98 th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटक, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उशा तांबे, ज्यांची अध्यक्षपदी निवड झाली त्या डॉ. तारा भवाळकर, केंद्र सरकारचे आपले प्रतिनिधी श्री. प्रताप जाधव, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष श्री. राम शिंदे, संसदेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले संसदेचे सदस्य, अन्य संस्थांचे प्रतिनिधी आणि या संमेलनासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते सरहदचे प्रमुख संजय नहार, महामंडळाचे सगळे प्रतिनिधी, साहित्यिक आणि साहित्य रसिक बंधू-भगिनींनो.. #Sharad Pawar
आज मराठी सारस्वतांची दिंडी दिल्लीला आली, याचा मला मनापासून आनंद आहे. मराठी माणूस हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर आपल्या पराक्रमाचा झेंडा अटकेपार फडकवणारा आहे. तो दिल्लीमध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, इंदोरमध्ये दिसतो, ग्वाल्हेरमध्ये दिसतो, गुजरातमधल्या अनेक शहरांमधून दिसत असतो. नोकरी-कामाच्या निमित्ताने काही लोक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसतात. भीमथडीच्या तट्टांनी जसं यमुनेचं पाणी चाखलं, त्याप्रमाणे मराठी साहित्याचा अमृत अनुभव घेण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी यमुनेच्या तीरावर जमलो आहोत याचा मला मनापासून आनंद आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होतंय. विशेषतः या सारस्वतांच्या महामेळाव्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. आजचं साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या दृष्टीने आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमीवर संपन्न होतंय. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे साहित्यिक, रसिक या सगळ्यांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीने मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो.
१९५४ साली पहिल्यांदा दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालं. त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. ते संमेलन यशस्वी करण्यासाठी त्या काळातील महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगीळ यांचं फार मोठं योगदान होतं. त्यांचं स्मरण करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. जवाहरलाल नेहरू यांनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं, त्याचीच पुनरावृत्ती होताना ७० वर्षांनी या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतंय याचा मला आनंद आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्यासाठी मी गेलो, तेव्हा त्यांनी अक्षरशः एक मिनिट सुद्धा घालवला नाही. महाराष्ट्राचा हा सोहळा आहे, सारस्वतांचा हा सोहळा आहे, माझी उपस्थिती आहे आणि तुम्ही कामाला लागा.
आपल्याकडे चंद्रभागेच्या काठी आषाढी आणि कार्तिकेला जसे लाखो वारकरी भक्तीभावाने जमतात, त्याच पद्धतीने साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रामध्ये हजारो साहित्यप्रेमी दरवर्षी येत असतात. देशाच्या राजधानीत होणारं हे साहित्य संमेलन तुमच्या-माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. ३७ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा देणारे, मराठी विश्वकोशाकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. त्यांनी त्याच वेळेला ज्याचा उल्लेख मी केला ते काकासाहेब गाडगीळ हे स्वागत अध्यक्ष होते आणि ती जबाबदारी आज माझ्याकडे आली, याचा मला आनंद आहे.
बारामती म्हटल्यानंतर मोरोपंत यांचं स्मरण होतं. त्यांनी त्या ठिकाणी केकावली आणि आर्या हे लिहून साहित्यामध्ये एक मोठी भर टाकली. त्यांच्याबरोबरच अनेकांचा उल्लेख त्या ठिकाणी करता येईल. त्या भागात दिल्ली साहित्य संमेलन अलीकडच्या काळात झाली. सुदैवाने त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. मग ते नाशिक असो, घुमान असो, सासवड असो, चिपळूण असो, पिंपरी-चिंचवड असो, उदगीर असो अशा अनेक संमेलनांना माझी उपस्थिती होती. त्यामुळे काही अत्यंत जाणकार लेखकांशी आणि सारस्वतांशी सुसंवाद करण्याची संधी व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये मला मिळाली. त्याच्यामध्ये ग.दि.मा. असतील, पु. ल. असतील, ना. धों. महानोर असतील. अनेक साहित्यिकांशी ऋणानुबंध आणि गाठी जुळून आल्या. मला गुरुस्थानी असलेले यशवंतराव चव्हाण हे एक उत्तम साहित्यिक होते. या सर्वांच्या सहवासामुळे मी स्वतःसुद्धा लिहिता झालो. ‘लोक माझे सांगाती’ या रूपाने तुम्हा लोकांपुढे व्यक्त झालो.
