वाचन संस्कृती जोपासण्यासाठी युवा पिढीमध्ये वाचनाचे बीज रुजले जावे, यासाठी डॉ. कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा होतो.
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीवरून वाचनाला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात येते. वाचनाचा प्रचार, प्रसार होण्यासाठी शाळा, कॉलेजातून विविध उपक्रम राबविले जातात. मित्र, कुटुंबातील सदस्य, कामगार वर्ग यांना पुस्तक भेट देणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल, वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश देऊन वाचन, संमेलन, व्याख्यान, भाषण, चर्चासत्र, सामूहिक वाचन, विविध स्पर्धा आदी उपक्रम राबवून आपण वाचन संस्कृती लोकांत रुजवली पाहिजे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी असून शिक्षक व मुलांमध्ये रमणे हा त्यांचा छंद नव्हे, तर उद्याचे नवं भारताचे स्वप्न शिक्षक आणि विद्यार्थी घडवेल हीच त्यांची धारणा होती. विद्यार्थी व शिक्षक म्हणून वाचन दिन महत्त्वाचा आहे. हा वाचन दिन खऱ्या अर्थाने प्रेरणादायी झाला पाहिजे.
ते साधेपणाने आयुष्य जगले. त्यांचे वैज्ञानिक व राष्ट्रपती म्हणून कार्य पाहिले तर ते उत्तुंग शिखरासारखे आहे. अलौकिक कार्यामुळे त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान लाभला. त्यांनी एकूण 24 प्रेरणादायी पुस्तके लिहिली असून, त्यातील बहुतांश पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लिहिली आहेत. त्यांनी ‘इंडिया 2020 हे पुस्तक लिहिले. संत तुकाराम महाराजांनी शब्दांचे महत्त्व विशद केले आहे. शब्द रत्ने आणि शस्त्र आहेत. वाचन किती महत्त्वाचे आहे हे जनलोका सांगताना ते म्हणतात,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।
शब्दाचीच शस्त्रे यत्न करू ॥
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्दे वाटु धन जन लोका ॥
ग्रंथ आणि पुस्तके खरे गुरू आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत तुकाराम, संत सावता महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत कबीर यांनी आपल्या संत वाणीतून जनाला संबोधन केले. महात्मा फुले यांनी शोषितांसाठी शिक्षणाचे दार उघडले. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, असे डॉ. आंबेडकरांनी निक्षूण सांगितले.
वाचन आणि राष्ट्राभिमान जणू नाहीसे झाले असे वाटत असताना अनेक महान विभुतींनी व उत्तम साहित्यिकांनी उत्तम साहित्य निर्माण केले. लोकसाहित्य, ग्रामीण, शहरी, दलित, कामगार साहित्याने प्रबोधन केले. हीच
साहित्य संपदा आताच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे. सध्या नव्या पिढीकडे वाचन कमी आणि मनोरंजन जास्त आहे. मात्र आजही वर्तमानपत्र वाचल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. अग्रलेख हा तर वृत्तपत्राचा आत्माच आहे.
त्याच्या वाचनाने अनेक व्याख्याते तयार झाले. एक पिढी वाचन आणि पाठांतर करून घडली तर दुसऱ्या पिढीने स्वातंत्र्य काळात अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमत तयार केले. स्वातंत्र्य चळवळीत वृत्तपत्रांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. म्हणून नव्या पिढीच्या हातात मोबाइलसोबतच वृत्तपत्रे आणि पुस्तके द्या म्हणजे ती शहाणी होतील.
हातातील मोबाइलमध्ये सोशल मीडिया, दृश्य स्वरूपातील चित्रणे, गाणी तसेच अभ्यासाची सूत्रेही आहेत. स्मार्ट झालेला हा फोन त्यात आलेल्या गेम्स् व सोशल मीडियाच्या नशेच्या व नैराश्याच्या गर्तेत अडकला. नवी पिढी वाचनापासून दूर गेली शिवाय खेळाच्या मैदानालाही दुरापास्त झाली. अनेकांनी नैराशाच्या व गेम्स् हरल्याच्या पराभूत भावनेतून जीवन यात्राच संपून टाकली आहे. मोबाइलमध्ये फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब आदी वापराने सोशल मीडिया प्रभावशाली झाला आहे. यातून अनेक सायबर गुन्हे निर्माण झाले.
सायबर गुन्हे माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत 2018 मध्ये राज्यात 3,713 गुन्हे घडले आहेत. त्यापैकी 1467 आरोपींना अटक करण्यात आली. खरे तर अनेकांनी याच स्मार्टफोनचा वापर करून न्याय्य कामे केली, तर काहींनी शैक्षणिक धडे घेतले. काय वाचावे, काय वाचू नये याचे धडे मात्र पालक आणि शिक्षकांकडून मिळत नसल्याने वाचन संस्काराचा ऱ्हास होत असल्याने मुलांचे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे वेळीच सावधान झाले पाहिजे.
जगाला नवनवे तंत्रज्ञान अवगत झाले. छपाई तंत्रही बदलले. काही तासांच्या आत ग्रंथ छपाई व बांधणी होऊ लागली. त्याही पलिकडे जाऊन संगणकीय युगात संगणकावर क्लिक करताच माहिती उपलब्ध होतेय. ई- वृत्तपत्र व ई-पुस्तक तर आहेच शिवाय कोणत्याही शब्दाचा अर्थ सापडतो. त्यामुळे वाचनालये रिकामी दिसू लागली आहेत. आता तर अनेक पुस्तके श्रवण स्वरूपात मिळतात. त्याचा परिणाम वाचन संस्कृतीवर दिसू लागला आहे. वाचन संस्कृती टिकवयाची असेल, तर बालवयातच तसे संस्कार घडवले पाहिजेत.
ऐतिहासिक, शौर्य, आत्मकथन, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी, पर्यावरण यावर विपुल लिखाण झाले आहेत. हे सारे साहित्य आयुष्याच्या वाटेवर भेटणारे गुरू आहेत. स्वामी विवेकानंद यांचे चरित्र वाचून अनेकांना सद्मार्ग सापडला. एक तरी ओवी रोज जगावी. ग्रंथ आणि पुस्तके ही प्रेरणा देणारी आहेत. जीवन समृद्ध करणारी आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ म्हणून युवा शक्ती पुढे पुस्तके ठेवा.
साहित्य पंरपरेचा ठेवा एका पिढीकडून पुढे जात राहिला पाहिजे, तरच नव नवी पिढी सशक्त होत जाईल. त्यांनी इतिहास वाचला तरच ते इतिहास घडवतील. हीच प्रेरणा राष्ट्राच्या एकात्मतेला बाधा येऊ देणार नाही. प्रत्येकात राष्ट्रभावना प्रेरित व्हावी हीच डॉ. कलाम यांची भावना होती. त्यांना मानवंदना म्हणून वाचन दिन साजरा करताना वाचन संस्कृती रुजवली जाईल यादृष्टीने प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी.
विठ्ठल वळसे पाटील