मुंबई : नवी मुंबईच्या पामबीच मार्गावर सायकल अथवा धावपटूंसाठी वेगळा मार्ग नाही. तरीही अनेक सायकलपटू जीव धोक्यात घालून या मार्गावर सायकलस्वारी करतात. याचाच फटका बसून इंटेलचे माजी संचालक अवतार सैनी (वय ६८) यांना बसून त्यांचा मृत्यू झाला. या मार्गावरून सायकलींग करत असताना मागून आलेल्या टॅक्सीची धडक त्यांना बसली आणि गतप्राण झाले.
अवतार सैनी चेंबूर ते खारघर आणि खोपोली अशी सायकलस्वारी नियमितपणे करत होते. त्यांच्यासोबत त्यांची काही मित्रमंडळीही सायकलस्वारीत सहभागी असत. बुधवारी सकाळी पामबीच मार्गावर बेलापूरजवळ महापालिका मुख्यालयाजवळ त्यांच्या सायकलला टॅक्सीची ठोकर बसली. त्यांना डीवाय पाटील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रूग्णालयाने दिली. एनआरआय कोस्टल ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार टॅक्सीचालक हषीकेश खाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाम बीच मार्गावर काही वर्षांपूर्वी अपघात वाढल्याने पादचारी आणि सायकलस्वारांसाठी पामबीच वर बंदी घालण्याबाबत आली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त ए के शर्मा यांच्या कार्यकाळात हे पाऊल उचलण्यात आले होते. तसे फलकही लावण्यात आले होते. मात्र कालांतराने फलक नाहीसे झाले आणि आज नियम कोणाला आठवतही नाही अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.
• अवतार सैनी यांनी मुंबईच्या व्हीजेटीआयमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकेतील एका विद्यापीठातून मायक्रोप्रोसेसर आणि डेव्हलपींगचे शिक्षण घेतले. १९९३ मध्ये इंटेलने निर्माण केलेल्या पेंटीयम प्रोसेसरचे ते प्रमुख रचनाकार होते. सैनी यांच्या नावावर मायक्रोप्रोसेसर रचनेशी संबंधित ७ पेंटट आहेत. २००४ मध्ये ते इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते चेंबूरमध्ये स्थायिक झाले होते. सैनी यांच्या पत्नीचे ३ वर्षांपूर्वीच निधन झाले होते. सैनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हे दोघेही अमेरिकेत राहतात.