टीआरएआयचे आदेश प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असणार सुविधा
मुंबई : प्रत्येक फोनधारकाला कोणाचा फोन आला, याची माहिती समजणे आवश्यक आहे. एखाद्याचा नंबर मोबाईलमध्ये नसला तरी त्याची माहिती समजली पाहिजे, अशी सुविधा प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सुरू करावी, असा आदेश टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (टीआरएआय) दिला आहे.
कॉलिंग नेम प्रेसेंटेशन (सीएनपीए) अर्थात फोन करणाऱ्याचे नाव दिसेल अशी सुविधा द्यावी, अशी सूचना मोबाईल कंपन्यांना दिली आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक फोनमध्ये ही सुविधा असलीच पाहिजे, अशी नोटीस टीआरआयने काली आहे. नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांनंतर याची अंमलबजावणी होईल, असेही नोटिशीत म्हटले आहे.
टेलिफोन नियामक असलेल्या टीआरएआयकडे २०२२ मध्येच हा विषय चर्चेसाठी आला होता. त्यानुसार प्रत्येक मोबाईलधारकाला आपल्याला कोणी फोन केला, हे समजले पाहिजे, असे ठरविण्यात आले. या सुविधेचा कोणी गैरफायदा घेणार नसल्याचे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (डॉट) विभागाने याबाबतची मार्गदर्शक सूचना निश्चित करावी. व्यावसायिक क्रमांक असल्यास त्याबाबतची नोंदणी प्रक्रिया कशी असावी, नावाचा प्राधान्यक्रम आणि कागदपत्रे ठरवावीत, अशी सूचना टीआरएआयने केली आहे. या सुविधेचा गैरवापर होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असेही टीआरएआयने सांगितले. दळणवळणमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव, नंबर सेव्ह नसला तरी समजलेच पाहिजे. अगदी व्हॉईसकॉल, व्हॉट्सअॅप कॉल, फेसटाईम कॉल अथवा इतर ओव्हर द टॉप (ओटीटी) माध्यमातून कॉल लावल्यासही नाव समजणे आवश्यक आहे. टीआरएआयचे अध्यक्ष पी. डी. वाघेला म्हणाले की, इंडियन मोबाईल काँग्रेसच्या २०२२ सालच्या बैठकीत याबाबतचा पेपर चर्चेसाठी आला होता. त्या वेळेसच प्रत्येक मोबाईल फोनमध्ये कॉलर आयडी असावा, असे सूचित करण्यात आले होते. मात्र, अजून ओटीटी सर्व्हिसबाबत असा निर्णय घेण्यात आलेला नाही.
टेलिमार्केटिंग अथवा बिझनेसच्या नावाने नंबर नोंदणीकृत असल्यास त्याची माहितीही समजणार आहे. कोणत्या कंपनीमार्फत फोन केला जात आहे, याची माहिती त्यामुळे उपलब्ध होईल. फोनची नोंदणी करताना नावाचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा अधिकार व्यावसायिकांना दिला आहे.