कवी /लेखक सु.पुं.अढाऊकर, अकोला
समीक्षण /समीक्षक – विद्या बनाफर
अस्तित्व प्रकाशन येथून प्रकाशित झालेला काव्यसंग्रह ,’चूल’ हा सु .पुं. अढाऊकर यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे ,जो मला सस्नेह भेट मिळाला. मी तो एकाच बैठकीत वाचून काढला.

जेव्हा एखादे पुस्तक हातात घेतल्यावर शेवटपर्यंत वाचल्याशिवाय ठेवून द्यायला मन धजत नाही , अर्थातच तेव्हा त्या लेखकाची लेखणी विशेष ताकदीची असते ,दर्जा उंचीचा असतो हे वेगळे सांगायला नको. अकोला जिल्ह्यातीलच प्रसिद्ध गजलकार मंगेश गजभिये यांची सुंदर प्रस्तावना लाभलेला हा कवितासंग्रह आहे . अतिशय समर्पक आणि वर्हाडातील ग्रामीण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे असे आकर्षक मुखपृष्ठ आहे.यातील एक एक कविता म्हणजे वर्हाडातील आणि विदर्भातील ज्वारीच्या कणसामधील सोन्या, मोत्याचा दाणा असतो ना, तशी आहे असे वाटते .अस्सल वराडीचा गंध असलेला हा काव्यसंग्रह, त्याची अर्पण पत्रिका सुद्धा विशेष आणि खास आणि वर्हाडी ढंगाची असून लेखकाने आपल्या आजीच्या वऱ्हाडी देहाचे नि वऱ्हाडी मनाचे वर्णन करताना, उन्हाळ्यातही थंड राहणाऱ्या चुलीला गोंजारणारी, सैल मासातूनही तारुण्याचे दर्शन घडविणारी ,रोजचे कोसो अंतर तुडविणारी माऊली, पतीविना जगूनही कधीही लाचारी न पत्करणारी, ताठमानाची अशा उपमांनी अलंकृत करून वर्हाडी मातीचा व आजीचा बहुमानच केलेला आहे .
एकूण पंच्याण्णव कवितांचा हा विविध रंगी, विविध ढंगी पुष्पांचा गुच्छ वाचकाच्या पुढ्यात ठेवून साहित्याच्या साम्राज्यात त्यांनी चांगल्या साहित्याची मीलाची भर घालून ते समृद्ध केले आहे. मनोगतामध्ये कवी म्हणतात,
घरोठं, पांद ,तुळस, सरकी, वात, उंबरा असे कितीतरी शब्द त्यांच्याभोवती वेढा घालून बसले होते. त्यांना त्यांनी कवितेच्या चौकटीत बसविले .त्यांच्या कविता वाचून जाणवते की वर्हाडातील शेतकऱ्याची परिस्थिती पाहता अनेक सल त्यांच्या मनात टोचत होत्या ,त्यांनाही त्यांनी ‘चुल ‘या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली .आपल्या लेखणीचे खरे कर्तव्यच त्यांनी बजावले आहे असेच मी म्हणेन. पहिल्याच ‘बापलेक’ या कवितेत त्यांनी मांडलेली शेतकऱ्याची दैना आणि त्या शेतकऱ्याचा मुलगा,
घर दलिंदर ठाण म्हणून शहराकडे जायला निघतो तेव्हा याच पडक्या झोपडीवरही नितांत प्रेम करणारा शेतकरी बाप म्हणतो ,
आपल्या घरी वावर नको करू तू फिकर
नको शहराची ओढ सांगे फांदीचा हिवर .
शेतकऱ्याच्या पत्नीची दैन्यावस्था कवी ,
लुगड्याले साठ गाठी अंगी झंपर फाटले नदी नाले ओस झाले अआसू डोळ्यात दाटले
या ओळींमध्ये करतो .
गरीबाला भूक का लागते हे सांगताना कवी म्हणतो,
सांगू कसे भुकेला येऊ नकोस आता ती दडते माझ्या कुशीत गुंजारतो मी व्यथा
अशा कवितेमधून लेखकाच्या हळव्या कवी मनाची साक्ष पटते .
‘चुलीचा संदेश’ या कवितेमध्ये कवी मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातो .
चुल जवा पेटत होती घर माह्या हसत होतं
आता चूल पेटणं बंद घर मुक्यानं सोसत होतं.
