सीएए कायद्यावरून मुस्लिमांना भडकविण्याचे विरोधकांचे काम अमित शाह:
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : सीए ए अंतर्गत १८८ पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल केले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी देताना सीएए च्या मुददयावरून मुस्लिमांना भडकावले गेल्याचे ते म्हणाले. अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, ” फाळणी झाली तेव्हा बांगलादेशात २७ टक्के हिंदू होते, मात्र, आज केवळ ९ टक्के शिल्लक आहेत. एवढे हिंदू शेजारील देशातून कुठे गेले? आम्ही २०१९ मध्ये सीएए घेऊन आलो. सीएएमुळे कोट्यवधी हिंदू, जैन आणि शीख समाजाच्या लोकांना नागरिकत्व मिळेल.”

अमित शाह म्हणाले की, सीएए संदर्भात मुस्लिमांना भडकावण्यात आले. सीएए कायदा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. काही राज्य सरकारे आणि इंडिया आणि काँग्रेस सीएएबाबत लोकांची व निर्वासितांची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे स्वातंत्र्यानंतर शेजारील देशांतून आलेल्या छळ झालेल्या हिंदू, बौद्ध आणि शीखांना न्याय मिळाला नाही. आश्वासन देऊनही या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळाले नव्हते. अशा कोट्यवधी लोकांना नरेंद्र मोदींनी न्याय दिला आहे. “
“मी माझ्या सर्व निर्वासित बांधवांना आवाहन करतो की, आपण कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता नागरिकत्वासाठी अर्ज करा. आपल्यासोबत काहीही चुकीचे होणार नाही. यामध्ये कोणत्याही फौजदारी खटल्याची तरतूद नाही, तुमचे घर, तुमची नोकरी, सर्व काही अबाधित राहील. विरोधक तुमची दिशाभूल करत आहेत, ” असेही शाह म्हणाले. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान फळणीच्या जखमांवर फुंकर घालत पाकिस्तानातून आलेल्या ५४ सिंधी हिंदूंनी नुकताच भारताच्या कुशीत आश्रय घेतला आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. उल्हासनगरातील सिंधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात या नव भारतीयांनी कृतज्ञतेने आपल्या भावना व्यक्त केला. “आता आम्ही आणि आमचा धर्म भारत मातेच्या कुशीत सुरक्षित आहोत,” असे उद्गार उल्हासनगरात वास्तव्यास आलेल्या सिंधी बांधवांनी काढले आहेत.