लहान मुलांसाठी बाजारात हल्ली वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेटस्, चघळण्याच्या गोळ्या मिळतात. गोड चवीमुळे मुलांना याचे आकर्षण असले तरी पालकांनी अधिक सजग होत, आपली मुले काय खात आहेत? हे पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आपण अनेकदा लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या व टॉफी देतो. टॉफी घशात अडकल्यामुळे चार वर्षीय मुलाचा अलीकडेच मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मुलांना चॉकलेट, जेवण देताना पालकांनी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी माहिती जाणून घेऊया.

डॉक्टरांच्या मते जेव्हा एखादी वस्तू घशात अडकते, तेव्हा त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. जीव गुदमरू लागतो. लहान मुले चॉकलेट, टॉफी खाताना हा प्रकार हमखास होतो. हार्ड कँडीमुळे सर्वांत जास्त गुदमरल्यासारखे होते. लहान मुलांच्या घशात कँडी अडकल्यास ही परिस्थिती शांतपणे हाताळली पाहिजे. तुम्ही सर्वप्रथम मुलाला बैंक स्लॅप केले पाहिजे. म्हणजे मुलाला थोडे खाली वाकवून पाठीवर पाच-सहा वेळेस हलके फटके मारावेत. त्यानंतरही कैंडी निघत नसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे.
जेवताना पालकांचे हवे लक्ष
■ मुलांना अन्न भरवताना किंवा जेवायला देताना काही गोष्टी नेहमी लक्षात घ्याव्यात. विशेष म्हणजे नेहमी वयानुसार आहार द्यायला हवा. डॉक्टरांच्या मते वेगवेगळ्या वयोगटातील मुलांच्या अन्नाच्या वेगवेगळ्या गरजा असतात.
■ बालकांना दाढ नसल्यामुळे, ते अन्न चावू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना फळे, भाज्या किंवा मिठाई दिली जाते. बालकांना अन्नाचे लहान तुकडे करून द्यावेत. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा आकार पाहणे नेहमीच महत्त्वाचे असते, जेणेकरून ते घशात अडकणार नाही. मुलांना जेवायला बसवा, बसवून जेवण भरवा तसेच जेवताना मुले जोरात हसणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
■ लहान मुलांच्या घशात काही अडकलं आणि तो पदार्थ दिसत असेल, तरच बोट घालून काढण्याचा प्रयत्न करावा.
बालक गुदमरल्याची अशी आहेत लक्षणे… ■ मूल घाबरलेले दिसणे. ■ धाप लागणे किंवा घरघर होणे. ■ जोरात खोकण्याचा प्रयत्न करणे. बोलणे, रडणे किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज करण्यात अडचण. ■ मुलांचा चेहरा निळा पडणे.