हृदयविकारामध्ये केल्या जाणाऱ्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेमध्ये मोठा बदल घडविणारा शोध डॉक्टरांनी लावला आहे. स्टेंटलेस अँजिओप्लास्टी असे या शस्त्रक्रियेचे नाव आहे. यामध्ये रुग्णाच्या हृदयात स्टेंटस न बसविता शस्त्रक्रिया केली जाते. वैद्यकीय विश्वातील हा एक दिलासादायक शोध मानला जात आहे.
बदलती जीवनशैली आणि खाण्या- पिण्याच्या सवयींमुळे सध्या तरुणपणातच हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. अशा रुग्णांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करावी लागते. रुग्णाच्या हृदयात स्टेंट्स बसविले जातात. शस्त्रक्रियेनंतर हृदयात या स्टेंट्स ठेवून रुग्णाला जगावे लागते. मात्र स्टेंटलेस प्रकारात हृदयात स्टेंटस बसवावेच लागत नाहीत. त्यामुळे रुग्णाला स्टेंटसशिवाय मुक्त जीवन जगता येईल.
दिल्लीतील विख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रवीण चंद्रा यांनी नागपूरमध्ये आयोजित नागपूर लाईव्ह कॉनक्लेव्ह या हृदयविकारसंबंधीच्या परिषदेत स्टेंटलेस अँजिओप्लास्टी या नावीन्यपूर्ण शस्त्रक्रियेची माहिती दिली. तसेच ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यातील बारकावे समजावून सांगितले. हा शोध विशेषतः हृदयविकाराच्या तरुण रुग्णांसाठी गेम चेंजर ठरणार आहे, असा दावाही डॉ. चंद्रा यांनी केला.
महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचशा रुग्णालयांनी रुग्णांवर स्टेंटलेस अँजिओप्लास्टी करण्यास सुरुवातही केली आहे. सध्या दिल्लीत हृदयविकाराच्या रुग्णांपैकी सुमारे २५ टक्के शस्त्रक्रिया स्टेंटलेस असतात. हे प्रमाण हळूहळू वाढविण्यात येणार आहे, असे डॉ. चंद्रा यांनी सांगितले.
दुसरीकडे याबाबत नागपूरचे डॉक्टरही मागे नाहीत. मागील दोन वर्षांत नागपूरमध्ये ५५ स्टेंटलेस अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्या आहेत, असे डॉ. जसपाल अर्नेजा यांनी सांगितले. स्टेंटलेस अँजिओप्लास्टीमध्ये स्टेंटस वापरले जात नाहीत. तर रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या मोकळ्या केल्या जातात. हृदयविकाराचा धोका जसजसे वय वाढते तसतसा वाढत जातो. स्टेंटस बसविण्याच्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेचा एक दोष म्हणजे स्टेंटस बसविण्यात आलेल्या रुग्णावर पुढे गरज भासली तरी बायपास सर्जरी करता येत नाही. स्टेंटलेसमध्ये तसा प्रश्नच उद्भवत नाही, असे अर्नेजा म्हणाले.