पुढील काळात पावसाळा सुरू होणार आहे. हा काळ कीटकजन्य रोगांच्या प्रसारास अनुकूल असून मुख्यतः याच काळात कीटकजन्य आजार जसे हिवताप, डेंग्यूताप व चिकुनगुन्या ताप इत्यादी या आजारांचा प्रसार वाढतो. या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जनतेमध्ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी जून मध्ये हिवताप प्रतिरोध महिना जिल्हा हिवताप अधिकारी मार्फत विविध उपक्रमाव्दारे गांव पातळीपर्यंत राबविण्यात येतो.

“सर्व नागरिकांनी वैयक्तिक व परिसर स्वच्छता ठेवावी जेणे करून डासोत्पत्ती स्थाने निर्माण होणार नाहीत. त्यामुळे साहजिकच डासांची संख्या देखील वाढणार नाही त्यामुळे त्यांच्या द्वारे पसरणारे रोग जसे हिवताप डेंग्यू चिकणगुण्या इ. होणारच नाहीत तसेच घरातील अडगळीच्या वस्तू देखील नष्ट कराव्यात. आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा झोपताना जास्तीत जास्त मचरदानी चा वापर करावा इ. उपाययोजना केल्यास निश्चितच किटकजन्य रोगांना आळा घालता येईल. ‘
जगभरात दरवर्षी सुमारे ४ लाख लोकांचा मृत्यू हिवताप या डासजन्य आजारामुळे होतो. हिवतापने मरण पावणार्यांमध्ये आफ्रिका खंडातील गरीब देशांतील लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. आफ्रिकन देशांतून साधारणपणे दर मिनिटाला एका लहान मुलावर हिवतापमुळे जीव गमावण्याची वेळ येते. यावरून या आजाराचे गांभीर्य लक्षात येते. जगातील एकूण हिवताप मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू आफ्रिकेतील ६ देशांमध्ये होतात. एक तृतीयांश मृत्यू एकट्या नायजेरियात होतात.
खर तर जीवन जगतांना या मच्छरांमुळे सगळेच माणसे हैराण असतात. माणसाला मच्छराने चावले तर हिवताप, डेंगू सारखे आजार होऊन माणसाचा जीवही जावू शकतो. मच्छर हा एक घातक कीटक आहे. मच्छर हे जगातील सर्वच भागात आढळतात. मच्छर हे विविध रोगांच्या जीवाणूंचा प्रसार करतात. मच्छर हे लहान, सडपातळ व तांबट असुन करड्या काळ्या रंगाचे असतात. हल्लीच्या काळात जाड मच्छर पण आपल्याला पहावयास मिळतात. त्यांच्या सर्व अंगावर खवले असतात. संपूर्ण जगात मच्छरांचे सुमारे ११० वंश व उपवंश असून जवळ-जवळ २५०० जाती आहेत. मच्छर हे चावणारे असल्यामुळे अत्यंत उपद्रवी कीटक आहेत. २० ऑगस्ट १८९७ रोजी हिवतापाच्या जीवाणूंचा शोध सर रोनाल्ड रॉस यांनी लावला. यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देखील दिले गेले.
दरवर्षी निसर्गातील ऋतूत बदल घडत असतात. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी माणसाने काही उपाययोजना करायला हव्यात. खर तर पाऊस पडतो आणि जिकडे-तिकडे पाउसाने डबके साचतात. या पाण्याच्या डबक्यामुळे मच्छरांची संख्या वाढते व मच्छरांची संख्या वाढल्याने हिवताप होण्याची शक्यता देखील वाढते. हिवतापाचा प्रसार करणार मच्छरांची वाढ साठलेल्या संथ व स्वच्छ पाण्यामध्ये होते. अँनाफेलीस मच्छरांची मादी संथ पाण्यावर अंडी घालते. अंड्यांपासून अळी अवस्था ते पूर्ण अवस्तेतील मच्छर निर्मितीसाठी साधारणतः १० ते १४ दिवस लागतात. मच्छरांच्या उत्त्पत्तीची स्थाने पहिली असता; साठलेले पाऊसाचे पाणी, डबके, नदी, नाले, तलाव व कालवे यांचा काठ, वापरत नसलेल्या विहारी अथवा हौद, कारंजे, पाणथळ जागा, नदी कोंडाळे, कुम्प नलिका सभोवती साठलेले पाणी, पाण्याच्या टाक्या, आड, रांजण, कुलर, फुटके डब्बे, माठ, बाटल्या, टायर, इत्यादी मध्ये साठलेले पाणी हे मच्छरांच्या उत्पत्तीचे प्रमुख स्थान आहे.
