वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा मानवी आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. आता ध्वनिप्रदूषणाबाबत एक नवीन माहिती समोर आली असून दर तीस वर्षांमध्ये गोंगाट्याचे प्रमाण दुप्पट होत असून त्याचा थेट परिणाम म्हणून हृदयविकार आणि स्ट्रोक या विकारांचा धोका जास्त वाढला आहे.
ड्युक युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल स्कूल लंडनमधील काही संशोधकांनी करोनाचा प्रभाव संपल्यानंतरच्या कालावधीमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या परिस्थितीवर संशोधन केले असता त्यांना ही गोष्ट लक्षात आली. करोनावर आता नियंत्रण मिळवले असल्याने सर्व व्यवहार सामान्य झाले आहेत. सामान्य नागरिकांच्या रोजच्या टीव्ही पाण्याच्या सवयीपासून इतर सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच होऊ लागल्या आहेत. त्याचाही परिणाम ध्वनिप्रदूषण वाढण्यावर झाला. गेल्या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये रुग्णवाहिका किंवा पोलिस यंत्रणांचे जे सायरन आहेत त्यांच्या आवाजामध्येही दुप्पट वाढ झाल्याचे अभ्यासात म्हणण्यात आले आहे. शांत वातावरण आणि शांत मानसिकता मानवी प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त असून अशा वातावरणामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात, तर गोंगाटयुक्त विरोधी वातावरणामध्ये हृदयविकार किंवा स्ट्रोकसारखे आजार जडण्याचा धोका सर्वाधिक असतो, असेही या संशोधनात सांगण्यात आले आहे. मेडिकल स्कूलमधील प्रोफेसर ईमके कस्टरे यांनी हे संशोधन केले असून सामान्य नागरिकांनी गोंगाटापासून दूर राहणेच पसंत करावे, असे त्यांनी म्हटले आहे.