‘दिल्लीच्या तख्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी जो दीर्घकाळ लढा दिला, तो आज आधुनिक भारताला स्वातंत्र्यासाठी लढताना प्रेरणादायी ठरतो आहे, आज शिवछत्रपती हे दमनकारी साम्राज्यशाहीविरुद्धच्या राष्ट्रवादी लढ्याचे प्रतीक ठरले आहेत,’ हे उद्गार आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे.
एकदा नोबेल पारितोषिक प्राप्त थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांना जपानी लोकांनी विचारले की, ‘तुमच्या भारताची खरी ओळख काय?’ तेव्हा रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांची लोककल्याणकारी व्यवस्था ही भारताची खरी ओळख आहे. बंगालच्या फाळणीनंतर वंगभंगाची चळवळ उभी राहिली. या चळवळीची प्रेरणा होते छत्रपती शिवाजी महाराज. रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेली ‘शिवाजी उत्सव’. ही कविता वंगभंग चळवळीचे स्फूर्तीगान ठरली. आपल्या या कवितेत रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार, या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आमचे पाथेय’. ते पुढे आपल्या बंगाली बांधवांना आवाहन करतात की,
‘हे वंगवासियांनो म्हणा आज एकस्वरात मराठ्यांसह
शिवाजी महाराजांचा विजय असो
हे वंग वासियांनो चला तर आज सजून धजून महोत्सवाला मराठ्यांसह एकत्र
आज एकाच वास्तवाने पूर्व पश्चिम एक होतील भारत देशाचे युद्धाशिवाय
करतील गौरव एका पुण्य नामाचा, एका पुण्य नामाचा
माराठीर साजे आजे हे बंगाली
एक कंठे बोलो,
जयतु शिवाजी’
अन्यायी व्यवस्थेविरुद्ध सातत्यपूर्ण लढा देऊन लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील अनेक स्वातंत्र्यलढ्यांची प्रेरणा ठरले. बंगालमधील थोर साहित्यिक रोमेशचंद्र दत्त, गिरीशचंद्र घोष, जोगेंद्रनाथ बोस, नवीनचंद्र सेन यांनी आपल्या रचनांमधून शिवछत्रपतींचा महिमा गायला. ब्रिटीश साम्राज्यशाहीविरोधात समर्थपणे लढा देत असताना अनेक क्रांतिकारकांचे शिवछत्रपती हे प्रेरणास्थान ठरले.
अन्यायाविरूद्ध लढा देऊन स्वराज्याची निर्मिती व लोकहितकारी कारभार हे या प्रेरणेचे सूत्र होते. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकरी, कष्टक-यांचे राजे होते. आपल्या लष्कर व प्रशासन व्यवस्थेत त्यांनी धार्मिक बाबींना कधी आड येऊ दिले नाही. जातपात, धर्म यापेक्षा त्यांनी कर्तृत्वाला महत्व दिले. त्यांच्या सैन्यात सर्व जातिधर्माचे लोक होते. युद्धात धार्मिक वास्तू, कोणतेही धार्मिक ग्रंथ यांना धक्का लागता कामा नये. महिलाभगिनी, बालके, साधू- संत यांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे त्यांचे स्पष्ट आदेश होते. त्यांनी स्वराज्याच्या सर्व कार्यात सर्व जातींतील गुणी माणसे सामावून घेतली. सर्वांना स्वराज्याच्या एका सूत्रात बांधून बलाढ्य सत्तेविरूद्ध लढा दिला व स्वराज्याची स्थापना केली. अद्वितीय योद्धा म्हणून त्यांचे जगभर नाव घेतले जाते. त्यांच्या या प्रेरणेनेच अटकपासून कटकपर्यंत मराठा साम्राज्य निर्माण झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुख्य प्रधान (पेशवा), अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री व सुमंत असे अष्टप्रधान मंडळ कारभाराच्या सोयीसाठी निर्माण केले. अष्टप्रधानांची कर्तव्ये व कारभाराबाबत नियमावली निश्चित करून दिली. त्याचप्रमाणे, राज्याभिषेक शक सुरू केला. त्याकाळी बहुतेक ठिकाणी फार्सी ही भाषा राजकीय परिभाषा म्हणून वापरली जात असे. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी रघुनाथपंत हणमंते यांच्याकडून राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. राज्याभिषेकानिमित्त होन आणि शिवराई ही दोन नवी नाणी पाडण्यात आली.
नागरिकांच्या हितासाठी राज्यव्यवस्था निर्माण करताना मुलकी सत्तेचे महत्व ते ओळखून होते. मध्ययुगात मुलकी सत्तेचे महत्व ओळखणारा हा थोर नेता भारताच्या इतिहासात एकमेव असावा. त्यांनी लष्कराला नियमित वेतन देण्याची पद्धत सुरू केली. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही’, अशी त्यांची स्पष्ट आज्ञा होती. कारकून प्रजेकडून कर वसूल करतील व गड-कोटाचा खर्च कारकून करतील. तो हक्क लष्कराला नाही, अशी त्यांची आज्ञा होती. त्यामुळे मुलकी व्यवस्थेची एक जबाबदार यंत्रणा निर्माण झाली. त्याशिवाय, त्यांनी वतनदारांचे हक्क नियंत्रित केले. वतनदारांना महसूलातून हिस्सा मिळत असे. त्याऐवजी रोख रक्कम वेतन म्हणून ठरवून दिली. सवेतन सुसज्ज सेना, मुलकी प्रशासन, चोख राज्यकारभार व विश्वासू सहकारी यामुळे आदर्श राज्यव्यवस्था उभी राहिली.
संरक्षणसिद्धतेच्या दृष्टीने त्यांची सेना सुसज्ज होतीच, त्याशिवाय त्यांची हेरव्यवस्थाही मजबूत होती. त्यांच्या हेरव्यवस्थेबाबत उल्लेख युरोपीय पत्रव्यवहारांत आढळून आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे विलक्षण व्यक्तिमत्व होते. महान लढवय्या, लोककल्याणकारी राजा, आदर्श प्रशासक म्हणून त्यांचे नाव जगभरात घेतले जाते. स्वातंत्र्य, समता, न्याय या मूल्यांसाठी दिल्या जाणा-या जगभरातील अनेक लढे, चळवळींचा ते प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.
– हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला