जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या पहिल्या दिवशी ऑक्सफॅमने इनइक्वॅलिटी नावाचा वार्षिक असमानता अहवाल नुकताच जारी केला. त्यामध्ये त्यांनी जगभरात आलेल्या करोना साथीच्या संकटापासून गेल्या तीन वर्षांत गरीब आणि श्रीमंत यांच्यातील विषमता मोठ्या प्रमाणात वाढली असून, वर्ष 2020 पासून जगभरात पाच श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दुप्पट झाली असून, पाच अब्ज लोक गरिबीच्या खाईत लोटले गेले आहेत. येत्या दहा वर्षांत जगाला पहिला सहस्र अब्जाधीश मिळेल. परंतु पुढील 229 वर्षांपर्यंत जगातून गरिबी दूर होणार नाही, अशी भीती ऑक्सफॅमने व्यक्त केली आहे. ऑक्सफॅमच्या अहवालातून भारतातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढत्या दरीबद्दल नवीन अहवाल समोर आला आहे. ‘सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्टः द इंडिया स्टोरी’ या अहवालात असेही म्हटले आहे की, 2012 ते 2021 दरम्यान केवळ 5 टक्के भारतीयांकडे देशातील 60 टक्क्यांहून अधिक संपत्ती आहे, तर तळाच्या 50 टक्के लोकांकडे केवळ 3 टक्के संपत्ती आहे. भारतातील एकूण अब्जाधीशांची संख्या 2020 मध्ये 102 वरून 2022 मध्ये 166 अब्जाधीशांवर गेली आहे. अशा प्रकारे या अहवालातून या बाबी समोर आल्या आहेत. जर हे असेच चालू राहिले तर
देशाचा सामाजिक पाया ढासळायला वेळ लागणार नाही. आर्थिक असमानता/ विषमता म्हणजे समाजातील विविध गटांमधील उत्पन्न आणि संधीचे असमान वितरण होय. एकीकडे भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असला तरी तो सर्वात असमानता असलेल्या देशांपैकी देखील एक आहे. आर्थिक विषमता आली की त्याबरोबर आरोग्य विषमतादेखील येते. अर्थशास्त्रातील मूलभूत प्रश्नांपैकी एक प्रश्न असतो तो म्हणजे संपत्तीचे
विभाजन आज हाच प्रश्न साऱ्या जगाला भेडसावत आहे. जागतिकीकरण आणि तांत्रिक प्रगतीने काही गटांसाठी नवीन संधी निर्माण केल्या आहेत तर इतरांना मागे टाकले आहे. याचा परिणाम सामान्यतः भांडवलाच्या मालकांना राष्ट्रीय उत्पन्नात मोठा वाटा मिळतो. कोविड- 19 महामारीमुळे संपत्तीच्या असमान वितरणात वाढ झाली. या काळात मृत्यू दराचे प्रमाण जसे वाढले तसे गरिबीचे प्रमाणही वाढले; परंतु काही मोजक्या श्रीमंतांना याचा फायदा झाला आणि त्यांच्या संपत्तीमध्ये या काळातच वाढ झालेली दिसून येते. जगातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे एकूण 76 टक्के संपत्ती आहे. देशातील आघाडीच्या शंभर श्रीमंतांकडे मार्च 2020 मध्ये 313 अब्ज डॉलर संपत्ती होती, ती 2021 मध्ये 775 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या घटकाच्या श्रीमंत होण्याचा वेग साऱ्या जगाला हादरवणाऱ्या करोनाच्या महासाथीतही कायम होता, हे लक्षात घेता महासाथ नेमकी कोणाच्या जीवावर उठली आणि कोणाची घरेदारे, रोजगार उद्धवस्त करून गेली हे लक्षात येते. लैंगिक असमानता हेही भारतामध्ये आर्थिक विषमता वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. आजही भारतात लैंगिक असमानता कायम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.