प्राचीन मराठी ग्रंथरचनेचा प्रारंभ महानुभाव वाङ्मयापासून झाला. लीळाचरित्र मराठीतील आद्य चरित्र ग्रंथ आहे. ही ग्रंथनिर्मिती झाली ती येथील स्थानिक बोलीभाषेत. यामुळे येथील समाज, संस्कृती, रीतीरीवाज परंपरा या ग्रंथात अभिव्यक्त झाले आहे. वर्हाडी बोलीचे प्राचीन स्वरूप अभ्यासन्यासाठी हे एकमेव असे ग्रंथ आहेत. यामध्ये लीळाचरित्र व गोविंदप्रभूचरित्र या दोन ग्रंथांची विशेष नोंद करता येते. म्हणून मराठी व वऱ्हाडी भाषा, साहित्याच्या दृष्टीकोणातून महानुभाव पंथाला विशेष महत्त्व आहे.
ह्या पंथाची स्थापना श्री चक्रधर स्वामी यांनी केली. पंथाच्या तत्त्वज्ञानावर नाथपंथ व जैनपंथाचा प्रभाव आहे. जीव, जगत व देवता यापासून पूर्णपणे स्वतंत्र असणारा एक नित्यमुक्त परमेश्वर आहे. परमेश्वर ‘जीव’ उद्धारासाठी अवतार घेतो. असे पाच अवतार महानुभाव पंथांनी मानले आहेत. श्रीकृष्णचक्रवती, श्रीचांगदेवराउळ, श्रीगुंडमराउळ, श्रीचक्रधरस्वामी ह्यां पाच अवताराला पंचकृष्ण’ म्हणतात. या पंचकृष्णामधील श्री चक्रधर स्वामींनी गुजरात (भडोच) येथून वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती केली. ते जेथे जेथे थांबले तेथील काही ठिकाणी मंदिराची, मठाची तर काही ठिकाणी आश्रमाची स्थापना झालेली आढळून येते.
गोविंदप्रभू हे रिद्धपूरला राहत होते. श्री चांगदेव राउळ म्हणजे श्री चक्रधर स्वामी द्वारावतीहून रिद्धपूरला आले होते – “ श्रीप्रभु द्वारावतीए बीजें केलें: संन्यासु स्वीकारीलाः मग रीधपुरा बीजें केलें: (एकांक, लीळा ३.)” तेव्हा रिद्धपूरजवळच्या पीवळतलौलीमध्ये श्रीचक्रधरस्वामींची श्रीगोविंदप्रभूंशी भेट होत असे. दाभविहिरीला असलेल्या दर्भेश्वराचे ठिकाणी मुक्काम करत. “ दोहीं पीवळतळौलियां मध्यें श्रीप्रभुभेटी होए: पाहरू दोनि कांटीये एकि तींळ बैसले असतिः मग श्रीप्रभु रीधपुरा बीजें करीतिः (एकांक लीळा २१)” रिद्धपूर हे महाराष्ट्रातील वर्हाडात आहे. येथे येताना ते अचलपूर, वडनेर, येळवण, बार्शी टाकळी, पातूर या मार्गे आले. अचलपूर, यळवण, आलेगाव, इत्यादी ठिकाणी प्रत्येक्ष भेटी देऊन माहिती संकलन, संशोधन करण्यात आले. यापैकी आलेगाव येथे मंदिर, मठ व आश्रम आढळले त्याविषयी.
आलेगाव हे अकोला शहरापासून ४५ किंमीवर आहे. आजूबाजूला पहाड आणि घनदाट जंगल असलेला हा भाग. श्री चक्रधर स्वामी भ्रमंती करीत असताना काही मोजक्याच ठिकाणी दोन वेळा तीन वेळा गेलेले आढळतात. त्यात आलेगाव ह्या गावात चक्रधर स्वामी तीन वेळा आले. पहिल्यावेळस आले तेव्हा एकटेच होते. गावाबाहेरील नदीच्या काठी असलेल्या मंदिरात मुक्कम केला होता. “ सर्वज्ञे म्हणीतलें : ” मग हैं तेथौनि निगालेः आलेगावीं पाणिपात्र जालेंः नर्दी आरोगण जालीः लिंगाचां देउळीं वसति जालीं:” (लीळा, १०८) बाईसाला प्रेमदान केल्यानंतर पुन्हा आलेगावला आले. तेव्हा त्यांच्यासोबत बाईसा इतर भक्त सोबत असल्यामुळे गावातील मंदिरात थांबले. (लीळा, १७७) रिद्धपपूरवरून परत येताना तिसर्या वेळेस आले. (लीळा २१३) या गावात मंदिर, मठ आणि आश्रमही आहे.
