तिवसा/कौंडण्यपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणी मंदिराला लागूनच एका घरात खोदकाम करताना दगडावर कोरलेली प्राचीन मूर्ती आढळून आली आहे. शोभाताई बबनराव डंबे असे घर मालकाचे नाव आहे या मूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश देवतांची असल्याचे सांगण्यात येते.
विदर्भातील पुरातन राजधानी रुक्मिणी मातासह पंचसतीचे माहेरघर व कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तिपीठ असलेल्या तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूरला प्राचीन इतिहास लाभला असून त्याची प्रचिती व पुरावे आपल्याला महाभारत यासारख्या महाग्रंथामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर अशातच आता कौंडण्यपूर येथेसुद्धा अनेक वस्तू व साहित्य संपदा आजही आपल्याला दिसून येते. या ठिकाणी अनेक वेळा पुरातत्व विभागाने संशोधन केले असून काही पुरावे सुद्धा आढळले आहे. आणखी एक पुरावा समोर आला असून कौंडण्यपूर येथे श्री रुक्मिणी मातेच्या मुख्य मंदिराला लागून असलेल्या शोभाताई बबनराव डंबे यांच्या घरी बांधकाम सुरू असताना ५ फुटाच्या दरम्यान एक प्राचीन मूर्ती आढळली आहे. सदर मूर्ती अखंड पाषाणापासून कोरल्या गेल्या आहे. याबाबतची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली असून सध्या ही मूर्ती जवळच असलेल्या शिवमंदिर येथे डंबे कुटुंबयांनी विधीवत पूजाअर्चना करून ठेवली आहे.