांचा नरहरिदास ।। 7।।
संत नरहरी महाराजांच्या सात चरणाच्या अभंगातून पंढरी आणि गोपाळपुरीचे वर्णन करतात. पंढरी नगरीत पांडुरंग परमात्मा आहे. गोपाळपुरीत गोपाळ व धेनू असून देवाचे स्थान तेथे पद्मतीर्थ आहे. निर्मळ मनाचे
साधुसंत असून वेणूनाद अखंडपणे सुरु असतो. पंढरीनाथाचा निरंतर उच्चार करीत असून संतांचा दास असल्याचे प्रतिपादन करतात.
पंढरी हे वैकुंठ असून या ठिकाणी पंढरीनाथाचे वास्तव्य आहे. पंढरीनाथ या ठिकाणी नांदत आहेत. गोपाळपुरी सुद्धा तीर्थक्षेत्र असून तेथे असंख्य गोपाळ मिळाल्यामुळे गोपाळांचा मेळा येथे झाल्याने गोपाळपुरीची निर्मिती झाली आहे. गोपाळांसोबत गायी सुद्धा आहेत. त्या ठिकाणी गायीचे चरणस्पर्श झाल्यामुळे पद्मतीर्थ झाले आहे. तेथे संध्या केल्यामुळे
संध्यावळी झाली आहे. अशा ठिकाणी भगवंताचे अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पाहणारे देवाचे स्थानाची निर्मिती झालेली आहे. वेणुचा नाद हा अखंडित आहे. पंढरी वैकुंठ भूमित अनेक भाविकभक्त आणि साधुसंत येतात ते सर्वजण मनाने निर्मळ असून दयाळू आहेत.
संत नरहरी महाराज म्हणतात पंढरीच्या पांडुरंगाचा मी भाविकभक्त असल्याने माझ्या मुखातून निरंतर विठोबाच्या नामाचा उच्चार करीत आहे. तसेच संतांचे दास्यत्व स्वीकारले असून त्यांची मनोभावे सेवा करीत आहे.
26. प्रारब्धाची गति ।
प्रारब्धाची गति । कदाकाळीं न सोडिती ।। 1।।
दैवयोगाची गती । जी होणार ती होती ।। 2।।
जें जें कर्माचें फळ । तें तें भोगावें सकळ ।। 3।।
ज्याचें बीज पेरियेलें । त्याचें त्यास फळ आलें ।। 4।।
ज्यानें जैसें आचरिलें । तैसें त्याच्या फळा आलें ।। 5।।
नरहरी म्हणे नाम थोर । नाम साराहुनि सार ।। 6।।
संत नरहरी महाराजांच्या सहा चरणाच्या अभंगातून प्रारब्धाची गती ही वेगळी असते, त्यानुसार दैव बनत असते. आपणांस आपल्याच कर्माची फळे भोगावी लागतात. जसे बीज तसे फळ निर्माण होते. आचरणानुसार फळ प्राप्त होते. ईश्वराचे नाम श्रेष्ठ असून ते साराचे सार असल्याचे प्रतिपादन करतात.
माणसाच्या प्रारब्धानुसार माणूस आपले जीवन जगत असतो. माणसाचे प्रारब्ध माणसाची जीवनामधील कर्मे ठरवीत असतात, म्हणजेच कर्मानुसार प्रारब्ध बनते सत्कर्माची पुढे चांगली आणि वाईट कर्माची वाईटच फळे प्राप्त होतात. यावरून माणूस जेव्हा सत्कार्य करीत असतो तेव्हा त्याचा पुण्याचा साठा निर्माण होऊन त्या पुण्यामुळे चांगले फळ उपभोगावयास मिळतात, व वाईट कर्मामुळे पापांचा संचय होत असून त्या पापास दुःखाचे/वेदनेचे फळ म्हणजेच वाईट फळ लागते. कर्म तसे फळ माणसास भोगावे लागते यालाच प्रारब्ध म्हणतात. तेच संचित ठरते. त्यांची गती ही निराळीच असते माणसाचे आचरण जशा प्रकारचे असेल त्यानुसार त्यास फळ प्राप्त होते. चांगल्या आचरणाची चांगले व वाईट आचरणाचे वाईट फळ माणसाला भोगावे लागतात.यामध्ये काहीही तडजोड नाही.
