nail Fungal ‘नेल फंगस’ची समस्या मूलतः अस्वच्छता, नखांची सफाई न करणे, प्रदूषण आणि पायांना दीर्घकाळ घाम आल्यामुळे उद्भवते. याखेरीज ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यांच्या नखांमध्येही नेहमी संसर्ग होतो. नखांमधील संसर्ग बहुतांशवेळा बुरशीजन्य असतो. यात सर्वाधिक दिसणारा संसर्ग एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीतून होतो. तिला डर्माटोफाइट असे म्हणतात. यीस्ट आणि मोल्डस हेही नखांमधील संसर्गाचे कारण ठरतात. अन्य कारणांमध्ये पायातील रक्तसंचार कमी होणे आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती या कारणांचा समावेश आहे. ‘टोनल फंगल इन्फेक्शन’ खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर होते. हा संसर्ग एका नखापासून दुसऱ्या नखापर्यंत पसरतो. वास्तविक, कॉमन स्किन बॅक्टेरियांच्या माध्यमातून बुरशी नखांच्या आसपासच्या त्वचेत प्रवेश करते. ही समस्या प्रामुख्याने सतत नखे कापत राहिल्याने आणि नखांच्या आसपासच्या त्वचेत काही टोचल्यामुळे उदभवते.
नखांमध्ये संसर्ग सुरू झाल्यास काही लक्षणे दिसतात. यामध्ये नख जाड होणे, नखे पांढरी, पिवळी किंवा तपकिरी होणे, नखे वाकडी होणे, नखांचा आकार बदलणे, नखांच्या खालील रसायनाचा रंग गडद होणे, नखांच्या आसपास वेदना जाणवणे, नखांना स्पर्श करताच ती मऊ झाल्याचे जाणवणे, पायांच्या बोटांजवळ सूज दिसणे अशी ही लक्षणे असतात. ‘नेल फंगस’ वाढण्यास अनेक घटक जबाबदार असतात. दिवसभर अगदी घट्ट बूट घातल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे दिवसभर सँडलचा वापर करणे अधिक चांगले.
लांब पल्ल्याची धावण्याची शर्यत असल्यास पायांमधून खूप घाम जातो. या अवस्थेत दीर्घकाळ राहिल्यास ‘नेल फंगस’ची समस्या उदभवू शकते. आर्द्रता अधिक असलेले वातावरण हेही या समस्येचे एक कारण असू शकते. मधुमेहासारख्या आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल तरी हा धोका असतो. पोहोण्याच्या तलावासारख्या सार्वजनिक ठिकाणी अनवाणी जाण्याने संसर्ग होऊ शकतो. अशा ठिकाणी ‘फ्लिप- फ्लॉप’ वापरणे चांगले. नखांची शोभा वाढविण्यासाठी ‘आर्टिफिशियल नेल्स’चा वापर करण्यामुळेही नखांच्या संसर्गाला आमंत्रण मिळू शकते.
नखांचा संसर्ग जेवढे गंभीररूप धारण करेल, तेवढा वेदनादायी ठरतो. तसेच पायांमुळे पसरणारे आणखीही वेगवेगळे संसर्ग त्यातून उद्भवू शकतात. जर तुम्हाला मधुमेह असेल तर पायातील रक्तसंचार शकतो.
पायाला झालेली अगदी छोटीशी जखमसुद्धा नखांमध्ये संसर्ग होण्यास कारणीभूत ठरू शकते. ‘नेल फंगस’चे निदान करण्यासाठी डॉक्टरांना तुमची नखे तपासावी लागतात. नखाचा काही भाग कापून घेऊन तो प्रयोगशाळेत पाठविला जातो आणि बुरशीचा कोणता प्रकार संसर्गास कारणीभूत ठरला आहे, याची तपासणी केली जाते. सोरायसिससारख्या आजारामुळेही नखांचा संसर्ग होऊ शकतो. अनेकदा यीस्ट आणि बॅक्टेरिया नखांच्या संसर्गास कारणीभूत ठरतात. संसर्गाचा प्रकार समजल्यानंतर त्यावर नेमकेपणाने उपचार करता येतात. ‘नेल फंगस’साठी पारंपरिक उपचारांमध्ये अनेक फंगल क्रीम, मलमे आणि पोटात घेण्याच्या काही गोळ्यांचा समावेश होतो. परंतु एखाद्या गर्भवतीला हा संसर्ग झाला असेल तर पोटात घेण्याच्या औषधांचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. काहीवेळा डॉक्टर या समस्येपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी लेझर ट्रीटमेन्टचा सल्ला देतात. ही उपचारपद्धती काहीशी महागडी असते आणि उपचार घेतल्यानंतरही संसर्ग पूर्णपणे बरा होईल, याची खात्री नसते.
पोटात घेण्याची अँटीफंगल औषधे डॉक्टर प्राधान्यक्रमाने देतात, कारण संसर्ग वेगाने साफ करण्याचे कामही औषधे करतात. टेर्बिनाफिन, इट्राकोनाझोल आदी औषधे नखांच्या संसर्गावर दिली जातात. ही औषधे सहा ते बारा आठवड्यांपर्यंत घेण्यास सांगितले जाते. संसर्ग नष्ट होण्यास चार महिने किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. या उपचारांचा परिणाम ६५ वर्षांवरील व्यक्तींवर कमी प्रमाणात होतो. काहीवेळा डॉक्टर मेडिकेटेड नेलपॉलिश देतात.
हे नेलपॉलिश संसर्गग्रस्त नखांना आणि त्याच्या आसपासच्या भागावर लावायचे असते. त्याचा वापर सुमारे वर्षभर दररोज दिवसातून एकदा करावा लागतो. संसर्ग जर गंभीर अवस्थेला पोहोचलेला असेल तर डॉक्टर संसर्गग्रस्त नख हटविण्याचा सल्ला देतात. नख हटविले तरच त्याच्या खालच्या त्वचेवर अँटीफंगल औषधाचा वापर करता येतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करून नख काढले जाते. यापैकी कोणत्याही उपचाराचा वापर करण्यापूर्वी नखे ट्रिम केली जातात, जेणेकरून उपचार योग्य पद्धतीने करता यावेत.
नखांमध्ये फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) सुरू होणे याचा अर्थ तुमची नखे खराब होऊ लागली आहेत, असा होतो. तसे पाहायला गेल्यास हाताच्या किंवा पायांच्या काही नखांमध्ये संसर्ग होणे ही सामान्य बाब मानली जाते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास हा संसर्ग अन्य नखांमध्येही पसरतो.