मठात सहा-सात गुरू केलेले, दिक्षा घेतलेले महंत असतात. यामधील एक मठापती असतो. एकप्रकारचे घरासारखे वातावरण असते. मात्र, येथील मठाची देखभाल गुंफाबाई नावाची बाई करतात. लाड लोकांच्या ताब्यात गावातील दोन्ही मंदिरे आहेत. मंदिराची देखभाल, पूजा तिन पिढ्यांपासून लाड कुटुंब करताना आढळतात. मल्हारराव होळकरांनी एका मंदिराचे बांधकाम केले. त्यांना अहिल्याबाई, हटकूबाई अशा दोन पत्न्या होत्या. यातील हटकुबाई यांनी महानुभाव पंथाचा गुरूउपदेश घेतलेला असल्यामुळे त्यांनी महानुभाव मंदिराचे बांधकाम केलेले आढळते.
आक्का पंजाबी आश्रम : आक्का पंजाबी या नावाने येथील आश्रम ओळखल्या जाते. आक्का पंजाबी ह्या आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी १९८२ साली येथे येऊन राहू लागल्या. तीन भाऊ तीन बहिणी अशा मोठ्या कुटुंबातील आक्का होत्या. त्यांच्या आईवडिलांच्या संस्कारामुळे त्यांनी महानुभाव पंथाची वाट धरली. त्यांच्या सोबत त्यांचे एक भाऊ, दोन बहिणी व नंतर आईवडील त्यांच्या सोबत येऊन राहिले. आलेगावला त्यांचा मुक्काम एकदोन महिन्यापुरता होता मात्र, येथील वाताराण राहण्याजोगे असल्यामुळे त्या येथेचे राहू लागल्या. त्यांच्या सोबत त्यांचे भाऊ श्री. आनंदमुनी पंजाबी ज्यांनी वयाच्या ३२ वर्षी दिक्षा घेतली होती ते होते. त्यांची इच्छा आयुष्यभर मंदिरातील झाडाखाली राहण्याची होती. मात्र, काही दिवसांनी भक्त परिवार वाढत गेल्यामुळे राहण्याची योग्य सोय व्हावी म्हणून त्यांच्या प्रयत्नातून एक एक्कर जमीन दान मिळाली. पुढे दोन एक्कर शेत विकत घेऊन त्यामध्ये बांधकाम करण्यात आले. आज ३०० महंतांचा मुक्काम आढळतो. यामध्ये लहान मुलांपासून ते म्हातारे स्त्रीपुरुष भक्त आहेत.
महानुभव पंथाची दिक्षा ही जशी कोणत्याही वयात आणि कोणालाही घेता येते तशी या आश्रमात कोणत्याही वयाच्या व कोणालाही प्रवेश मिळतो. मात्र, त्याने किमान गुरू केलेला असावा. नसेल तर आश्रमात उपदेश दिला जातो. या आश्रमात तरुण लग्न न केलेले येतात, कोणी लग्न करून येतात, कोणी बायको मुलगा वारले तर येतात, कोणी कर्ज झाले तर कोणी मरायला टकलो तर चला सन्यास घेऊ. कोणाची ओळख असो वा नसो. मात्र, येथे आल्यानंतर आश्रमाच्या नियमानुसार वागायला पाहिजे. या आश्रमात शाळेसारखी शिस्त येथे असते. सकाळी ४ वाजतापासून महंत्त उठतात. सकाळी आरती झाल्यानंतर पारायण होते. नाष्टा झाल्यानंतर आपआपला अभ्यास करतात. ११ वाजता आरती झाल्यानंतर जेवण मग विश्रांती त्यांनंतर अभ्यास. पाच वाजता देवपूजा त्यानंतर पुन्हा पोथी. सात साडेसातला जेवण. रात्री आरती झाल्यानंतर ९ वाजतापासून झोपण्याची