{व-हाडी कथा}
गावात सखाराम भोयाच्या पोरीचं लगन ठरलं होतं. कुकू अनं लगन एकाच दिशी ठरलं होतं. डिंगाबरच्या घरी पतरीका आली. त्यानं तारीक पाहूनं घेतली अन् चार दिवस आंधीचं सखारामाच्या घरी डिंगाबरनं मुक्काम ठोकला. काय लागलं सवरलं थो पाह्ये. पतरीका गावात पोस्त करनं, किराना आनाले अन् अयराचे कपळे आनाले सखारामच्या संग मुर्चापुरले जानं, मंडप वाल्याले भेटूनं तेयले अॅडवांस देनं, आच्या-याले भेटूनं काय काय अॅटम कराचे ठरवूनं घेतलं, बामनाले भेटूनं आले...हे सारे काम डिगांबरनं सखाराम सोबत राहूनं डिंगाबरनं केले. मंग रोज तथिसाचं खानं अन् तथिसाचं झोपनं...लगनाचा दिस ऊजाळला. मस्त मंडप पायटीच लावला गेला. कनाता खिवा मारूनं तानल्या गेल्या. मस्त मंच तयार केला त्याच्यावर महाराज्या खुरच्या लावल्या गेल्या. मंडपात फा-या टाकल्या गेल्या. आचारी सैपाकाले पायटीच भीळ्ळा होता. चार बाया आच्या-यासंग आल्या होत्या. कोनी ईव्यानं आलू चिर, कोनी वांगे चिर, कोनी ऊंडा भिजवं त कोनी लसनात पीठ टाकूनं लसनं शिलाचं काम चालू होतं. सा-या लगन घरात कर्ता मानूस म्हनूनसन्या डिगांबर मिरवत होता.
पन् डिगांबरनं काह्यी केल्या त्याचा वंगयला टवाल अन् भोकाभोकाची बांडीस काह्यी काहाळली नाह्यी. कोनी काह्यी म्हतलं त थो म्हने…
” आपल्याच घरचं लगनं हायं. आपल्याले सा-याकळे ध्यानं द्या लागते. चांगले कपळे घालूनं मिरवलं त कपळे खराब होतात. “
असा थो ईचारना-याले गटगप्प अन् चिळीचिप्प करे .
झालं लगनं लागलं. सुई लगनं लागलं. फा-यायले फोल्डा मारल्या गेल्या. लोकं पटपट जेवाले बसले. अवघं गाव ऊलटलं होतं. डिंगाबरलेही खैचाटूनं भूक लागली होती. त्यानं एक कोपरा पाह्यला अन् पालकट मांडूनं टवालानं बराबर सामायनं झाकूनं बसला अन् बांडीसात त्यानं आंधीचं एक पन्नी घेतली होती. मीठ पान्यापासूनं वाहाळाले सुरवात झाली. वाळप्यायचा जास्त जोरं बायायच्या पंगतीकळे…मंग एकामांग एक आलुवांग्याची भाजी, दायभाजी ,पोयी, मसालेभात, लुंजी, शेव अन् ज्याची डिंगाबर आतुरतेनं वाट पाह्यत होता थे बेसनवळी आली. बेसनवळी पतरवाईत टाकल्या बराबर तोंडात टाकूनं वाळप्याले अवाज लावते…
” अय बाल्या बरफी टाकं ना बावा पतरवाई सोळूनं वाहाळतं काय? “
वाळप्याले वाटते पतरवाई सुटली लेकं. थो दो पावलं मांग येते अन् दोनं दोन बरफ्या टाकूनं पुळे सरते तसा डिगांबर अवाज लगावते…
” अय बरफीवाल्या पोट्ट्या अखीनं दोन वाहाळनं लेका चाल्ला कुरूकुरू . “
थ्या वाळप्याले अता ‘पोट्टया’ म्हतल्याबराबर राग आला होता. त्यानं फनफनतचं ऊत्तर देल्लं.
” मले सखाराम आबानं सांगल त्याच परमानात मी वाळनं करूनं राह्यलो. एका पतरवाईत दोनं. “
” मले झवनं शिकवू नोको सारी बरफी म्याच रातभर जागूनं तयार केली. चल वाहाळ आता नाह्यीत कानफळात देईनं. “
थ्या पोरानं आयकून न आयकल्यासारखं केलं अन् पुळ सरकला. तसा डिंगाबरले राग आला अन् पाय आपटत धाम्याजौळ गेला अन् सारा धामाच त्याच्या पतरवाईत रिकामा केला. अन् रागारागानं धामा देल्ला पोट्याच्या ईकळे भिरकावूनं…पोट्ट तनतनत गेलं सखाराम बुवा जौळ. ईकळे पतरवाई अवघी बरफीनं टच्च भरली होती. आलूवांग्याच्या डवन्यात, मीठात, भातात बरफी एक झाली होती. डिंगाबरनं बांडीसातली पन्नी काहाळली पटपट सारी बरफी पन्नीत भरली. अन् मंग शेजीचं पालकटीले लावूनं ठिवली. पोटभर खावूनं खुंदलूनं घेतलं. अन् ढेकरं देत पन्नी हालवत घरी गेला. ऊतरंडीच्या एका भरन्यात बरभी भरली अन् सन्न बाजीवर तानूनं देल्ली.