संत नरहरी महाराज म्हणतात, पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ असून ते साराचे सार आहे. तेच मी अखंडपणे निरंतर घेत आहे.
27. प्रेम शांती दया शरण निर्धारे ।
प्रेम शांती दया शरण निर्धारे । बसले उदासी सर्व काळ ।। 1।।
काया वाचा मन निवडूनी प्राण । गुह्य ज्ञान पूर्ण सर्व साक्षी ।। 2।।
सद्गुरुची कृपा होय जयावरी । तो हा श्रीहरीचा संत झाला ।। 3।।
संत साधुजन वंदुनियां पूर्ण । वाचे नारायण नाम घेतो ।। 4।।
नरहरी सोनार म्हणे हरिचा दास । भावें रात्रंदिवस नाम घेतो ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून सद्गुरूच्या
कृपेने गुह्य ज्ञान प्राप्त होते. त्याकरिता त्यांना काया, वाचा व मनाने शरण जावे लागते. साधूसंतांचा सहवास व ईश्वरी नामाची कास धरावी लागते. ईश्वराचे नाम निरंतर मनोभावे घेत असून त्याचा मी दास असल्याचे प्रतिपादन करतात.
सद्गुरु हा कृपाळू असून त्यांना भाविकभक्तांने ही कायेने, वाचेने व मनाने शरण जाणे आवश्यक असते.सद्गुरुला मनोभावे शरण गेल्याशिवाय सद्गुरूची कृपादृष्टी लागत नाही. ज्यांच्यावर ही सद्गुरू कृपा दृष्टी लागते. तो ईश्वरापर्यंत सहज पोहोचतो. व संत बनतो. प्रेम, शांती व दया या तीन तत्त्वांचा अंगीकार करावा लागतो. त्यामुळे आपले ध्येय/इच्छा पूर्ण होऊ शकते आपल्या मनात साधुसंतांबद्दल आदरभाव तसेच त्यांचे चरणी सदैव नतमस्तक शरण होणे हिताचे ठरते, म्हणून साधुसंतांना शरण व वाणी
मधून ईश्वरी नामाचे चिंतन स्मरण असावे लागते. ईश्वराचे नाम सर्वश्रेष्ठ असून ते सार्थकी ठरते.
संत नरहरी महाराज म्हणतात, मी पांडुरंगाचे दास्यत्व स्विकारले असून मनोभावे रात्रंदिवस विठोबाचे नाम माझ्या मुखातून घेत आहे.
28. भस्म उटी रुंडमाळा ।
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ।। 1।।
गज चर्म व्याघ्रांबर । कंठी शोभे बासुकी हार ।। 2।।
भुतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ।। 3।।
सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ।। 4।।
संत नरहरी महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून भगवान शंकराच्या सगुण स्वरूपाचे वर्णन करतात. भगवान शंकराने भस्म सर्वांगास लावून रुद्राक्षाची माळ गळ्यात घातली आहे. हातात त्रिशूल असून डोळ्यात अग्नी ज्वाळा दिसून येतात. असे सगुण स्वरूपाचे वर्णन हे सर्व सुखाचे सुख असल्याचे प्रतिपादन करतात.
भगवान शंकर परमात्म्याचे सगुण स्वरूपाचे विस्तृत वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. सृष्टीची निर्मिती करणारे भगवान ब्रह्मदेव पालन पोषण करणारे भगवान विष्णू परमात्मा आणि संहार म्हणजेच नाश करणारे भगवान शंकर म्हणजेच महादेव अशा तीन देवता या वंदनीय ठरतात. यामधील भगवान शंकराचे म्हणजेच महादेवाचे वर्णन करतांना भगवान शंकर म्हणजेच महादेवांनी आपल्या अंगाला सर्वत्र भस्म लावले आहे. आपल्या गळ्यात रुद्राक्षांची माळ परिधान केलेली आहे. तसेच आपल्या हातात त्रिशूळ हे शस्त्र बाळगले असून डोळे अगदी लालसर आहेत, कारण अग्नीच्या ज्वाळा त्या डोळ्यात दिसून येतात. आपल्या कमरेला वाघाचे कातडे गुंडाळले असून गळ्यात शोभणारा बासुकी म्हणजेच सर्पांचा राजा दिसून येतो. भगवान महादेवासोबत भूते आणि वेताळ आनंदाने नाचत आहे. या सर्वांचा महादेवांना मनस्वी आनंद होत आहे.