शेतकऱ्याच्या वर्हाडातील माणसाच्या गरिबीचं चित्र मांडण्यासाठी साध्या पण ताकतीच्या शब्दांची सुंदर गुंफण करून कवी वाचकाच्या हृदयाला हात घालतो .भूक, आग ,आसू ,रडकी चूल, भाकर गीत, यातना, साडीचोळी, धावती भाकर अशा कितीतरी कवितांमधून कवीच्या संवेदनशील मनाचे ठिपके विखुरलेले दिसतात. जे वाचकाला खिळवून ठेवतात. आयुष्यभर धावूनही शेतकऱ्याला कधीच चांगले दिवस येत नाही, आशेवरच जगावं लागतं .
‘अशी छान पहाट’ ही रचना एक सकारात्मक परिस्थितीचे वर्णन करणारी रचना आहेत.अशा सकारात्मक अनेक सकारात्मक कविता सुद्धा यात आहेत. त्यात ग्रामीण भागातील निसर्ग ,सृष्टी सौंदर्य, वनराई, पशुपक्षी यांचे सुंदर वर्णन आहे. शेतकऱ्याच्या सुखदुःखाचा सोबती बळीराजा या कवितेत,
वावरचा माह्या वावराचा हाय बैल राजा
उतारावयात त्याले भेटे सजा
या शब्दात वर्णन करतो. एकूण शेती, माती ,बैल, आखर ,अंगण या सर्वांच्या भोवती फिरणारी कवीची कविता मराठी माणसाच्या मनाला तर भूरळ पाडतेच पण अख्या महाराष्ट्रातील वाचकांच्या समोर वऱ्हाडाचे चित्र उभे करण्याची ताकद ठेवते . हे या कविता संग्रहाचे वैशिष्ट्य आहे .
‘शापित कापूस ‘या कवितेत कवीने कापूस पेरणी पासून ,सीतादही चा सुद्धा उल्लेख केला आहे आणि खालील ओळी पहा,
तुरीच्या पोचट शेंगा त्याचं निजलेले मोती
अशा तरारल्या शेंगा जशी नैतरणी छाती .
या ओळी वाचल्यावर कवीच्या कल्पकतेची झेप किती उंच आहे हे लक्षात येते .’कापूस राजा’ या कवितेतही,
येथे झाले चार-पाच घरात कापूस मावेना
घरातली रे दवडी या तारी रीकामी राहेना .
अशा सकारात्मक ओळी व सकारात्मक कविता सुद्धा वाचकाला सुखावून जातात . एकूण संपूर्ण कविता वाचल्यावर कवीची सूक्ष्म निरीक्षणाची शक्ती तर जाणवतेच पण तो सुद्धा या कविता जगलेला असावा असे वाचकाला वाटल्याशिवाय राहत नाही. या कविता संग्रहाचे कवी तीस वर्षांपासून लिहीत असल्यामुळे ती प्रगल्भता त्यांच्या प्रत्येक कवितेत दिसून येते .वाचकांच्या अपेक्षा बऱ्यापैकी पूर्ण करणारा हा काव्यसंग्रह आहे असे मला वाटते. कवी सु.पुं.अढाऊकर यांचे सर्वच साहित्य हे व-हाडी बोलीतच आहेत. भूक कवितासंग्रह, भाकर कवितासंग्रह, धोंडी धोंडी पाणी दे दिर्घ कवितासंग्रह, व-हाडीच्या कथा ..कथासंग्रह, शियान कादंबरी , बंबईच्या गोष्टी कथासंग्रह, गाडगे बाबांच्या कवीता संपादित कवितासंग्रह इत्यादी विपूल साहित्य लेखन करणारे सु.पुं.अढाऊकर यांचे गाडगे बाबावरील व-हाडी अनुवाद लेखन झाडूवाले बाबा तसेच पूर्णाकाठच्या कथा हा कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. ब-याच नामवंत पुरस्काराचे ते धनी असून पंच्याहत्तर पेक्षा जास्त पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
कवितेमधील शब्द, सौंदर्य ,उपमा ,शब्दांची मांडणी ,कवीचे भविष्य उज्ज्वल असल्याचं सांगून जातात. व-हाडी बोलीला अर्पण केलेले त्याचे विचार व लेखनिला मी सलाम करते.