चुकीची आहारपद्धती आणि बैठ्या जीवनशैलीमुळे २७ ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढत आहे. भारतीय युवकांच्या मृत्यूला स्ट्रोक हे एक प्रमुख कारण ठरत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येतो आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो, तेव्हा येणारा स्ट्रोक तथा पक्षाघाताचा झटका दीर्घकालीन शारीरिक व मानसिक अपंगत्व निर्माण करतो. तरुणांमधील हे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यामुळे तरुणांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. धूम्रपान किंवा तंबाखू सेवनासारखे कोणत्याही स्वरूपातील निकोटीन हे आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करते. धूम्रपानामुळे रक्तातील चिकटपणा वाढल्याने गुठळ्या तयार होतात आणि पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते, असे इंडियन स्ट्रोक असोसिएशनचे अध्यक्ष यांनी सांगितले. कामाचा ताण, बैठी जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, याचबरोबर मेंदूच्या रक्तवाहिन्यांना दुखापत, मादक पदार्थांचे सेवन, हेदेखील स्ट्रोकशी संबंधित घटक आहेत.

प्रमुख लक्षणे
पक्षाघाताच्या प्रमुख लक्षणांमध्ये तोल जाणे, अचानक धुरकट दिसणे, एका बाजूचे तोंड वाकडे होणे, एक हात निष्क्रिय होणे, स्पष्ट बोलता न येणे आदींचा समावेश होत असतो.
स्ट्रोकला असे रोखता येते
पौष्टिक आहाराचे सेवन, दररोज किमान एक तास व्यायाम आणि वजन नियंत्रित राखण्यासाठी नियमित चालणे, सायकलिंग, जिमिंग, योगा आणि पोहणे यामुळे स्ट्रोकचा धोका टाळता येतो. धूम्रपान, मद्यपान आणि मादक पदार्थांचा वापर टाळणे, योगा आणि ध्यान करून तणावाची पातळी कमी करणे, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी वाढणे या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित वैद्यकीय तपासणी आणि फॉलो-अप स्ट्रोकची समस्या टाळण्यास मदत करू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.