अकोला, दि. १३ |सध्याच्या परिस्थितीत आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा बनलेला आहे. संपूर्ण राजकारण आरक्षणाभोवती फिरत आहे. अनेक पक्षांकडून आरक्षण विरोधी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे आरक्षण संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आरक्षण वाचवायचे असेल तर आरक्षणाचे समर्थक असलेल्या नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितच्याच उमेदवारांना मते द्यावीत, जेणेकरून वंचित चे आमदार विधानसभेमध्ये असले तर ते आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करू शकतील, असे आवाहन अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी रविवारी स्थानिक एसीसी मैदानावर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातून केले.
भारतीय बौद्ध महासभा द्वारा आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात संबोधन करतांना ॲड. बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की आरक्षणाच्या शिडीने जे मोठे अधिकारी झाले तेच आता त्यांच्या पुढच्या पिढ्यांची आरक्षणाची शिडी काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण धोक्यात आलेले आहे. हे आरक्षण टिकविण्यासाठी वंचित सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

इतर राजकीय पक्षांकडून आरक्षण विरोधी भूमिका घेतली जात आहे. ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरात हृदय हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्याचप्रमाणे संविधानामध्ये आरक्षण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आरक्षण टिकले पाहिजे. आरक्षण राहिले नाही तर व्यवस्था कोलमडेल, पुन्हा गुलामगिरीची परिस्थिती निर्माण होऊ शकेल. त्यामुळे आरक्षण वाचविणे गरजेचे आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी पान २ वर आरक्षण वाचवायचे असेल
संसदेत, विधानसभेत आरक्षणाच्या बाजूने बोलणारे लोकप्रतिनिधी असायला हवेत. लोकसभा निवडणुकांमध्ये ओबीसींना उमेदवारी दिल्या गेली नाही, त्यामुळे त्यांचे खासदार झाले नाहीत. परंतु आता विधानसभेत वंचित बहुजन आघाडी कडून आरक्षण टिकविण्यासाठी आरक्षणाची बाजू घेणारे उमेदवार दिल्या जाणार आहेत. त्यामुळे वंचितच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत निवडून देण्यासाठी सर्वांनी निश्चय केला पाहिजे, असेही अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. मागासवर्गीयांचे आरक्षण हटविण्यासोबतच ओबीसींचे आरक्षण हटविण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक असल्याचे सांगताना वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या आरक्षणाचा लढा लढत आहे असेही ते म्हणाले. दरवर्षी स्थानिक अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर हजारो अनुयायांच्या उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभा अकोला शाखेच्या वतीने दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धम्म मेळाव्याचे आयोजन केले जात असते. यावर्षीच्या या धम्म मेळाव्यात सुद्धा जिल्हाभरातून व जिल्ह्याच्या बाहेरून देखील हजारो अनुयायी उपस्थित होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा अकोला शाखेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे हे होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन नंदकुमार डोंगरे यांनी केले तर प्रास्ताविक रमेश गवई गुरुजी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रा. अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, अशोक सोनवणे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, अरुंधती शिरसाट, शंकरराव इंगळे, प्रमोद देंडवे, श्रीकांत घोगरे, धीरज इंगळे, शाहीन परवीन, जि. प. अध्यक्षा संगीता अढाऊ, पुष्पाताई इंगळे, सुनील फाटकर, निलेश विश्वकर्मा, शोभाताई शेळके, अॅड. संतोष रहाटे, प्रभाताई शिरसाट, डॉ. प्रसन्नजीत गवई, वंदना वासनिक, गजानन गवई, विकास सदांशिव व इतर मान्यवरांचे उपस्थिती होती.
सध्याच्या परिस्थितीत शेतमालाला भाव मिळत नाही. सोयाबीनचे भाव गेल्या अनेक वर्षांपासून जिथल्या तिथे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतमालाला भाव मिळत नाहीत या परिस्थितीला जबाबदार कोण आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जाती सोबत माती खाण्याच्या विचारात तुम्ही ज्यांना निवडून देता तेच लोक निवडून आल्यानंतर व्यापारांशी हात मिळवणी करतात, शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी त्यांना खुली सूट देतात आणि व्यापारी सांगतील तसा कारभार चालवितात. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती येण्याअगोदर जाती सोबत माती खाणे सोडून परिस्थितीचा विचार करून यावेळी निवडणुकीमध्ये मतदान करावे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी वंचित आग्रही आहे. शेतकऱ्यांनी संधी दिल्यास शेतकऱ्यांना योग्य न्याय वंचित कडून दिला जाईल, असे यावेळी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.
राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. सरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात नोकर भरती केल्या जात नाही. अजूनही साडेचार लाख नोकर भरती केल्या जाईल एवढ्या जागा रिक्त आहेत. परंतु सरकारकडून पदभरती होत नाही. याबाबत तरुणांनी ज्यांना आतापर्यंत मते दिली त्यांना जाब विचारला पाहिजे. यापुढे ही परिस्थिती सुधारायची असेल तर आतापर्यंत जाती सोबत माती खाऊन ज्यांना मते दिली त्यांना सोडून आगामी निवडणुकीत वेगळ्या जातीच्या उमेदवारांना मत देऊन बघा, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मत दिल्यास आम्ही बेरोजगारीचा प्रश्न सोडवून विकास कसा असतो ते करून दाखवू, असे आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी बोलतांना केले.