आपल्या सुमधुर आवाजानं रसिकांच्या मनाला मोहिनी घालणारे प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. Pankaj Udhas Death ते ७२ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला. त्यांच्या गाण्यांच्या मैफिली आणि अल्बम्समुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. आजही त्यांनी गायलेल्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. त्या गाण्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं होतं.
संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी पंकज उधास यांना वर्ष २००६ मध्ये पद्मश्री या देशातल्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. गायन कारकिर्दीला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे पंकज उधास यांना ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२०’ या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. और आहिस्ता कीजिए बातें,ना कजरे की धार, चांदी जैसा रंग है तेरा,आज फिर तुम पर प्यार आया है या त्यांच्या लोकप्रिय गाण्यांतून रसिकांच्या मनात त्यांच्या स्मृती कायम जागृत राहतील. त्यांच्या निधनानं चित्रपट आणि संगीत क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.