संत नरहरी महाराज म्हणतात, भगवान महादेव हे सर्व सुखाचे आगार आहे.
29. भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर ।
भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर । तेथें मी पामर काय वर्णू ।। 1।।
भूषण जयाचें भुवना वेगळें । रुंडमाळा खेळे गळ्यामध्यें ।। 2।।
कर्पुरगौर भोळा सांब सदाशिव । भूषण धवल विभूतीचें ।। 3।।
माथां जटाभार हातीं तो त्रिशूळ । श्वेत शंख बळें फुंकीतसे ।। 4।।
नाम घेतां ज्याचे पाप ताप जाती । पापी उध्दरती क्षणमात्रें ।। 5।।
नरहरी सोनार भक्ति प्रियकर । पार्वती शंकर हृदयीं ध्यातो ।। 6।।
संत नरहरी महाराजांच्या सहा चरणाच्या अभंगातून भगवान महादेवाच्या सगुण स्वरूपाचे वर्णन केले आहे. महादेवाच्या पुढे नंदी असून गळ्यात माळ, हाती त्रिशूल, ज्यांच्या नामाने पाप-ताप नाहीसे होऊन पापीयांचा उद्धार होतो. असे प्रतिपादन करतात.
भगवान महादेवाच्या सगुण स्वरुपाचे वर्णन करतांना भगवान महादेव हे भोळे आहेत. भगवान महादेव हे आपल्या भक्तांना त्वरित म्हणजेच लवकर प्रसन्न होऊन भक्त जे मागेल ते दान देवून त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात. अशा भगवान महादेव यांच्यासमोर सेवाधारी नंदीश्वर दिसून येतो. माझ्यासारखा त्या महादेव भक्ताचे वर्णन करू शकणार नाही त्याच्या गळयात शोभणारी अशी रुद्राक्षाची माळ दिसून येते व हातात त्रिशूळ धरले आहे. डोक्यावर जटांचा भाग दिसून येतो. पांढरा शंख जोराने फुंकतात. अशा भगवान महादेवाचे नाम घेतल्यास या संसारामधील आधि भौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक असा तीन प्रकारचा ताप नाहीसा होतो. तसेच या तापापासून निर्माण होणाÚया दुःखाचा नायनाट महादेवाच्या नामजपाने होतो व असंख्य पापाचा तसेच पापीयांचा एका क्षणात भगवंत महादेव उद्धार करतात.
संत नरहरी महाराज म्हणतात, भगवान महादेवांना भाविक भक्तांची भक्ती फार प्रिय आहे असा शंकराच्या हृदयात सदैव पार्वतीचा वास असतो.
30. शरीराची होय माती ।
शरीराची होय माती । कोणी न येती सांगाती ।। 1।।
सारी अवघीं कामें खोटी । अंतीं जाणें मसणवटी ।। 2।।
गोत घरे टाकुन सारी । शेवटीं गांवाचे बाहेरी ।। 3।।
स्वजन आणि गणगोत । उपाय नाहीं हो चालत ।। 4।।
ऐसें स्वप्नवत असार । नरहरी जोडितसे कर ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून मानवी जीवनातील सत्यता प्रकट करतात. माणसाचे शरीर नश्वर असून त्याच्या सोबत कोणीही जात नाही. तो एकटाच स्मशनात जातो. सर्व गणगोत येथेच टाकून तो जात असतो. हा संसार स्वप्नवत असल्याचे प्रतिपादन करतात.
