मुंबई : दरवर्षी साधारणतः सव्वा लाख मुलांचे प्राण घेणाऱ्या टायफॉईड म्हणजेच तापावर भारत बायोटेकने तयार केलेली लस परिणामकारक ठरली आहे. भारत बायोटेकच्या ‘टाईपबार’ या लसीमुळे किमान चार ते साडेचार वर्षांपर्यंत ताप येणार नसल्याचे निष्कर्ष तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीतून काढण्यात आले. ही चाचणी आफ्रिकेतल्या मलावी या देशात पार पडली.
धोकादायक आजारांपैकी एक असलेल्या टायफॉईड हा साथजन्य आजार मानला जातो. २०१९ या एकाच वर्षात ९२ लाख ४० हजार जणांना टायफॉईड झाला. त्यापैकी १ लाख १० हजार जणांचा मृत्यू ओढवला. त्यातही दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिकेतल्या मुलांचा जास्त समावेश होता. त्यामुळे आफ्रिकेतल्या मलावी या देशात लसीची परिणामकारकता तपासण्यास आली. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०१८ दरम्यान मलावीत मुलांना पहिला ‘कॉनजुगेट टायफॉईड टॉक्साईड व्हॅक्सिन अर्थात ‘टाईपबार’ चा डोस देण्यात आला. त्यात ९ ते १२ वर्षांच्या मुलांचा समावेश होता. २८, १३० मुलांना २०१९ मध्ये शेवटचा म्हणजेच तिसरा डोस देण्यात आला. यातल्या १४,०६९ मुलांना ‘टाईपबार’ चा डोस देण्यात आला, तर १४,०६१ मुलांना लशीची संयमित मात्रा देण्यात आली.
मलावीत घेण्यात आलेल्या चाचणीचे निष्कर्ष नुकतेच हाती आले. त्यानुसार, लस घेतल्यानंतर किमान ४ वर्षे तरी मुलांना तापाने बाधले नाही. ९ महिन्यांच्या बालकापासून ते २ वर्षांच्या मुलांमध्ये ही लस ७०.६ टक्के परिणामकारकता दाखवणारी ठरली. २ ते ४ वर्षांच्या मुलांमध्ये तिची परिणामकारकता आणखीनच वाढली. ७९.६ टक्के परिणामकारकता २ ते ४ वर्षांच्या मुलांमध्ये दिसली. पाच ते वर्षाच्या मुलांमध्ये ही परिणाकारकता ७९.३ टक्के दाखवली गेली, असे ‘लॅन्सेट’ च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. लस घेतलेल्या मुलांपैकी टायफॉईडचा धोका एक हजारपैकी फक्त सहा जणांनाच होता. या लसीची एकत्रित परिणामकारकता वर्षागणिक बदलत जाते. त्यानुसार, लस घेतल्यानंतरच्या वर्षी परिणामकारकता ८३.४ टक्के दिसली. २ वर्षांनंतर ८०.१, तीन वर्षांनंतर ७७. १, तर चौथ्या वर्षी ७८.३ टक्के परिणामकारता लसीने दाखवली. जागतिक आरोग्य संघटनेने टायफॉईडवर दोन लसींची परिणामकारकता तपासण्यासाठी चाचण्यांना परवानगी दिली. भारत बायोटेकच्या टाईपबारसोबत बायोलॉजिकल ईस या कंपनीच्या ‘व्हीआय- सीआरएम-१९७ ‘ लसीचा समावेश यात आहे.
आजाराची कारणे
टायफॉईड सालोमोनेला टायफी या विषाणूमुळे होतो. हा ताप संसर्गजन्य असतो. मल-मुत्राद्वारे तो वेगाने पसरतो. स्वच्छेतेअभावी त्याचा फैलाव होत असतो. पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी टायफॉईडचा संसर्ग होताना दिसतो. लहान मुलांना त्याचा लवकर संसर्ग होतो. प्रतिकार शक्ती कमकुवत असल्याने लहान मुले लवकर बाधित होतात. मात्र, लहान मुलांमध्ये मोठ्या माणसांपेक्षा लक्षणे कमी दिसतात. याला कारण म्हणजे, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागलेली असते.