खड्डे बुजवा, पाणी वाहते करा, परिसर स्वच्छ ठेवा हिवताप हा तीव्र स्वरूपाचा आजार आहे. आजारात रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. हा येणारा ताप दिवसा आड किंवा दोन दिवसा आड येतो. ‘फॅल्सीफेरम हिवताप’ या हिवताप प्रकारात वेळेवर औषध उपचार न घेतल्यास मेंदूवर परिणाम होतो. या मेंदूच्या हिवातापामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. हिवताप या आजारात सर्व अंग दुखते, मळमळ होते, डोके दुखते, पांघरूण घ्यावासे वाटते, त्यानंतर घाम येऊन ताप कमी होतो तसेच रुग्णाला थकवा येतो. कोणताही ताप असू शकतो हिवताप
खर तर ताप आला असेल व थंडी वाजून हूडहूड भरत असेल तरी हिवातापाची तपासणी करणे फार गरजेचे आहे. लहान मुले व गरोदर स्त्रिया यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने हिवताप प्राण घातकही ठरू शकतो.
हिवताप हा अतिशुक्ष्म अशा एकपेशीय परोपजीवी जंतूमुळे होतो. १) प्लास्मोडियम व्हायव्हेक्स २) प्लास्मोडियम फेल्सीफेरम.
प्लास्मोडियम फेल्सीफेरम या प्रकारात हिवताप तीव्र स्वरूपाचा असू शकतो. त्वरित व योग्य ते उपचार न मिळाल्यास हिवतापामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हिवताप रोगजंतूवाहक मच्छर निरोगी व्यक्तीस चावला तर हिवतापाचे जंतू लाळे बरोबर निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. आठ ते दहा दिवसांत हिवतापाचे जंतू माणसाच्या शरीरात वाढतात व रक्तातील तांबड्या पेशी फुटतात. त्यावेळी थंडी वाजून ताप येतो. हिवताप विरोधी अपुरा उपचार घेतल्यास प्रतिकारशक्ती निर्माण होऊन अशा व्यक्ती हिवताप रोग जंतूवाहक बनून रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. ग्रामीण भागात हिवतापाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. कारण ग्रामीण भागातील लोक बैल, गाय, म्हैस, तसेच इतर पाळीव प्राणी पाळतात. पाऊस पडल्यावर जनावरांच्या खुरांमुळे जमिनीवर त्यांच्या पायाचे ठसे उमटत. या पायांच्या ठस्यांमध्ये पाणी साचते. या साचलेल्या पाण्यात मच्छरांच्या अळ्यांची उत्पत्ती होते. त्यामुळे ग्रामीण भागात मच्छरांचे प्रमाण वाढते व या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात हिवताप दुषित रुग्ण आढळतात.
प्रत्येक तापाचा रुग्ण हिवतापाचा असतोच असे नाही. पण त्यासाठी रक्त तपासणी अनिवार्य असते. ताप येताच गावातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, हिवताप औषध वाटप केंद्र अथवा हिवताप कार्यालयात स्वतः जाऊन आरोग्य सेवकांच्या माध्यमाने रक्त नमुना तपासणी करून हिवताप विरोधी गृहीत औषधोपचार घ्यावा. हिवताप विरोधी औषधोपचार उपाशी पोटी देऊ नये. औषधांची वयोमानाप्रमाणे पुरेशी मात्रा सक्षम खावी. अन्यथा औषधाचा योग्य तसा उपयोग होणार नाही. घेतलेला रक्त नमुना हिवताप जंतू दुषित आढळून आल्यास समूळ उपचार योग्य त्या प्रमाणात घेतलाच पाहिजे.
भारतात फेल्सीफेरम हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत ३० टक्के इतके आहे. जगातील १०९ देशांमध्ये हिवताप नियमितपणे आढळून येते. छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांना हिवतापग्रस्त राज्य म्हणता येईल. हिवताप हा एक ऋतू निगडीत आजार असून भारतात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान त्याचे प्रमाण सर्वाधिक असते. १ जून ते ३० जून हिवताप प्रतिरोध महिन्यात
हिवताप या आजारापासून दूर राहण्यासाठी मच्छरांची उत्पती थांबवावी लागेल. खर तर गप्पी मासे हे मच्छरांच्या अळ्या खातात. आपल्या परिसरातील विहीर, तलाव, हौद, डबके यामध्ये गप्पी मासे सोडून मच्छरांची संख्या कमी करावी. हिवताप या आजाराने कोणाचा ही देशात मृत्यु होऊ नये एव्हडीच अपेक्षा !