वजनं कमी होते म्हनूनसन्या डिगांबर ना आंग घासे ना नाकातले मेकळं काहाळे ना नख …अवघ्या गावात मालूम होतं डिगांबर कसा हायं म्हनूनसन्या.
कुठं तालुक्याले जाच काम पळ्ळ त डिगांबर कवाच एस टी ची तिकीट काहाळे नाह्यी. झोपाचं ढोंग घेवूनसन्या घोरत बसे. कंडक्टरले काहाळलं अशीनं तिकीट अस वाटे. तालुक्याले गेल्यावर हटेलित डिगांबरनं कवाच काह्यी खाल्ल नाह्यी. कोनीतरी ओयकीपायकीच पाहूनं त्याच्या घरी जावूनं जेवूनं ये. सोताच्या वावरातल्या तुरीच्या शेंगा म्हना हरभरा म्हना कवाच ना तोळे पन् लोकायचे वावरं त्याले दाळ. रसत्यावरलं शेनं, काळ्याकुळ्या, बडगरं, कागदं जे काही सापळनं थे सारं काही घेवूनं थो घरी ये.
एका दिवशी डिगांबरच्या आंगनात शेजीचा धनगरीनं बुडीची बकरी घुसली. तीनं खाल्लं काय त… आंगनात वावू घातलेली तुरीची दाय. डिंगाबर फनफनत धनगरीनं बुडीच्या घरी गेला अन् दाट्यात ऊभा राहूनं बुडीले हाका मारू लागला.
” अय पंचफूला आजीऽऽऽ…अय पंचफूला आजी…”
घरातूनं खाकरत पदरानं डोये चोयत पंचफूला आजी बाहेर आली. डोयातले तार बोटावर लुगळ्याचा पदर घेवूनं काहाळत होती. दोही भुयावर डावा हात ठिवूनसन्या बुडी म्हनते कशी….
” कोनं होयं रे तू पायटी पायटीचं कावळ्यावानी, टिटवीवानी अळ्ळावूनं राह्यला माह्या नावानं. “
डिगांबर जरा नरमला .
” अव आजी तुह्या बकरीनं माह्या आंगनात वावू घातलेली तुरीची दाय खाल्ली ना व चांगली अरधाक शेरं. “
” अरे बाबू मूक जनावरं थे त्याले काय कयते. “
” त्याले काय कयते! सारचं कयते हातात झीलपी घेतली त कशी गांडीले पाय लावूनं पयाली थे. “
” बापा तीचा पाय, कंबळक मोळतं काय रे. माह्याघरची घेवूनं जाय अदलिकभर दायं पन् बकरीले नोको मारू गाबन हाय थे. “
” हावं दाय त घेतोचं पनं तीच्या ऊद्या पायटी लेंड्याही घेवूनं जातो. “
” लेंड्या काहाले नेत रे. काय कायी जादू बिदू करत क काय. “
” मी थे तूले ऊद्या पायटी सांगनं काय करतो त. चल दे पायलीभर दाय. “
” अय बाबू पायली नाही म्हतलं म्या. अदली म्हतलं अदली. “
” बरं दे जे देशीनं त दे. पन शिगोरं दे…”
डिंगाबर दाय घरी घेवूनं येते. मायले सारी हकिकत सांगते. दुस-या दिवशी डिगांबर पायटीचं ऊठते अनं न तोंड गांड धुता थेट पंचफूला बुडीच्या घरी जाते.
” अय पंचफूला आजी…”
अशा हाका मारते.
” आला काय रे डिगांबर….जाय घे थ्या लेंड्या..” बुडी हात दाखवते.
” अवं आजी ह्या लेंड्या नोव्ह. “
” अरे बाबू दाय खाल्यावर तीले कायच्या लेंड्या येतात. हागोनं लागली तीले. “
” मंग हेच घेतो मी…”
” अरे बाबू थ्या बकरीले हागोनं लागली. दुस-या बकरीच्या लेंड्या घे. “
” हे पाय मावशी आपलं कामं कस हायं आपलं नाही द्याच अन् दुस-याच नाही घ्याचं. “
डिंगाबरनं बकरीचं सारं हागोनं टमरेटात ओंजयीनं सावळलं अन् घरी आनलं अन् घमेल्यात कालवूनं आंगनात रपरप शिपून टाकलं.
डिंगाबरची माय म्हनते कशी…
” कायचा सळा टाकला रे निर्रा वाकसला वास येवूनं राह्यला. “
” अवं मा थ्या धनगरीनं बुडीच्या बकरीनं आपली दाय खाल्ली होतीना. तीले हागोनं लागली थेच होय हे. “
” अरे मसनखाईच्या मसनऊद्या काह्यी करत कंजूस बोळ्याचा….सरा वास घुसला नाकातोंडात. सळा गाई बैलाच्या शेनाचा असते ना….”
बाई जीव कटायला ह्या पोराले…अशी बळबळ करत डिगांबरची माय घरात गेली अन् भिताळावर मारत बसली.
लेखक, सु पुं अढाऊकर, अकोला, ९७६९२०२५९७