बेळगावसह मराठीबहूल सीमाभाग कर्नाटकाला देऊन भाषावार प्रांतरचना आयोगाने महाराष्ट्राचे पंख छाटले आहेत. बिगरमराठी भाग कर्नाटकाला देऊन नवकर्नाटकाची निर्मिती केली आहे. ही राजकीय तोडफोड करण्यामागे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला पाहिजेत.. हे शब्द आहेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्नाटक सरकारनेच प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वसमावेशक भाषावार लेखन आणि भाषणे (कन्नड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवर समग्र बरेहगळू मत्तू भाषणगळू) या पुस्तकात सीमाप्रश्नाची संपूर्ण माहिती दिली आहे. पण, या पुस्तकातील नोंदी मात्र कर्नाटकाने कधीही अवलंबल्या नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल. सीमाभागावर प्रांतरचनेत अन्याय झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत असते. याचसंदर्भात मंगळवारी चर्चा करण्यासाठी म. ए. समितीचे नेते जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी काळादिन पाळू नका, असे
सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हाधिकारी रोशन यांना त्यांच्याच ग्रंथालयातील आणि कर्नाटक सरकारच्या कन्नड आणि संस्कृती विभाग व कुवेंपू भाषा भारती प्राधिकरणाचे प्रकाशित केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक त्यांच्यासमोर ठेवले. त्यातील सीमावादावरील उतारा वाचायला सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात बेळगाव आणि संयुक्त महाराष्ट्र, कर्नाटक निर्मिती आदीबाबत सविस्तर लिखाण केले आहे.