माणसाचे जन्म व मरण हे चक्र सतत चालू असते. माणूस जन्माला आला म्हणजे त्यास मृत्यू हा एक दिवस येणार हे निश्चित आहे. मानवी देह हा अष्टधा प्रकृतीचा आहे. म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश आणि रज, तम आणि सत्व असे एकूण आठ तत्त्वाचा माणूस बनतो. परंतु हा मानवी देह नश्वर आहे म्हणजे नाश पावणार आहे. त्याचा काहीही भरवसा नाही. आपली बायका, पोरे, सगेसोयरे, इष्टमित्र त्याचप्रमाणे भौतिक साधनसामुग्री व वैभव, संपत्ती यापैकी काहीही आपल्या सोबत येथून जातांना येत नाही. येथून फक्त एकट्यालाच जावे लागते. यावर कोणाचाही काहीही उपाय चालत नाही. कोणालाही काहीही करता येत नाही. शेवटी स्मशानातच जावे लागते. संसार हा मृगजळाप्रमाणे स्वप्नवत असतो. स्वप्नासारखे माणसाचे जीवन असते हे माणसाला कधीही कळत नाही.
संत नरहरी महाराज म्हणतात, मी सर्वांना हात जोडून विनम्रपणे सांगत आहे की, हा संसार तसेच हे जीवन स्वप्नासारखे आहे, जसे स्वप्नामध्ये जे काही दिसते ते सर्व काही खोटे असून तसे वास्तवात नसते असे हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे.
31. सकळ धर्माचे कारण ।
सकळ धर्माचे कारण । नामस्मरण हरिकीर्तन ।। 1।।
दया क्षमा समाधान । घ्यावें संतांचें दर्शन ।। 2।।
संत संग वेगीं । वृŸा जडों पांडुरंगीं ।। 3।।
भुलूं नका या संसारीं । हरी उच्चारी उच्चारीं ।। 4।।
विठोबा रक्षिल शेवटीं । उभा कर दोन्ही कटीं ।। 5।।
नरहरी जाणूनि शेवटीं । संतचरणा घाली मिठी ।। 6।।
संत नरहरी महाराजांच्या सहा चरणाच्या अभंगातून सर्व धर्माचे सार हे ईश्वराचे हरिकीर्तन नामस्मरण करणे होय. दया, क्षमा, बाळगून संत दर्शन घ्यावेत. भगवंत पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हावेश् शेवटी हाच भगवंत आपले रक्षण करणार असल्याचे प्रतिपादन करतात.
सर्व धर्माचे कारण काय असेल तर ईश्वराचे नामस्मरण करणे होय. भगवंतास/पांडुरंगास काया, वाचा व मनाने शरण जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होणे महत्वाचे ठरते. आपल्यामध्ये दयाभाव आणि क्षमावृत्ती ठेवून संतांना शरण गेल्याने आपणांस मानसिक समाधान लाभणार आहे संतांचे चरणी लीन भाव प्रकट करून त्यांची संगत सदासर्वकाळ धरावी. ज्याद्वारे आपण पांडुरंगापर्यंत पोहोचणार आहोत. ईश्वराचे नाम हे सर्वश्रेष्ठ असून आपल्या जीवनाचे सार्थक करणारे असल्याने ते आपल्या मुखातून सदैव घेत राहावे. या संसारात आल्यानंतर आपणांस भगवंत पांडुरंगाचा कधीही विसर पडू देवू नये त्या पांडूरंगाचे भाविकभक्त बनावे. ज्याद्वारे तो ईश्वर आपले प्रसंगी सहकार्य करून संरक्षण करणार आहे. असा तो विठोबा दोन्ही हात कमरेवर ठेवून पंढरीत उभा आहे.
संत नरहरी महाराज म्हणतात, संतांची संगत धरून त्यांना मनोभावे शरण जाऊन त्यांच्या चरणी मनोभाव अलिंगन देत आहे.