मी सार्वजनिक जीवनातील ३० वर्षांपेक्षा अधिक काळ दिल्ली दरबारीमध्ये मराठी अस्मिता टिकवण्यासाठी जे जे काही करता येईल, ते करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न केला गेला. कदाचित म्हणूनच ‘स्वागताध्यक्षा’ची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली असावी. या संमेलनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे डॉ. तारा भवाळकर यांची निवड! याचा मला आनंद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून डॉ. तारा भवाळकर यांना मराठीजन ओळखतात. मला आठवतंय की, चिपळूणचं संमेलन होतं. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी माझ्या भाषणामध्ये एक खंत व्यक्त केली की, आतापर्यंत इतकी संमेलनं झाली. पण फक्त चारच महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. मात्र यावेळी एका महिला साहित्यिकाला अध्यक्ष पदाचा सन्मान मिळाला, याचा मला मनापासून आनंद आहे. मी डॉ. तारा भवाळकर यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या निवडीसाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला व महामंडळाला धन्यवाद देतो.
दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं एक नातं आहे. ११ व्या शतकामध्ये अनंगपाल तोमर यांनी दिल्लीची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय व सांस्कृतिक संबंध निर्माण झाले. १६६६ साली बादशाह औरंगझेबानं त्याचा एक वाढदिवस साजरा केला तो आग्र्याला. अन्यथा दिल्लीमध्ये केला असता तर शिवछत्रपतींच्या स्वाभिमानी साक्षात्कार इथेच घडला असता. पण त्या घटनेपासून प्रेरणा घेऊन मराठी शाहीने आपला झेंडा हा अटकेपार फडकवला. याचा मराठी भाषिकांना सार्थ अभिमान आहे.
देशाचे एक प्रधानमंत्री होते चौधरी चरणसिंह. ते मला भेटल्यानंतर नेहमी सांगायचे, तुम्ही लोकांनी एक गोष्ट काही ठीक केली नाही. मी विचारलं काय आम्ही ठीक केलं नाही? म्हटले मराठे आले, दिल्लीपर्यंत पोहोचले. दिल्ली जिंकली आणि दिल्लीवर ताबा कायमचा आपल्या हातात ठेवण्याऐवजी पानिपतला गेले. जाण्याची काही आवश्यकता नव्हती, वेगळा इतिहास घडला असता. पण झालं ते झालं. तो इतिहास हा आपण काही विसरू शकत नाही.
आज मराठी लेखणीनं साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलं आहे, त्याची नोंद देश पातळीवर सुद्धा घेतली गेली. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या सर्व मराठी लेखकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्याद्वारे मराठी भाषेची पताका ही देशभरात फडकत राहिली. विजय तेंडुलकर यांनी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता लेखन केलं. घाशीराम कोतवाल असो, सखाराम बायंडर असो अशा नाटकांमुळे काही वेळा त्यांना रोषाला सुद्धा सामोरं जावं लागलं. पण ते आपल्या भूमिकेपासून हटले नाहीत. नामदेव ढसाळ, कवी यशवंत मनोहर, नारायण सुर्वे यांच्यासारख्या कवींनी सर्वसामान्यांचा विचार हा सातत्याने मांडला. अण्णाभाऊ साठे यांनी गाव कुटुंबाचं, उपेक्षितांचं जगणं मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या साहित्याचा डंका रशियापर्यंत पोहोचला, याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे.
या साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनेक भगिनींनीसुद्धा फार मोठी भर घातली. ती नुसती संख्यात्मक नाही तर गुणात्मक सुद्धा आहे. महानुभाव पंथातील महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. सावित्रीबाई फुले नंतरच्या काळामध्ये शांता शेळके, इंदिरा संत, अरुणा ढेरे यांनी मराठी साहित्याला सशक्त करण्याचे काम करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्त्रियांना अधिकाधिक मिळाले तर माझी खात्री आहे की, ही परंपरा अधिक बलवान झाल्याशिवाय राहणार नाही.
सारस्वत साहित्य संमेलन म्हटल्यानंतर महाराष्ट्रात एका गोष्टीची चर्चा सुरू होते. राजकारण्यांचा इथे काय संबंध? त्या संबंधाचे लिखाण हे गेले काही दिवस चालतं. यंदा काय अजून झालेलं नाही, काय झालं मला माहित नाही. मी बारकाईने बघतोय पण हल्ली याच्यावर कोणी लिहिना! खरं म्हटलं तर राजकीय नेते आणि संमेलन यांचंही काही संबंध आहे. माझं स्वच्छ मत आहे की, राजकीय नेत्यांनी संमेलन मंचावर येता काम नये यासंबंधीचा वाद दरवर्षी कशाला करायचा? राजकारण आणि साहित्य यांच्यातील परस्पर प्रवाह हा दुतर्फा आहे.