तयारी चालू होते. दिक्षा घेतल्या नंतर भिक्षामागून जगावे लागते. भिक्षा मागताना ती ओली भिक्षा असावी म्हणजे शिजलेले अन्न. भिक्षाच सर्वांनी आणून खावी असा दंडक असला तरी आश्रमात ३०० लोक आहेत. लहान मुलांपासून म्हातार्यापर्यंत आहेत. सर्व भक्त दररोज एकाच गावात भिक्षा मागायला जाणे शक्य नाही. गावातील लोकांनाही त्रास होऊ नये म्हणून भिक्षा आणण्यासाठी काही पाच सात लोकच बाहेर पडतात. आणलेली भिक्षा सर्व प्रसाद म्हणून खातात. भिक्षेत मिळालेल्या अन्नात लसन कांदा असला तरी चालेल कारण भिक्षेत आले तर ते अमृत आहे. आश्रमात स्वयंपाक होतो तेव्हा लसन कांदा वर्ज असते. एकाच पात्रात सर्व अन्न घेऊन त्याचा काला करून जेवण करतात. संसार जशा अपेक्षा असतात तशा अपेक्षा येथे नसतात. कोणतेच अपेक्षा नसल्यामुळे येथे लहानाचे मोठे झालेले आश्रम सोडून दुसर्या आश्रमात जाऊ शकतात किंवा घरीसुद्धा जाऊ शकतात. आपली सेवा कोण करणार हा प्रश्नच नसतो. कोणी आश्रमात आल्यानंतर मरेपर्यंत राहतात.
आश्रमाचे व्यवस्थापन : या आश्रमाचा खर्च कसा चालतो हे विचारल्या नंतर श्री. आनंदमुनी पंजाबी यांनी असे उत्तर दिले की, मातेला ज्याप्रमाणे आधी स्तन येतात मग अपत्त जन्माला येते. याचा अर्थ असा की कोणी जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या उदरनिर्वाची व्यवस्था परमेश्वर लावून ठेवतो. त्याची चिंता देवाला असते. येथील दिक्षा घेतलेले तिनशे भक्त तर देवाचे नामस्मरण करणारे आहेत. त्यांची चिंता तर परमेश्वर करतो. तसेच, येथे कोणी कोणालाच काही न मागता सर्वच मिळते. ३०० लोकांपैकी कोणी बिमार झाले तर लाखदिडलाख रूपये सहज खर्च करू शकतात. आश्रमाची देखभाल करण्यासाठी येथे राहत असलेल्या महंतांच्या वेगवेगळे सेवेचे कामे वाटून दिल्या जातात. प्रत्येक महिन्यांनी कामात बदल केला जातो. सकाळच्या स्वयंपाकासाठी ह्या सहा स्त्रिया तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी दुसर्या. एका महिन्यसानंतर यांना दुसरे काम दिले जाते. जे म्हातारे आहेत त्यांची कोणीतरी सेवा करायची. आपआपले वस्त्र स्वतः धुतात. महंतांचे आचरण कोणत्याही वयात दिक्षा दिली जात असली तरी उत्तम वय बालपण दहाबारा वर्षांचे असते. पौढ असेल, म्हातारा असेल तरी दिक्षा दिली जाते मात्र त्याने पुन्हा संसार करू नये. जे सोडले त्याचा पुन्हा स्वीकार करू नये. सन्यास घेताना अंगावरील कपडे, दागदागिने, एवढेच नव्हे तर खिशातील पैसेही आप्ताना देऊन टाकातात. सर्व उपभोग्य वस्तूचा त्याग करून परमेश्वराच्या आधिन जाणे. जसे लहान लेकरू आपल्या आईच्या आधीन असते पण हे कर म्हटले तर ते करत नाही.
