मी लानपनी शिनेमाचा भलकसा आशीक होतो. गावातल्या जत्रीत टुरींग टाकीजा येन्या आगुदरच ,मी अन माले सोपती कोनता शिनमा यील या गोष्टीवर घंटोघंटे बोलत असो. मंगरुयच्या (मंगरूळनाथ जि .वाशिम) जत्रीच्या आगोदर चिखली ,डव्हा ,कायामाथा अन धानोरा अथुलच्या जत्रा भरत असत . जनरली या जत्रीत ,जे शिनेमे लागत, त्यातले ७०-८०% शिनेमे मंगरुयच्या जत्रीत येत असत. पन त्यातल्या त्यात ,कोनत्या टाकीजा मंगरुयच्या जत्रीत येतील ,त्येच्यावर सबनकाई ठरत जाये.आमच्या अथुलच्या जत्रीच्या आगुदर ,या तिनही ठिकानच्या जत्रीत येनाऱ्या शिनेमाचे पोस्टर ,आमच्या गावात लागत जायेत. मंग शिनेमा अन शिनेमा हाच आमचा ईशय राये.कायामाथा अन धानोऱ्याची जत्रा उलंगली की त्या टाकीजाईचे ट्रक आमच्या गावात येत असत. शाळा सुटली अन दप्तर घरी पटकले की आमची ग्यांग ट्रक आले का पाहासाठी यात्रा मैदानात हजर होत जाये.. ट्रक दिसले नाई की मन नाराज होत जाये . असे दोन तीन दिवस होत असे. अखीरकार ,टुरींग टाकीजाईचे सामान सुमान घीवून ,ट्रक आले हे आमच्या कानावर पळले रे पळले की आमची ग्यांग यात्रा मैदानावर हजर .कीती टाकीजा आल्या अन कोन कोनते शिनमे लागनार हायेत याचा अंदाज घेने सुरु होत असे. शिनेमा पाहाची तं हौस बम्म होती पन खीशात दमळी नसत जाये. घरुन पन येका दोन शिनमाचेच जुगाळ जमत असे. मंग काय भाईर बसुन स्टोरी आईकावं अन घरी यावं.आता मोजून येक अगर दोन शिनेमे परद्यावर पाहाचा योग येत असल्यानं, नेमका कोनता पाहावं याचा इच्यार करता करता अर्धी जत्रा हुन जाये.. मंग बेस्ट ऑफ बेस्ट ठरवून, दोन शिनेमे पाहून, त्याचे वर्नन जत्रा सरल्यावर मयनाभर चाले .म्या सांगतलेले हायेच की बाकीचे पिच्चर टाकीज भाईर उभे राहून स्टोऱी आईकत जाओ.. या उभे रायन्यातून माल्या डोकशात आयडीया आली . जे पिच्चर सुरु झाला चालू झाला म्हनुन क्याबीनच्या अंदरुन माईकवर बोलेत ते काम आपुन केले तं शिनमा पाहाचा प्रश्न सुटुन जाइल .मंग त्या माईकवाल्या मानसाले लग्गा लावून ,जराकभर मले बोलू दे .. मंग त्याने मले बोल म्हनुन सांगतले .. म्या जो याडोटाईज सुरु केली की तो गळी पायतच रायला.. चाला काढा पटापट ,सरकारी भाग सुरु झाला चालू झाला .. सरवाईले आवळनारा खेय ,सासू सुनेचा खेय …सबनायले समजानारा खेय ….. माहेरची साडी लागला माहेरची साडी … सासरले बईन निंगाली ,भावाची लाडी ” नेसली माहेरची साडी ….. मंग काय त्या गळ्यासंग वयख झाली … आता त्या जत्रीत आलेल्या टाकीजात ,बंद्ये याडोटाईज करनारे त्याच्या वयखीचे असल्यानं ,त्यायच्या संग माली पन वयख झाली . मले कोनत्याई टाकीजले पिच्चर पाहासाठी तिकीट लागने बंद झाले. मंग लगेचच दुसऱ्या सालच्या जत्रीत महाविर टाकीजचा याडोटाईज करनारा बीमार झाल्यानं,तो गावाले निंगुन गेलता .. मंग सुमेध टुरींग टाकीजवरचा माला दोस्त म्हन्ये तू महाविर टाकीजवर याडोटाईज कर ,तुले पैसे द्याले लावतो .. हे आईकताच, मी बम्म खुश झालो .. फुकटात शिनेमा तं शिनेमा अन वदरुन पैसे , जेवन खावन तथीसाच..मायले ईचारुन मी जत्रा होईस्तोवर याडोटाईज करत रायलो.. मंग हे कॉलेजात जायेलोग सुरुच होते.. या कामापाई ,माल्या बंद्या दोस्ताईले अन माल्या घरच्याईले, कोनत्याई टाकीजले फुकटात शिनेमा पाहाले भेटे .या निमीत्ताने, दोस्ताईत मले बेज्या लाईक करत जायेत ..
“दोस्तहो” मले आवळलेला शिनमा असा येकचं अन तो म्हंज्ये अजय देवगनचा “जख्म” हा शिनेमा .त्यातले गली मे आज चांद निकला हे गानं माल्या बेज्या आवळीचं.शिनेमा या ईशयानं, समाजाले अशी काई मोहनी घातली की मानूस अन शिनेमा हे पक्के समीकरन हुन बसले.अलग अलग ईशयावरचे शिनेमे आजलोग तयार झालेत . त्यातुन भलबुरं घीवून मानुस जगत हाये .जसजसा काळ बदलत गेला तसतसा शिनेमात पन बदल होत रायला.आजच्या तंत्रज्ञानापाई ,भव्यदिव्य अशे शिनेमे पाहाले भेटून रायलेत.टीव्ही अन मोबाईलच्या येन्यानं, नवनवे शिनेमे बोटाच्या टिचकीवर आलेतं . पन आजही शिनेमा पाहाची खरी मज्या हे थियेटरातच हाये .
श्याम ठक, बार्शीटाकळी/मंगरूळनाथ, ९९७५७९२५२०