आटपाट नगर होतं. नगराचं नाव आंबेगाव. ह्या गावात एक परिस्थितीनं एक गरीब एक खटलं होतं. किसनरावले दोन पोरं अन् एक पोरगी होती. मोठ्या पोराचं नाव बबन त लायन्या पोराचं नाव सदाशिव अन् पोरीचं नाव सुलभा.
किसन अन् त्याची बायको दिसरात मेहनत करूनं खटल्याचा डोलारा तोलत होते. एका रोजी किसनची बायको सोय-याच्या लगनाले ऊमरावती शेहरात गेली अन् टरक खाली येवूनं मेली. पन् किसनानं हवल नाही खाल्ली. नेटानं लेकरायले वाळोलं. पोरं पोरगी मोठी झाली. सुलीचं जौळचं असलेलं शेनगावात काळेच्या घरी देल्ल. किसन म्हातारपनानं मेलं. आता आंबेगावात बबन्या अन् सदा हे दोघेजन घरात. बबन्या जरा साधा मानूस त सदा बबन्या परीस ऊन्नीसा. दोघही भाऊ पळनं थे काम करत. कोनाचे ढोरं चारं, खताचे पुंजाने टाक करत. दोघायचे लगनं झाले. एका चुलीच्या दोन चुली झाल्या. बबन्याले एक पोरगं झालं त सदाशीवले दोन पोरी झाल्या. बबन्या साधा असल्यानं बबन्याची बायको तीन साल नांदल्यावर तीले काय झालं कोनालेचं ठावूक नाही थे भैताळासारखी कराले लागली. ते दिसरात गावात भानामतीसारखी केस मोकय करत फिरत होती. लेकरं तिले गोटे मारत, मांग लागूनं पागल पागल म्हनूनसन्या लागत म्हनून तीले तीचे मायबाप घेऊनं गेले. आता घरात बबन्या अन् थ्याचं पोरंग सत्या दोघ ऊरले. बबन्या दिसरात मेहनत करत होता लोकायचे ढोरं चाराले नेत होता पन् पन् लोकं येळूबेळू करूनं बबन्याले पैसा कमीच दे. अळानी असल्यानं जेवळा पैसा देल्ला तेवळा घेवूनसन्या थो घरी ये. घरी आल्यावर लेकराचा अन् थ्याचा सैपाक करे पन् शेजीपाजीचे सगेसोयरे कोनी कुटका ना दे. ना पिलेटभर भाजी दे. कोनालेच बबन्याची कदर ना ये ना भावाले ना भावकीले. दिसमास लोटत होते. पोरंग पाच सालचं झालं. एका रोजी बबन्याले ताप भरला. तरी थो थंड्यापान्यानं आंघोय करूनं ढोरं चाराले ने. ताप मुरला. हयद्या झाला पंडू झाला अन् बबन्या झपीतच थंडा झाला अन् मेला. आता शेजीचा भाऊ.. भावकीतले लोकं… गावातले लोकं आले. घरात डब्यायनं सदानंद न हुसकवासक केलं. बबन्यानं कष्टातूनं नव हजार रूपये जमा केले होते. नदीवर किरयाकरम झालं. घरगूती दसव झालं. तेरवीचा नेम ठरला तारीक ठरली. बबन्याच्या ऊरलेल्या सात हजारावर आता साजरी तेरवी करू. भावकीतले अन् शेजारीपाजारीनं काय काय जेवनात ठेवावं ठरलं.
तेरवीचा दिस ऊगवला. सोय-यायचे पाय धुतले चंदन लावल. पिळ्यावर जेवाले बसले. पतरवाईवर वासाची अगरबत्ती लावली गेली. एक एक बाई वाहळत आली. वरन, भात, आलूवांग्याची लाल तांबळी रस्सेदार तेलाची भाजी, पोई, लिंबू, ठेसा, लुंजी अन् बुंदा. लोकं बंबाट पालकटा मांडूनं बसले.
घ्या म्हनूनसन्या एकानं अवाज लगावला अन् सारे घास घ्याले लागले. तसा गावातला शिकेल सवरेल धनगराचा पोरगा विद्यानंद हुलके पंगती जौळ ऊबा राहूनंसन्या जो-यानं अळ्ळावला. थांबा! बिल्लकूल एक घास खाल्ला तरी खबरदार… सायाचे हो जवा बबनराव तापीनं फनफनला तव्हा कोनी एक भाकर आनून देल्ली नाही… त्याच्या मेहताना कोनी पुरेपुर देल्ला नाही. बकरी हारोली म्हनुनसन्या ह्या पाटलानं आयुष्भर पंधरा जनावर चारूनं घेतले पन खळकू ना देल्ला अन् अज सायाचे थ्या बबनरावच्या तेरवीच्या पंगतीत वटे खोसूनं बसले. अधिकार नाही तुम्हाले एकही घास खाचा…चला ऊठा सायाचे हो….
लेखक – सु.पुं. अढाऊकर, अकोला, ९७६९२०२५९७