32. सत्य जोतिर्लिंग बारा ।
सत्य जोतिर्लिंग बारा । प्रातःकाळीं स्मरण करा ।
कोटि कुळें उध्दारा । भव तरा बापहो ।। 1।।
वाराणशी विश्वनाथ । मोक्षदाता तो समर्थ ।
पुरवील अंतरीचे आर्त सोमनाथ । सोरटी ।। 2।।
ओंकार ममलेश्वर । वेतबंध रामेश्वर ।
भीमा उगमीं भीमाशंकर । धृष्णेश्वर बेराळीं ।। 3।।
नागनाथ अमृतोदकीं । विश्वजन केलें सुखी ।
परळी वैजनाथ सुखी । सुकृत साचें जन्माचें ।। 4।।
त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवील अंतरीचें काज ।
त्याही तेजामाजीं तेज । महाकाळ उज्जनी ।। 5।।
दुजे कैलास भुवन । श्रीशैल्य मल्लकार्जून ।
वाचे स्मरतां धन्य धन्य । अनुपम्य क्षेत्र तें ।। 6।।
बद्रिकेदार उत्तरें । ज्याचें स्मरणें भव हा तरे ।
ध्यान धरितां वृत्ति नुरे । निज निÜचळ दासाची ।। 7।।
नरहरी म्हणे जन्मा यावे । शुध्द सत्य प्रेम भावें ।
वाचे हरी गुण गावें । मालो लपे सर्वदा ।। 8।।
संत नरहरी महाराजांनी आठ चरणाच्या अभंगातून बारा ज्योतिर्लिंगाचे वर्णन केलेले आहे. आपण या सर्वांना मनोभावे शरण जावे असे प्रतिपादन करतात.
ज्योतिर्लिंगे बारा असून सकाळी त्यांचे मनोभावे स्मरण केल्यास आपल्या कोटी कुळांचा उद्धार होऊन संसार सागर पार केल्या जातो असे महाराज सांगतात. वाराणसीमधील विश्वनाथ हे मोक्ष देण्यास समर्थ असून सोरटी, सोमनाथ हे मनातील इच्छा पूर्ण करतात. ओंकारेश्वर, रामेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, नागनाथ अमृतोदकी अनेकांना सुखी केलेले आहे.
परळी वैजनाथ, त्रंबकेश्वर, महाकाल, उज्जैन, श्री शैल्य मल्लिकार्जुन, केदारनाथ यांचे चिंतन करावे. या सर्व बारा ज्योतिर्लिंगाचे मनोभावे स्मरण करावे. याद्वारे आपला संसार सहज पार केल्या जातो. म्हणून आपल्या मनामध्ये त्याचे ध्यान करावे, स्मरण करावे. भगवान शंकराचे हे बारा स्थाने संपूर्ण भारतभर स्थित असून भाविक भक्त या सर्वांचे मनोभावे भेट देऊन दर्शन घेत असल्याचे दिसून येते.
संत नरहरी महाराज म्हणतात, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या मुखातून त्या ईश्वराचे गुणगान करावे. प्रेम भक्तिभावे ईश्वराला शरण जावे ज्याद्वारे आपला संसार सुखाचा व आनंदाचा होईल.
33. सिक्का जयाचा आहे थोर ।
सिक्का जयाचा आहे थोर । हातीं पताकांचा भार ।। 1।।
भजन होय स्थळोस्थळीं । अवघी संत हे मंडळी ।। 2।।
वैकुंठीची खूण । रणखांब आहे जाण ।। 3।।
खांबासी भेटती जन । शिळेवरी लोळे जाण ।। 4।।
पापतापही जळाले । संतचरणीं नरहरी लोळे ।। 5।।
संत नरहरी महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून पांडुरंगाचे भाविकभक्त हे हाती खांद्यावर पताकांचा भार घेऊन अनेक ठिकाणी भजन करतात. यांचा पाठीराखा भगवंत असून त्यांना कशाचीही भीती नसून त्यांचा पाप व ताप नाश झाल्याचे प्रतिपादन करतात.
