वऱ्हाडवृत्त डिजिटल
समाजामध्ये वाढलेली व्यसनाधीनता पाहून मन विषण्ण होते. ज्यांचे तारुण्य अजून उमलायचे आहे असे तरुण युवक, तसेच कुटुंबातील वृद्ध नागरिक आज व्यसनाच्या आहारी गेले असून त्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आजकाल मद्यपानाला प्रतिष्ठा लाभली आहे. प्रत्येक पार्टीत मद्य हवेच, अशी जणू फॅशनच झाली आहे. व्यसनाधीन मनुष्य आपली पत आपल्या हातून गमावतो. व्यसनामुळे आरोग्याची राखरांगोळी होते. विविध आजार आणि रोगांमुळे मृत्यूचा धोका निर्माण होतो. आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यसनामुळे मरणाला कवटाळणान्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी व्यसनमुक्ती संस्थांकडून, तसेच शासकीय यंत्रणेकडून वेळोवेळी अभियान राबविले जाते. मद्यपानामुळे संपत्तीचा नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक व बुद्धीनाश ही संकटे ओढवतात म्हणून व्यसनाधीनता एक सामाजिक कलंक आहे. सशक्त समाजनिर्मितीसाठी आणि राष्ट्र हितासाठी युवकांनी व्यसनापासून दूर राहून आपल्या नवविविध कल्पनांनी आपला परिवार, समाज आणि राष्ट्राचा विकास साधावा. दारू, गांजा, चरस यासह मटका, जुगार ही सर्व व्यसने आपले शरीर व बुद्धीलाच पोखरत नाहीत, तर आपल्यासह परिवारालाही दुःखाच्या खाईत ढकलतात. लहानपणी लाडाने, कौतुकाने वाढविलेला मुलगा मोठेपणी वाईट संगत धरून व्यसनाच्या आहारी गेल्यावर आईवडिलांना झालेले दुःख कोणत्याही आपत्तीपेक्षा कमी नाही. व्यसन सर्वात आधी युवकाच्या बुद्धीवर ताबा मिळविते. त्यानंतर त्याच्या शरीरावर ताबा मिळविते. रक्तात भिनलेले हे व्यसन नात्यागोत्याची भावना नष्ट करून टाकते. तेव्हा जीवनात सुख, समृद्धी व आनंदाकरिता व्यसनापासून दूर राहावे.