ज्यांना भिक्षा मागायला जायचे आहेत त्यांनी गावातील लोकांचा स्वयंपाक झाल्यानंतरच भिक्षा मागण्यासाठी जावे. म्हणजे तुमच्या निमित्य त्यांनी काही करावे लागणार नाही. गावातील धूर दिसणे बंध झाल्यानंतर भिक्षा मागणे योग्य. प्रत्येक प्रदेशानुसार भिक्षेची वेळ वेगवेगळी असते. प्रांताप्रमाणे बदल करावो. जो श्रद्धेच्या भावनेने बोलतो त्यांच्या सोबत चांगले बोलावे. जो अपशब्द बोलतो, काही कारण नसताना आपल्याकडे तुष्यतेच्या भावनेने पाहतो, त्याच्यासोबत काहीच न बोलता निघून जावे. तो बोलतो म्हणून आपण बोलायचे नाही. आपण बोललो तर त्याच्या आणि आपल्यात काय फरक काय? देव न बोलणार्याच्याकडून पक्ष घेणार, असे महंत समजता. शेवटी ज्यांचे त्यांचे संस्कार म्हणून ते सोडून द्यावे. कामाशिवाय विणाकारण कोणाच्या घरी जात नाहीत. अन्य वार्ता’ करत नाहीत. देवाधर्माच्या सोडून जे बोलले जाते ते अन्य वार्ता. ‘अन्य वार्ता’ केल्यामुळे भांडण होतात. बोलता बोलता काही अपशब्द बोलल्या जातात ते त्याच्या जिव्हारी लागतात. आपल्या मनात हेतू नसतो पण त्याला लागतो. जेवढे कोणी विचारले तेवढे उत्तर द्याव्या. योग्य, खरे, द्यायचे, असा यांचा दंडक आहे. गावात कोणाचे मरण झाल्यास त्याच्या अंत्यविधीला जातात. सेवेदना व्यक्त करतात. मात्र, लग्नात जात नाहीत. कोणी आशीर्वाद घ्यायला आला तर त्याला आशीर्वाद देतात.
पोषाख : ज्यांनी दिक्षा घेतली आहे ते राखळी रंगाचे कपडे परिधान करतात. अंगात मनिला घालतात त्याला ‘अंगी’, लुंगी सारखे वापरतात त्याला पदर, डोक्यावर वापरावयाच्या वस्त्राला ‘मुंडासा’ असे म्हणतात. स्त्री दिक्षा घेतलेली असेल तर तिलाही राखळी रंगाचे ‘देवळा’ म्हणजे साडी, ‘कपणी’ म्हणजे झांपर. गुरू ज्यांनी केला आहे ते वर्हाडातील पारंपरिक पोषक परिधान करताना आढळतात. ज्यांनी दिक्षा घेतलेली आहे ते स्त्रीपुरुष आपल्या डोक्यावर केस ठेवत नाहीत. साधू मुंडलेला चांगला असा त्यांचा समज आहे.
मरण : दिक्षा घेतल्यानंतर संसारातील सर्व विधी टाळल्या जातात. दिक्षा घेतलेल्या महंताचा मृत्यू झाल्यास त्यांचा अंत्यविधी हा जल डाग, भूमी डाग व वन डाग अशा तीन पद्धतीने केला जात होता. ‘जल डाग’ म्हणजे नदीच्या पाण्यात मृत शरीराला बोझा बांधून टाकून देतात. ‘भूमी डाग’ म्हणजे जमिनीत मीठ टाकून पुरतात तसेच ‘वन डाग’ म्हणजे मृत शरीराला जंगलात सोडून देतात. आता फक्त मातीत गाडून म्हणजेच ‘भूमी डाग’ अंत्यविधी केला जातो. अनेक कारणांमुळे ‘जल डाग’, ‘वन डाग’ ह्या पद्धती बंद झाल्या आहेत. मृत्यू झाल्यापासून २४० तास किंवा दहा दिवसापर्यंत (८० पहर) त्याच्या निमिताने पुण्यकर्म केले तर त्याला पुन्य भेटते. म्हणजे अन्न, वस्त्र दान करणे, पारायण करणे वगैरे. तो पुन्याचा भागेदारी होईल मात्र पाप केले तर पापाचे होत नाही. दहा दिवसाच्या नंतर कोणताच विधी केला जात नाही. दहा दिवसानंतर तो आत्मा दुसर्या योनीत प्रवेश करतो यामुळे त्याच्याशी कोणताच संबंध राहत नाही. म्हणून दहा दिवसांपर्यंत पूण्यकर्म केले जातात.
टीप: वरील माहिती ही घेण्यासाठी मुलाखती २७/०८/२०२३रोजी घेण्यात आल्या. यामध्ये मंदिरातील लाड कुटुंबांची तसेच, श्री. आनंदमुनी पंजाबी व प्र. पु. प. तं. आक्का पंजाबी ह्यांची, आलेगाव, जि. अकोला
लेखक : डॉ.रावसाहेब मुरलीधर काळे, लोणी, अकोला