पांडुरंगाचे भाविकभक्त काया, वाचा व मनाने त्या समर्पित झाले असून हातात पताकांचे भार घेऊन भगवंत पांडुरंगाचे मनोभावे भजन करीत आहेत. विविध ठिकाणी साधुसंत पांडुरंगाचे भजन होत आहे. अशा भावी भक्तांच्या पाठीशी पांडुरंग सदैव उभा असून त्यांच्या सहकार्यास तो त्वरित जाऊन सहकार्य करीत असतो. पांडुरंगाच्या मंदिरात असणाÚया महाखांबाची भेट भाविकभक्त व साधुसंत घेत असतात. भाविक भक्तांच्या पाठीशी भगवंत पांडुरंग असल्याने त्यांच्या आधिभौतिक आधिदैविक व आध्यात्मिक अशा तिन्ही तापांचा नाश होतो त्या तापापासून होणारे दुःखांचा सुद्धा नायनाट होऊन जातो.
संत नरहरी महाराज म्हणतात, संतांच्या चरणी मनोभावे शरण गेल्यामुळे तिन्ही ताप नाहीसे होतात. तसेच अनेक पापांचा सुद्धा नाश होतो व आपला उध्दार होतो.
34. सूर्य असे गगनीं ।
सूर्य असे गगनीं । परी दिसतो जीवनीं ।। 1।।
मेघ असतो अंबरीं । पाणी पडे भूमीवरी ।। 2।।
आकाशीं चंद्र तारांगण । बिंब दिसे पाण्यांतून ।। 3।।
बिंब पाहतां दर्पणीं । बिंब दिसे त्यांतुनी ।। 4।।
आत्मा अनुभवीं पाहतां । देव दिसे हो तŸवतां ।। 5।।
गुरु कृपा होय पूर्ण । नरहरी लपट निशिदिन ।। 6।।
संत नरहरी महाराजांच्या सहा चरणाच्या अभंगातून व्यवहारातील अनेक उदाहरणाद्वारे ईश्वरी अस्तिŸव, आत्मानुभूती सद्गुरूच्या कृपेने होत असल्याचे प्रतिपादन करतात.
संत नरहरी महाराज हे मूळचे शिवपंथी/नाथपंथी व व्यवसायाने सोनार परंतु विठोबाची त्यांना आलेली प्रचिती/अनुभूतीमुळे ते विठ्ठल भक्त बनले. सूर्य आकाशात तेजस्वीपणे व समर्थपणे झळकतो. तो स्वयंप्रकाशी आहे. संपूर्ण विश्वाला प्रकाश व ऊर्जा देतो. माणसाच्या अंतरंगात असणारी चैतन्यशक्ती हीसुद्धा सूर्याप्रमाणे तेजस्वी सामर्थ्यशाली व ऊर्जेचा स्त्रोत ठरत असते व माणूस कर्तृत्ववान बनतो. आकाशात ढग असतात, परंतु त्याचे पाण्यात रूपांतर होऊन पृथ्वीवर पडतात. मेघ/ढग आपले मूळ स्वरूप न विसरता पृथ्वीवरून वाफेच्या रुपाने जरी आकाशात गेले. तरीही पाण्याच्या रूपाने परत धरतीशी नाते कायम ठेवतात. आकाशातील चंद्र-तारे त्यांचे प्रतिबिंब पाण्यात दिसून येते. आपण आकाश आरशात बघितले असता आपले प्रतिबिंब दिसून येते तसेच या विश्वातील चराचरात चैतन्य शक्ती अणुरेणूत समाविष्ट असली तरी ती आपल्या अंतःकरणात प्रतिबिंबित झालेली असते, या आत्मानुभूतीनेच आपणांस ईश्वरी अस्तित्व कळते व ईश्वराचे दर्शन होते.
संत नरहरी महाराज म्हणतात, सद्गुरूंची आपल्यावर कृपादृष्टी झाल्यानंतर या चैतन्यशक्ती व ईश्वरी दर्शन त्वरित होते. अशा सद्गुरुच्या चरणी मनोभावे रात्रंदिवस शरण जात आहेत.(Abhangavani of Sant Narahari Maharaj)