मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून वर्षभरात छपाई झालेल्या नव्या ३९ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, श्री. पु. भागवत स्मृती पुरस्कार, अशोक केळकर मराठी-भाषा- अभ्यासक पुरस्कार आणि मंगेश पाडगांवकर मराठी-भाषा- संवर्धक पुरस्कार हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
स्थापनेपासून मंडळाने पुस्तक प्रकाशन या मुख्य उद्दिष्टानुसार आजवर ६६६ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरवदिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. यावर्षी प्रकाशित होणाऱ्या ३९ ग्रंथांमध्ये मंडळाकडून डॉ. अरुणा ढेरे लिखित ‘भारतीय विरागिणी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. या ग्रंथामध्ये भारतीय पातळीवरील काव्यविश्वातील कवयित्रींची संत आणि भक्त • अशा स्त्रियांची कालसंबद्ध पार्श्वभूमी, त्यांनी निवडलेले भक्तिमार्ग, त्यांचा परमार्थविचार, लौकिकाविषयीची त्यांची दृष्टी, त्यांनी केलेले कौटुंबिक आणि सामाजिक संघर्ष, त्यांची जीवनसाधना आणि त्यांनी व्यक्त केलेले स्त्रीत्वाचे संवेदन यांचे दर्शन होते. तसेच ‘चंद्रपूरच्या महाकालीची- लोकपरंपरा माया हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ संजीव भागवत यांनी लिहिला असून हा ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे. मातृदेवता आणि त्यांचे अस्तित्व सर्वसामान्यांमध्ये अजूनही कसे अबाधित आहे याचा दाखला हा ग्रंथ देतो. लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक यांच्यासाठी हा ग्रंथ दिशादर्शक असा आहे.
महाराष्ट्राच्या भौतिक प्रगतीबरोबरच भाषा, साहित्य, कलाकल्पना, वस्त्रप्रारणे, खाद्याभिरुची, नितीसंकल्पनांचा आशय केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा विस्तृत विवरणात्मक असा सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास मांडणारा व मोठ्या कालपटाचा वेध घेणारा, महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात मोलाची भर टाकणारा ‘महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ (खंड २) १९०१-१९५० (भाग १ व भाग २) हा ग्रंथ रमेश वरखेडे यांनी लिहिला असून, हा ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित होत आहे. याबरोबरच ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमाले अंतर्गत यापूर्वी प्रकाशित झालेले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चरित्र
नाना शंकरशेट यांचे चरित्रही प्रकाशित होणार
• मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांचे अमर शेंडे यांनी लिहिलेले चरित्र ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमालेअंतर्गत मंडळ प्रकाशित करीत आहे. फलटण संस्थानचे अधिपती असेलेले श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे रवींद्र बेडकिहाळ यांनी लिहिलेले चरित्र ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमालेअंतर्गत प्रकाशित होत आहे. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देणारे चरित्र डॉ. सगरे यांनी लिहिले असून या पुस्तकाचे प्रकाशनही मंगळवारी होणार आहे.
मंडळाच्या वतीने पुनर्मुद्रित करण्यात येत आहे. या चरित्रमाले अंतर्गत गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र प्रकाशित होत आहे. तसेच श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय चार खंडांत प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने पूर्ण केला असून या प्रकल्पाचे संपादन डॉ. विश्वास पाटील यांनी केले आहे.