आता जन्माला येणारे प्रत्येक बाळ बोलणार आणि ऐकणारही… यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. होय. हे अगदी खरे आहे. अत्याधुनिक वैद्यकीय जगताने जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळातील श्रवण आणि वाणी दोषाचे निदान करण्यासाठी ओएई (ऑटो ऑकस्टिक इमिशन) व एबीआर (ऑडिटरी ब्रेनस्टेम रिस्पॉन्स) या प्रगत यंत्रणा विकसित केल्या आहेत. याद्वारे जन्मानंतर बाळाला बोलता व ऐकता येणार आहे. राज्यात सर्वप्रथम ही सुविधा कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे. Every baby will speak and listen as soon as it is born. (#Auto acoustic emission)
आपलं बाळ कसं असेल हे जाणून घेण्याची उत्कट भावना प्रत्येक आई-वडिलांची असते. गर्भात त्याची वाढ योग्य व्हावी, जन्माला येतानाच ते सुदृढ असावे यासाठी नऊ महिने ती माऊली काळजी घेत असते. मात्र अनेकदा काही कमतरतांमुळे व्यंग असलेले बाळ जन्माला येते. पण आता असा काही संभाव्य दोष असेल तर बाळ जन्माला येण्याआधीच दाखवणारे आणि त्यावर उपचाराची संधी देणारे वैद्यकीय तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. त्यासाठी सीपीआर येथे ओएई व एबीआर अशी दोन उपकरणे बालरुग्णांच्या सेवेत येणार आहेत. सीपीआरमध्ये प्रसूती झाल्यानंतर त्वरित त्या बाळाची श्रवण व वाणी क्षमता ओएई व एबीआर या उपकरणांवर तपासून पुढील उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे जन्मत:च बाळाला हमखास ऐकू येण्याबरोबरच ते पुढे बोलणारही आहे. व्यंग दोष असेल तर ते बाळ जन्माला येण्याआधीच दाखवणारे व त्यावर उपचाराची संधी देणारे वैद्यकीय तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे.
वाणी डीफ चिल्ड्रन्स फाऊंडेशन बंगळूरच्या राष्ट्रीय स्तरावरील या संस्थेचा शासनासोबत झालेल्या सामंजस्य करारातून हा उपक्रम सुरू होणार आहे. या प्रयोगशील उपक्रमासाठी लागणारे आर्थिक सहाय्य, उपकरणे, वैद्यकीय सुविधा याची जबाबदारी वाणी डीफ चिल्ड्रन्स फाऊंडेशनने स्वीकारली आहे. सध्या लग्नाचे वाढते वय तसेच बदलती जीवनशैली यामुळे अनेक महिला वयाच्या तिशीनंतर मातृत्वाचा विचार करतात. याचा परिणाम गर्भधारणेतील अडथळे तसेच गर्भातील अर्भकाच्या वाढीवर होतो. बरेचदा प्रसूतिपूर्व चाचण्यांमध्ये बाळामधील दोष कळत नाहीत. त्यामुळे जन्मानंतर उपचार करणे कठीण होते. कानावर शब्द पडले नाही तर मूकबधिर
होण्याचा धोका असतो. हे या नव्या तंत्रज्ञानाने टाळता येणार आहे. जन्मानंतर बाळावर उपचार करणे सोपे होणार आहे.
अशी होणार एबीआर व ओएई चाचणी
एबीआर चाचणीचा वापर नवजात शिशू आणि मुलांची श्रवणशक्ती शोधण्यासाठी केला जातो. यात बाळाच्या मेंदूचा आवाजाचा प्रतिसाद तपासला जातो. कपाळावर व कानाच्या लोबवर किंवा मास्टॉईड हाडावर लहन इलेक्ट्रोड (मेंदूच्या हालचाली मोजणारे सेन्सर) लावले जातात. कानांवर इअरफोन लावून तपासणी केली जाते. बाळ झोपले की, इअरफोनमधून आवाज ऐकू येईल. त्याच्या मेंदूचा या आवाजाला होणारा प्रतिसाद इलेक्ट्रोडद्वारे रेकॉर्ड आणि संगणकावर देखील रेकॉर्ड केला जाणार आहे. ऑडिओलॉजिस्ट चाचणी करून बालरोग तज्ज्ञांना माहिती देणार आहे. ऑटो ऑकस्टिक इमिशन म्हणजे कानाच्या आतील भागातून बाहेर पडणारा आवाज. अंतर्कर्ण व्यवस्थित काम करत नसेल तर या ध्वनी लहरी नष्ट होतात. त्यामुळे अंतर्कर्णाचे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही हे तपासणीसाठी ओईएचा उपयोग केला जातो. जन्माला येणाऱ्या बालकाची ही तपासणी केल्यास कर्णदोषांचे निदान होऊन पुढील उपचार सुरू करणे अधिक सोयीचे होते.
बाळाची त्वरित चाचणी केल्यास दोषमुक्त
• बालकांमधील श्रवण समस्यांचे निदान जन्मापासून २४ ते ३६ महिन्यांपर्यंत झाले नाही, तर श्रवण यंत्र, कोक्लियर इम्प्लांट, स्पीच थेरपी याचा सुद्धा उपयोग होत नाही. त्यामुळे बालकाची सहाव्या महिन्यापर्यंत श्रवणाच्या दोषांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अन्यथा संवाद, शिक्षण, वर्तन, मानसिकता यासह जीवनावर विपरीत परिणाम होतो. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी २५ हजारांहून अधिक कर्णबधिर बालके जन्मतात. त्यातील ३० टक्के बालकांना बहिरेपणा येतो. आता सीपीआरमध्ये श्रवण व वाणी यावर उपचार होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