बाळ गंगाधर टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण अशांची नावे घेता येतील. ज्यांनी या सगळ्या क्षेत्राला प्रतिष्ठा दिली. कलेला राजाश्रय लाभला तसंच राजांनीही साहित्य-कला जोपासली. बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज हे त्याचं बोलकं उदाहरण आहे. एकूणच राजकारण आणि साहित्याची फारकत होऊच शकत नाही ते परस्परांना पूरक होऊ शकतं.
महाराष्ट्रात साहित्य प्रांतातून राजकीय आखाड्यात उतरलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विरोधी पक्षातले प्रभावी नेते म्हणून आजही त्यांचा अभिमान आपल्याला आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर विधिमंडळात आले, भाष्य कविता लिहिणारे रामदास फुटाणे विधान परिषदेचे सभासद झाले. ‘उपरा’कार लक्ष्मण माने हेही आले पण त्यांची तक्रार विधिमंडळात कोणी केली नाही. ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची चर्चाच होऊ शकत नाही. त्यांनी लिहिलेले ‘गीतरामायण’ आजही मराठी माणसांच्या ओठांवर आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणी काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऐकू येत होतं ते गदिमांनी लिहिलेलं ‘गीत रामायण’..! त्यामुळे या वादावर एकदा पडदा पडेल, अशा प्रकारची अपेक्षा आपण या ठिकाणी करू इच्छितो.
वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. पूर्वी पुस्तकांसाठी ग्रंथालयांवर अवलंबून राहावं लागे. आज साधनं वाढली, आता वाचनाला अनेक पर्याय आलेत. दूरचित्रवाणी आली, मनोरंजनाच्या वाहिन्या आल्या, वृत्तवाहिन्या आल्या, स्मार्टफोन आले असे असले तरी पुस्तकं मोठ्या प्रमाणावर छापली जात आहेत. गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रांमध्ये किती टन पुस्तकं दिल्लीमध्ये आली? यासंबंधीचं सविस्तर वृत्त हे येतंय आणि हे याचं द्योतक आहे. पुस्तकं हल्ली छापली जातात आणि ती खपली जातात. गावोगावी ग्रंथ प्रदर्शने भरवली जातात. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पुस्तकाची पोहोच करून नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून कसं ठेवता येईल? याची काळजी घेण्याची गरज आहे.
काळ झपाट्याने बदलतोय. सध्या समाजातील एकात्मतेची त्यामुळे वीण उसवत चालल्याचं चित्र दिसतंय. समाज अतिशय कठीण आणि नाजूक स्थितीतून जातोय. त्याच्यामध्ये साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. महानुभाव पंथ असो, वारकरी परंपरा असो याचा भान ठेवून महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती रानडे, र. धो. कर्वे, आगरकर अशा सुधारकांच्या वाटेने समाजाला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
शेवटचा एकच मुद्दा मी मांडू इच्छितो, तो म्हणजे मराठी भाषेचं विशुद्धीकरण! काळाच्या ओघात भाषेवर वेगवेगळे संस्कार होतात. परंतु या प्रक्रियेत असे दिसून आले की, काही चांगल्या शब्दावर वाईट संस्कार होतात. उदा. बुद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानाने परिपूर्ण आणि जागृत असा होतो. पण त्याचा बुद्धु असा अपभ्रंश कुणी केला ते मला समजत नाही. पण बुद्धू म्हणजे अडाणी किंवा कमी बुद्धीचा असा अर्थ रूढ झाला याचं मला वाईट वाटतं. मराठी साहित्यात असे शब्द जे असतील ते बाजूला केले पाहिजेत, ते नामशेष व्हायला पाहिजेत.
प्रस्तुत साहित्य संमेलनात अनेक वैशिष्ट्यपूर्ण परिसंवाद, कवी संमेलन, परीसंवाद – चर्चा आयोजित केलेले आहेत. साहित्य रसिकांनी या साहित्य मेजवानीचा आस्वाद घ्यावा. त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उशा तांबे, पदाधिकारी, सरहद संस्थेचे संजय नहार आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी कष्ट घेतले. यमुना तीरी होणाऱ्या या सारस्वतांच्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी त्यांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. उपस्थित साहित्यिक, साहित्याचे अभ्यासक, रसिक या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. संमेलनाची शोभा वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि मान्यवरांचे मी अंत:करणापासून आभार मानतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!